Breaking News

अमित शाह यांचा राहुल गांधी सुशीलकुमार शिंदेंना टोला, या लाल चौकात खुशाल फिरा एनडीए सरकारच्या काळात जम्मू आणि काश्मीर सुरक्षित जे तुमच्या काळात नव्हते

जम्मू आणि काश्मीरातील विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर तेथील बर्फाळ प्रदेशातही राजकिय वातावरण चांगलेच तापविण्याचा प्रयत्न भाजपाकडून करण्यात येत आहे. त्यातच काही दिवसांपूर्वी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आयस्क्रिम खात गाडीवरून फिरत प्रवास केल्याचे दृष्य पाह्यला मिळाले. तर माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनीही अमित शाह यांच्यावर निशाणा साधताना जम्मू आणि काश्मीरात जाण्यासाठी विद्यमान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह घाबरत असल्याची टीका केली होती. या घटनेवरून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि सुशिलकुमार शिंदे यांना टोला लगावला आहे.

जम्मू आणि काश्मीर मधील एका प्रचारसभेत बोलताना केंद्रीय मंत्री अमित शाह म्हणाले की, काही दिवसांपूर्वी राहुल गांधी आले होते, ते आले आणि आयस्क्रिम खाऊन गाडीवर फिरून निघून गेले. एनडीएच्या काळात आम्ही जम्मू आणि काश्मीर सुरक्षित केले असल्याने राहुल गांधी हे येथे येऊन आयस्क्रिम खाऊन गाडीवर फिरले. हा भूमाग सुरक्षित केला तो केवळ एनडीए सरकारनेच केला असल्याचे सांगत पण तुमच्या सरकारच्या काळात हा भूभाग सुरक्षित करता आला नाही, तुम्ही ज्या मोंदीवर टीका करता त्या मोंदीनी येथील दहशतवादाला गाडल्यामुळे येथे येऊन आयस्क्रिम खाऊन गाडीवर फिरू शकता अशी टीकाही केली.

काही दिवसांपूर्वी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे णाले की, मी केंद्रीय गृहमंत्री बनण्याआधी मी विजय धार यांची भेट घेतली आणि त्यांना विचारले की मी कोठे फिरावे. तेव्हा त्यांनी सल्ला दिला की, मी असेच भटकू नये पण लाल चौकात जावे आणि दाल लेक परिसरात लोकांना भेटावे, हा सल्ला जेव्हा मी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितला. तेव्हा या वाक्याने मला प्रसिध्दी मिळाली, आणि लोकांचा विचार झाला की, हा गृहमंत्री असलेला व्यक्ती कोणत्याही भीतीशिवाय जम्मू आणि काश्मीरात फिरतोय, पण मी पूर्णतः घाबरलो होतो.

या वाक्याचा धागा पकडत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काँग्रेस नेते तथा माजी केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे यांच्यावरही निशाणा साधताना म्हणाले की, शिंदे साहेब तुम्ही तुमच्या मुलाबाळांना घेऊन या आणि बिनधास्त लाल चौकात फिरा, तुम्हाला धमकावण्याची आणि इजा पोहोचविण्याची हिंमत कोणी करू शकत नाही असा उपरोधिक टोलाही यावेळी लगावला.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत