मुंबईः खास प्रतिनिधी
राज्यातील सत्तेत आपला वाटा कायमचा रहावा म्हणून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक विद्यमान आमदार, नेत्यांसह कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला. मात्र आता सत्ता कायमची न राहता महाविकास आघाडीकडे गेल्याने निवडणूकीपूर्वी भाजपात आयाराम झालेल्या नेत्यांना आता पुन्हा मूळ पक्षांचे वेध लागले असून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना आता आम्ही जातो, आम्हाला निरोप द्या असा धोषा लावल्याची माहिती भाजपातील विश्वसनीय सूत्रांनी दिली.
विधानसभा निवडणूकीच्या काळात सत्ता पुन्हा भाजपा-शिवसेना युतीला मिळणार असल्याचे चित्र निर्माण करण्यात आले होते. त्यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसमधील ज्येष्ठ नेते गणेश नाईक, मधुकर पिचड, पद्मसिंह पाटील, दिलीप सोपल, बबनराव शिंदे आणि त्यांचे बंधू संजय शिंदे, विजयसिंह मोहिते-पाटील आणि त्यांचे चिंरजीव रणजीतसिंह मोहीते-पाटील यांच्यासह अनेकांनी प्रवेश केला. तर काँग्रेसमधून दस्तुरखुद्द माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, गोरे, कालीदास कोळंबकर, अमरीश पटेल यांच्यासह अनेक विद्यमान आमदार आणि नेत्यांनी भाजपात प्रवेश केला.
परंतु राज्याच्या राजकारणातील जाणते राजे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आपले सारे राजकिय कौशल्य पणाला लावत भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडीत शिवसेनेला जोडले. तसेच राज्यात सत्तांतर घडवून आणले. त्यामुळे ज्या सत्तेसाठी पक्ष बदलला त्याच पक्षाची राज्यात सत्ता आली. त्यामुळे सत्तेसाठी पुन्हा मूळ पक्षात जाण्याची घाई आता भाजपातील आयारामांना झाल्याचे त्यांनी सांगितले.
महाविकास आघाडीच्या सत्ता स्थापनेच्या सुरुवातीच्या काळात शिवसेना या दोन्ही पक्षांची साथ सोडून पुन्हा भाजपासोबत येईल अशी अटकळ बांधली होती. त्यानुसार प्रत्येक राजकिय मित्रत्वाची चाचपणी भाजपाकडून करण्यात आली. मात्र शिवसेनेने भाजपाच्या अर्थात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सादाला प्रतिसाद दिला नाही. त्यातच आता महाविकास आघाडी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तारही झाल्याने शिवसेना सत्तेचा लंबक सोडून भाजपाकडे येणार नसल्याचे स्पष्ट झाल्याने या आयारामांकडून भाजपा सोडचिठ्ठी देण्यासाठी प्रयत्न सुरु केल्याचे त्यांनी सांगितले.
सोडचिठ्ठी देण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील मोठ्या नेत्यांनी भाजपाचा राजीनामा देत मूळ पक्षात परतण्याची तयारी दर्शविली आहे. तसेच त्यासाठी देवेंद्र फडणवीस यांना गळ घालत असून आता आम्हाला निरोप द्या अशी मागणीही या नेत्यांकडून करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
भाजपातील जून्या नेत्यांकडूनही फडणवीस यांच्या विरोधात सुरु केलेली मोहीम अद्याप बंद केलेली नसून त्यांना एकाकी पाडण्यासाठी प्रयत्नशील आहे. विद्यमान परिस्थिती देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात जात असल्याने ते एकटे पडले तर आर्श्चय वाटायला नको असे शेवटी स्पष्ट केले.
Marathi e-Batmya