स्टॅड अप कॉमेडियन कुणाल कामरा यांच्या गाण्यावरून विधान परिषेदत गोंधळ कुणाल कामरा यांना अटक करण्याची भाजपा सदस्य प्रसाद लाड यांची मागणी

स्टॅड अप कॉमेडियन कुमाल कामरा याने महाराष्ट्रातील राजकिय परिस्थितीवर आणि दिल्लीतील पंतप्रधान मोदी यांच्यावर विडंबनात्मक गायलेले गाण आज सकाळी प्रसारीत झालं. त्या गाण्यावरून विधान परिषदेत भाजपाच्या सदस्यांनी गोंधळ घालत सभागृहाचे कामकाज बंद पाडले. तर भाजपाचे प्रसाद लाड यांनी कुणाल कामरा याने राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी अपशब्द वापरल्याने कुणाल कामरा यास अटक करण्याची मागणी केली. यावेळी सत्ताधारी बाकावरील सर्व सदस्य कुणाल कामरा यांच्या निषेधाच्या घोषणा देत सभापतीं राम शिंदे यांच्यासमोरील मोकळ्या जागेत एकत्र जमले. त्यामुळे सभागृहात एकच गोंधळाची परिस्थिती निर्माण झाल्याने अखेर राम शिंदे यांनी सभागृहाचे कामकाज स्थगित केले.

सकाळी विधान परिषदेचे कामकाज सुरु झाल्यानंतर या विषयीचा स्थगन प्रस्ताव विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी उपस्थित केला होता. मात्र सभापती राम शिंदे यांनी २८९ खालील दानवे यांचा स्थगन प्रस्ताव सभापतींच्या दालनातच फेटाळून लावण्यात आला.

यावेळी बोलताना अंबादास दानवे म्हणाले की, सभापती महोदय मुंबईत एक घटना घडली. पोलिस अधिकारी उपस्थित असताना एका स्टुडिओवर काही लोकांनी हल्ला केला. मंगळवार बुधवारी आपण राज्यघटनेवर चर्चा करणार आहोत. चर्चा करताना नागरिकांचे मूलभूत अधिकार, नागरिकांचे कर्तव्य आदी विषयांवरही चर्चा करणार आहोत. असे असताना कुणाल कामराने विडंबन कविता सादर केली. कॉमेडियन अशी कविता सादर करत असतात, पण सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली. या कार्यकर्त्यांनी सोलापूरकर, कोरटकर यांच्यावर काही भाष्य केलं नसल्याचे सांगत सभागृहात एकच गदारोळ सुरु झाला.

या गोंधळातच अंबादास दानवे पुढे बोलताना म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारे लोक कोरटकर, सोलापूरकर आहेत, तरीही कॉमेडियनचा निषेध नोंदविला जातो. पोलिसांच्या उपस्थितीत तोडफोड केली जाते.

पुढे बोलताना अंबादास दानवे म्हणाले की, राज्याचे मुख्यमंत्री म्हणतात कॉमेडियनने माफी मागितली पाहिजे, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार हिसकावून घेत आहे का, सत्ताधारी पक्षाचेच लोक अशा पद्धतीने तोडफोड करत असतात असा सवाल करत राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी कारवाई केली पाहिजे अशी मागणी केली. तसेच कोरटकर सोलापूरकर बाबत हे शांत का बसले असा सवालही यावेळी करत मला वाटतं कायदा व सुव्यवस्था सत्ताधारी पक्ष बिघडवत आहे, तोडफोड करणाऱ्या सगळ्यांनाच अटक झाली पाहिजे अशी मागणीही यावेळी केली.

अंबादास दानवे यांच्या या वक्तव्यानंतर उदय सामंत पुढे बोलताना म्हणाले की, विरोधी पक्षनेत्यांनी जो मुद्दा मांडला आणि तो मांडून भलतीचकडे नेण्याचा प्रयत्न केला. ज्या व्यक्तीचं समर्थन करत आहेत, ती व्यक्ती कशी आहे, याचं ब्रिफींग घ्यायला हवं होतं. पण आदेश आल्यामुळे विरोधी पक्षनेते असं बोलत असतील असे सांगत विरोधी पक्षनेत्याबद्दल आमचं काही म्हणणं नाही, पण त्यांच्यावर दबाव असल्याने ते हे बोलत आहेत. कुणाल कामरा भारत जोडो यात्रेत होता, तसंच हा विषय एकट्या एकनाथ शिंदे यांच्यापुरता मर्यादीत नाही त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत जी वाक्ये बोलली आहेत ती इथे सांगण्यासारखी नाहीत. मराठी भाषेचा मंत्री इथे उपस्थित आहे, अशा भाषेचे समर्थन कोणी करू नये असे सांगत एकनाथ शिंदे यांचा सत्कार महाराष्ट्राची संस्कृती जपली म्हणून वारकरी बांधवानी केला होता, त्यांच्याबाबत कुणाल कामरा बोलला, आनंद महिंद्रा, मुकेश अंबानी बाबत बोलला आपण त्याचं समर्थन करता कामा नये असेही यावेळी सांगितले.

पुढे बोलताना उदय सामंत म्हणाले की, कुणाल कामराचा व्हिडिओ आल्यानंतर ३४ मिनिटात एक ट्विट येतं आणि ते कुणाल कामराचं समर्थन करणार ट्विट असतं. लगेच दुसरं ट्विट येतं. आमची मागणी आहे की त्याचा बोलविता धनी कोण ते शोधलं पाहिजे. तुमच्या नेत्याबाबत काही घडलं तर आम्ही तुमच्या मागे उभं राहू. एकनाथ शिंदेवर टीका करायची, राजकारण करायचं हे काही लोकांनी ठरवून सुरु केलं आहे. ज्या पद्धतीने बोलंल गेलं ती विकृती आहे, ती विकृती ठेचली गेली पाहिजे, भारत जोड़ो यात्रेपासून हा माणूस फिरतो याचा अर्थ काय समजायचा असा सवाल करत भविष्यात अशा पध्दतीने असे वाद व्हायला नको हे करणं आवश्यक असल्याचं मतही यावेळी मांडलं, राजकारणातही माणुसकी असते याचा विचार केला पाहिजे, आज जे आमच्यावर आलं आहे, ते उद्या तुमच्यावरही येऊ शकतं असं सांगत शिवसेना उबाठाला गर्भित इशाराही यावेळी दिला.

या दोघांच्या वादातही कुणाल कामरा यांच्या गाण्यावरील वादावारून सभागृहातील गदारोळ वाढत गेल्याने अखेर १० ते १५ मिनिटांसाठी सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यात आले.

दुपारनंतर भाजपाचे प्रसाद लाड यांनी हा मुद्दा पुन्हा उपस्थित केला असता सभापती राम शिंदे यांनी सकाळी याविषयी विरोधी पक्षनेत्यांनी सभागृहात स्थगन प्रस्ताव मांडला होता. मात्र तो सभापतींच्या दालनातच फेटाळण्यात आल्याचे सांगत भाजपा सदस्यांचा गोंधळ क्षमविण्याचा प्रयत्न केला. मात्र भाजपाचे सदस्य शांत बसण्याच्या तयारीत नव्हते. अखेर सभागृहाचे कामकाज पुन्हा १० मिनिटासाठी स्थगित करण्यात आले.

About Editor

Check Also

आरटीई अंतर्गत १७ फेब्रुवारीपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू १० मार्च पर्यंत करता येणार अर्ज

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमांतर्गत (आरटीई) दुर्बल आणि वंचित घटकातील बालकांना स्वयं अर्थसहाय्यित …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *