मुंबईः प्रतिनिधी
राज्य मंत्रिमंडळ विस्तारातील नव्या मंत्र्यांचा शपथविधी विधानभवनाच्या मोकळ्या प्रांगणात होणार आहे. या शपथविधीच्या अनुषंगाने विधिमंडळाकडून अधिकृत परिपत्रक काढण्यात आले असून सर्व कर्मचाऱ्यांना या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
३० डिसेंबर २०१९ रोजी होणाऱ्या या शपथविधी सोहळ्यात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे ३० मंत्र्यांना शपथ देणार आहेत. यामध्ये काँग्रेसचे ४ कॅबिनेट ६ राज्यमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे ५ कॅबिनेट ५ राज्यमंत्री आणि शिवसेनेकडून ६ कॅबिनेट ४ राज्यमंत्र्यांचा असे मिळून ३० मंत्र्यांचा शपथविधी सोहळा होणार असल्याची माहिती राज्यपाल भवनातील सूत्रांनी दिली.
राज्य मंत्रिमंडळातील मंत्र्यांची संख्या ४३ इतकीत ठेवण्यात येणार आहे. ३० डिसेंबर रोजी ३० मंत्र्यांचा शपथविधी झाल्यानंतर राज्य मंत्रिमंडळातील मंत्र्यांची संख्या ३७ होणार आहे. त्यामुळे आणखी ६ खात्यांचा विस्तार दुसऱ्या टप्प्यात करण्यात येणार आहे. तसेच गरज पडल्यास मंत्रिमंडळातील सदस्यांची संख्या ४३ वरून ४७ करण्याची शक्यता असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने दिली.

Marathi e-Batmya