प्रकाश आबिटकर यांचे निर्देश, बांधकाम पूर्ण झालेली रुग्णालये कार्यान्वित करून सेवेत आणा पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर सर्व व्यवस्था तत्परतेने करा

बांधकाम पूर्ण झालेली रुग्णालये कार्यान्वित करून लवकरात लवकर जनतेच्या सेवेत आणावीत. तसेच कार्यान्वित करण्यात येणाऱ्या रुग्णालयामध्ये आवश्यक मनुष्यबळ व यंत्रसामग्रीचे नियोजन करण्यात यावे, असे निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले.

आरोग्य भवन येथे विविध बैठकांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी  सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव विरेंद्र सिंग, आरोग्य सेवा आयुक्तालयाचे आयुक्त अमगोथू श्री रंगा नायक, संचालक नितीन अंबाडेकर, सहसंचालक (रुग्णालये), डॉ. सुनिता गोलाईत, सहसंचालक (प्रा.आ.के.), डॉ. सुनीता दीक्षित व इतर अधिकारी उपस्थित होते. तसेच जिल्ह्यातील अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.

मंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले की, रुग्णालयाच्या पूर्ण कार्यान्वयनासाठी सर्व आवश्यक व्यवस्था तत्परतेने करण्यात याव्यात, ज्यामुळे नागरिकांना वेळेत आरोग्य सेवा मिळू शकेल. तसेच ज्या ठिकाणी मनुष्यबळाची अडचण निर्माण होत असेल अशा ठिकाणी एजन्सी नेमून कंत्राटी पदभरती करण्यात यावी.

प्रकाश आबिटकर म्हणाले की, सर्व जिल्हा रुग्णालय, उप जिल्हा रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र याठिकाणी सर्व आरोग्य सुविधा तत्काळ अद्ययावत करण्यात याव्यात. पूर्ण झालेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये सर्व साधनसामग्री अद्ययावत करण्यात यावी. तसेच संबंधित अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी जाऊन पाहणी करावी, असेही यावेळी सांगितले.

पुढे बोलताना प्रकाश आबिटकर म्हणाले की, कोविड आणि पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शासनाने व स्थानिक प्रशासनाने घराघरात जाऊन आरोग्य, स्वच्छता आणि सामाजिक मदत सेवा देण्यावर विशेष भर द्यावा. पुणे जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या अधिक दिसून येत असून स्थानिक अधिकाऱ्यांनी याबाबत आवश्यक कार्यवाही करावी, असेही यावेळी सांगितले.

प्रकाश आबिटकर पुढे बोलताना म्हणाले की, पावसाळ्यात पाणी साचल्यामुळे वेगवेगळ्या रोगांचा धोका वाढतो. यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर देणे आवश्यक आहे. जलजन्य आजाराच्या प्रभावी प्रतिबंधासाठी पाणी स्त्रोतांची प्रभावी गुणवत्ता नियंत्रण करावी. यासाठी पावसाळ्यापूर्वी स्वच्छता सर्वेक्षण अहवालाचा अभ्यास करून ज्या गावांना लाल कार्ड व पिवळे कार्ड देण्यात आले असेल अशा ठिकाणी जनजागृती करण्यात यावी. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी पाणी तपासणी प्रयोगशाळा अद्ययावत ठेवाव्यात, असे निर्देशही दिले.

शेवटी बोलताना प्रकाश आबिटकर म्हणाले की, मर्च्युरी कॅबिनेटबाबत आढावा घेऊन ज्या ठिकाणी कामे अपूर्ण असतील अशा ठिकाणी जिल्हा शल्य चिकित्सकांनी या कामाला गती द्यावी. पावसाळ्यात तसेच इतरही कालावधीत अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मुख्यालय सोडू नये,असे निर्देशही दिले.

About Editor

Check Also

छगन भुजबळ यांची मागणी, मराठा आरक्षणासंदर्भात काढलेल्या शासन निर्णयात स्पष्टता आणा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन

राज्य सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात २ सप्टेंबर रोजी एक शासन निर्णय जारी केला आहे. मराठा समाजाला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *