Breaking News

मुंबईसह उपनगरात २४ तास पावसाचा इशारा मुंबईसह महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये पावसाचा कहर

मान्सूनच्या परतीचा पाऊस मुंबईसह राज्यातील मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यात सुरु झाला आहे. काल रात्री पुणे, सोलापूर पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भात पावसाने हजेरी लावल्यानंतर आज दुपारनंतर पुन्हा पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात केली. विशेष म्हणजे, संध्याकाळी सुरु झालेला पाऊस पुढील २४ तास मुंबई उपनगर, ठाणे, रायगड, पालघरसह मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात सुरु राहणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

हवामान खात्याने रडारनुसार दिलेल्या माहितीनुसार मुंबई मुंबई उपनगरासह कोकणातील प्रमुख जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळण्यास सुरुवात झाली. तसेच मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यातही पावसाने हजेरी लावली. मान्सूच्या परतीचा पाऊस सुरु झाल्याने घरातून निघालेल्या अनेक नागरिकांची संध्याकाळी घरी परतताना चांगलीच त्रेधा तिरपीट उडाली. तर अनेक ठिकाणी पाणी साचण्याचे प्रकार सुरु झाले. अनेक जिल्ह्याच्या ठिकाणी आणि शहरांमध्ये पावसाच्या पाण्याने रस्ते जलमय झाल्याचे दिसून येत होते. तसेच रस्ते जलमय झाल्याने अनेक भागात वाहतूकीचा खोळंबा झाल्याचे चित्र पाह्यला मिळाले.

राज्याच्या अनेक भागातही अशीच परिस्थिती पाह्यला मिळत असल्याने अनेक भागात नागरिकांना वीज गर्जेनेसह पडणाऱ्या पावसापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी सुरक्षित ठिकाणी शोधून त्या ठिकाणी आसरा घेतला. तर जे नागरिक घरी होते. त्यांनी घरात राहणेच पसंत केले. दरम्यान, मुंबईतील अनेक उपनगरीय गाड्याच्यां वाहतूकीवर परिणाम झाला असून पावसामुळे मुंबईतील प्रत्येक रेल्वे स्टेशनवर गर्दी झाल्याचे चित्र पहायला मिळत असून मध्य रेल्वे मार्गावर आणि हार्बर मार्गावर मोठ्या रेल्वे गाड्या २० ते २५ मिनिटे उशीराने धावत आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत