मुंबईः विशेष प्रतिनिधी
राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळाचा आज विस्तार करण्यात आला. मात्र या विस्तारात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे चिंरजीव आदित्य ठाकरे हे कॅबिनेट मंत्री म्हणून स्थानापन्न झाले आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे बडे नेते सुनिल तटकरे यांच्या कन्या आदिती तटकरे आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष थोरात यांचे भाचे तनपुरे यांची राज्यमंत्री म्हणून निवड करण्यात आल्याने मंत्रिमंडळावर घराणेशाहीची छाप दिसून येत आहे.
काही महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणूकीत शिवसेनेचे युवा नेतृत्व आणि राजकिय वारसदार म्हणून ओळखले जाणारे आदीत्य ठाकरे यांनी पहिल्यांदाच उतरले. त्यावेळी भाजपा, काँग्रेस उमेदवार देणे टाळले. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्या विरोधात उमेदवार दिला. तरीही आदित्य ठाकरे यांनी विजय मिळविला. राज्यात शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार येण्याचे निश्चित झाल्यानंतर राज्य मंत्रिमंडळात आदीत्य ठाकरे यांचे स्थान नसेल अशी अटकळ बांधली जात होती. मात्र आयत्यावेळी त्यांना स्थान देत थेट कॅबिनेट मंत्री पदी नियुक्ती देण्यात आली.
याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसमधील बडे प्रस्थ म्हणून ओळखले जाणारे सुनिल तटकरे हे राज्यात आघाडीची सत्ता असताना मंत्री होते. तसेच पवार कुटुंबियांचे जवळचे म्हणून ओळखले जातात. मात्र लोकसभा निवडणूकीत ते विजयी झाल्याने ते लोकसभेत खासदार म्हणून गेले आहेत. मात्र त्यांनी स्वतःचा राजकिय वारसदार म्हणून कन्या आदिती तटकरे यांची निवड करत तिला विधानसभेत निवडूणही आणले आणि तिला राज्यमंत्री पदी विराजमानही केले.
याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा मंत्री जयंत पाटील हे राज्याच्या मंत्रिमंडळात गृह मंत्री म्हणून कार्यरत आहेत. तरी त्यांचे भाचे प्रसाद तनपुरे हे शिवसेनेच्या तिकिटावर निवडूण आले आहेत. यामुळे राज्य मंत्रिमंडळात मामा गृह मंत्री तर भाचा राज्यमंत्री झाल्याचे चित्र दिसत आहे.
याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे पुतणे अजित पवार हे बंडखोरीनंतरही पुन्हा उपमुख्यमंत्री म्हणून परतले आहेत. याशिवाय मुंबई काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांच्या कन्या वर्षा गायकवाड याही कॅबिनेट मंत्री म्हणून परतल्या आहेत. त्यामुळे या संपूर्ण मंत्रिमंडळावर घराणेशाहीची छाप असल्याचे दिसत आहे.
Marathi e-Batmya