काँग्रेस नेते तथा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणूकीबाबत एक खास लेख लिहित मॅच फिक्सिंग असल्याचा आरोप केला. त्यानंतर या लेखाचे पडसाद महाराष्ट्रासह संपूर्ण देशपातळीवर उमटले. तर राहुल गांधी यांनी लेखाच्या माध्यमातून उपस्थित केलेल्या मुद्यांना उत्तरे भाजपाच्या नेत्यांकडून देण्यास सुरुवात झाली. त्यावरूनही काँग्रेसने केंद्रीय निवडणूक आयोगाने उत्तर देण्याऐवजी भाजपाचे नेते का उत्तर देत आहे असा सवालही यावेळी केला. त्यामुळे भाजपाची पुरती कोंडी झाली. या पार्श्वभूमीवर अखेर केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्य सरकारच्या मार्फत एक प्रसिद्धी पत्रक जारी करत राहुल गांधी यांनी प्रसारमाध्यमाऐवजी थेट आयोगाशी संपर्क साधवा असे आवाहन केले आहे.
भारत निवडणूक आयोगाने काँग्रेस पक्षाला २४ डिसेंबर २०२४ रोजी सविस्तर उत्तर पाठवले असून, त्यात त्यांच्या उपस्थित केलेल्या सर्व मुद्द्यांवर स्पष्ट आणि तपशीलवार स्पष्टीकरण दिले आहे. या अधिकृत पत्रव्यवहारानंतरही काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी माध्यमांद्वारे पुन्हा शंका आणि आरोप मांडल्याने आयोगाने याबाबत खेद व्यक्त केला आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने म्हटले आहे की, “निवडणूक आयोग एक स्वतंत्र आणि संविधानिक संस्था आहे. कोणत्याही राजकीय पक्षाने किंवा त्याच्या नेत्याने आयोगाशी थेट पत्राद्वारे संपर्क साधल्यास, आम्ही निश्चितच उत्तर देतो आणि देत आलो आहोत.”
पुढे बोलताना केंद्रीय निवडणूक आयोगाने राहुल गांधी यांनी थेट आयोगाशी संवाद साधण्याऐवजी वारंवार माध्यमांतून आरोप करणे हे आश्चर्यकारक आणि खेदजनक असल्याचे मत व्यक्त करत त्यांनी माध्यमांमध्ये प्रश्न उपस्थित करण्याऐवजी थेट निवडणूक आयोगाशी पत्राद्वारे संपर्क साधावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
तसेच केंद्रीय निवडणूक आयोगाने पुढे सांगितले आहे की, “निवडणूक आयोगाकडे विचारलेल्या अधिकृत प्रश्नांना उत्तर देण्याची आमची प्रक्रिया पारदर्शक आणि ठोस आहे,” असेही स्पष्ट केले आहे.
शेवटी केंद्रीय निवडणूक आयोगाने सांगितले की, हा संवाद माध्यमांमधून न करता थेट आयोगाशी केल्यास, लोकशाही प्रक्रियेस अधिक बळकटी मिळेल आणि संवाद अधिक परिणामकारक ठरेल, असे स्पष्टीकरणही आयोगाने राज्य सरकारच्या माध्यमातून प्रसिद्धी पत्रकातून दिली आहे.
Marathi e-Batmya