विधानसभेची निवडणूक राज्यात, राजकिय पक्ष मुंबईत अन् उमेदवार अंतरावली सराटीत विजयाचा लोलक अंतरावली सराटीत स्थिर

आतापर्यंत राज्यातील सत्तेची आणि राजकारणाची फळे चाखण्यासाठी मुंबई, पुणे आणि नागपूरच्या फेऱ्या मारणाऱ्या उमेदवारांना यंदाच्या निवडणूकीत सध्याचे राजकीय केंद्र मुंबई ऐवजी मराठवाड्यात स्थलांतरीत झाल्याचे दिसून येत आहे. तसेच निवडणूकीचे मतदान होण्या आधी आणि निकाल जाहिर होण्यापूर्वीच अनेक उमेदवार स्वतःच्या मतदारसंघातील नागरिकांना भेटण्याआधीच नव्याने राजकीय केंद्र स्थानी आलेल्या मराठवाड्याच्या ग्रामीण भागातील अंतरावली सराटीत स्थिरावल्याने विविध पक्षाचे उमेदवार अंतरावली सराटीला आवर्जून भेटी देत असल्याचे दिसून येत आहे.

सर्वपक्षिय उमेदवार पक्षांचे बहुतांष नेते मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी रिघ लागल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूकीत पहिल्यादाच राजकिय पक्षाचे नेते आणि उमेदवार हे मुंबई आणि त्यांच्या मतदारसंघातील जनतेऐवजी पहिल्यांदा अंतरावली सराटीचा दौऱा करत आहे. त्यामुळे राज्यातील विधानसभा निवडणूकीचे राजकिय केंद्र मुंबईतून आंतरावली सराटीत स्थलांतरीत झाले असल्याची चर्चा राज्यात सुरु झाली आहे.

आतापर्यंत राज्यातील सत्तेचे केंद्र आणि उमेदवारांच्या मतांची गणित ही त्या त्या पक्षाच्या बलाढ्य नेत्याच्या घरी किंवा त्या पक्ष नेत्याच्या इशाऱ्यावर ठरत असत. या अनुषंगाने महाराष्ट्रातील निवडणूकीचे वातावरण किंवा एखाद्या उमेदवाराचे भवितव्य भाषणातून आणि एखाद्या सूचक वाक्यातून घडविण्याची किमया राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या इशाऱ्यासरशी ठरत आली आहे. तसेच काही वर्षापूर्वी शिवसेना प्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या हयातीतल अशा पद्धतीने उमेदवारांचे आणि त्यांच्या निवडणूकीचे भवितव्य ठरविले जात असे. या दोघांनंतर शरद पवार यांचे पुतणे तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही उमेदवार विजयी करण्यापेक्षा तो पडणार कसा असे सांगत त्या उमेदवारांना जाहिर वक्तव्य करत पाडूनही दाखविले. या तिघानंतर अवथा चवथा नेता मधल्या काळात झाल्याचे महाराष्ट्राने पाहिले नाही.

विधानसभा निवडणूकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर मराठा आरक्षणाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी अंतरावली सराटीत भाजपाला सुफडा साफ करण्याचा इशारा दिला. तसेच मराठा समाजाच्या विरोधात भूमिका घेणाऱ्या ओबीसी समाजाच्या नेत्यांनाही इशारा देत सरकार पुरस्कृत ओबीसींचे आंदोलन म्हणून ओबीसी आरक्षण कर्त्यांच्या आंदोलनाची हेटाळणीही केली. तसेच भाजपाच्या विरोधात मराठा समाजाचे उमेदवार देणार असल्याची घोषणाही मनोज जरांगे पाटील यांनी करत मराठा समाजाच्या उमेदवारांनी राखीव मतदारसंघ सोडून मराठा आरक्षणाच्या विरोधात भूमिका घेणाऱ्यांच्या विरोधात उमेदवारी अर्ज भरण्याचे आवाहन केले. तसेच कोणात्या उमेदवाराने अर्ज माघारी घ्यायचा आणि कोणाचा ठेवायचा याबाबत २९ ऑक्टोंबरला आपण मराठा समाजाला उमेदवारांना सांगू असे सांगत मराठा समाजाच्या उमेदवारांना आवाहन केले. या आवाहनाचा धसका सर्वच राजकिय पक्षाच्या उमेदवारांनी घेतला आहे.

त्यामुळे राज्यातील भाजपा, शिवसेना शिंदे यांचा पक्ष असो की अजित पवार यांच्यासह सत्ताधारी पक्षाचा विरोधकांमधील कोणत्याही पक्षाचा उमेदवार हा उमेदवारी जाहिर झाली आंतरावली सराटीला जात असून तेथे मराठा आरक्षण आंदोलकाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची आवर्जून भेट घेत आहे. भेटी देणाऱ्या उमेदवारात आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात काय चर्चा झाली किंवा होणार आहे याची अधिकृत माहिती अद्याप उघड झाली नसली तरी जवळपास अनेक पक्षाचे उमेदवार आणि शिंदे गटाचे नेते मात्र अंतरावली सराटीत मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला जात आहेत.

आतापर्यंत उमेदवारी जाहिर झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते उदय सामंत आणि एकनाथ शिंदे यांचे विश्वासू मंगेश चिवटे हे त्यांच्या पक्षाच्या उमेदवारांची यादी जाहिर झाल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी गेल्याचे वृत्त काही दूरचित्रवाणी वाहिण्यांनी दाखविले. त्यानंतर संजय शिरसाट यांनीही मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. याशिवाय तिसऱ्या आघाडीचे नेते तथा स्वराज्य पार्टीचे प्रमुख छत्रपती संभाजीराजे यांनीही मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. याशिवाय अनेक पक्षाच्या उमेदवारांनीही आंतरावली सराटीचा दौरा केल्याचे वृत्त आहे.

या सगळ्या घडामोडी पाहता राज्यातील विधानसभा निवडणूकीच्या विजयाची हमी देणारा लोलक पहिल्यांदाच पुणे-मुंबई आणि नागपूरऐवजी मराठवाड्यातील अंतरावली सराटीला येथे स्थिर झाल्याचे दिसून येत आहे.

About Editor

Check Also

Nagpur Blast

Nagpur Blast: स्फोटके बनवणाऱ्या कंपनी SBL मध्ये स्फोट १५ जणांचा मृत्यू, १८ हून अधिक कामगार जखमी

महाराष्ट्रातील नागपूर जिल्ह्यात रविवारी सकाळी एक मोठी दुर्घटना घडली. काटोल तहसीलमधील रौलगाव येथे असलेल्या SBL …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *