Breaking News

शिवसेना उबाठाचा शनिवारी ‘महा नोकरी’ मेळावा १२५ कंपन्या १० हजार युवकांना मेळाव्यात प्लेसमेंट मिळणे अपेक्षीत

राज्यात महायुती सरकारच्या कार्यकाळात वाढलेल्या बेराजगारीच्या पार्श्वभूमीवर मराठी सुपुत्रांच्या हाताला काम देण्यासाठी शिवसेना उबाठा कडून ‘महा रोजगार’ मेळाव्याचे विलेपार्ले पूर्व येथे शनिवारी, ५ ऑक्टोबर रोजी आयोजन केले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते महा रोजगार मेळाव्याचे उद्धघाटन होणार असून शिवसेना नेते आदित्य ठाकरे मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत. मुंबई पदवीधर मतदारसंघाचे शिवसेना आमदार ॲड. अनिल परब यांनी विधान परिषद निवडणुकीत दिलेल्या वचनपूर्तिनिमित्ताने हा महा रोजगार मेळावा होणार आहे.

हा मेळावा विलेपार्ले पूर्वला ई १८ एमएलसीपी पार्किंग, टॉवर १ तळमजला, सहारा हॉटेलजवळ, एटीसी टॉवर समोर बालाजी रेस्टॉरंट येथे सकाळी ९ ते सायंकाळी ६ पर्यंत होणार आहे. मेळाव्यात लॉजिस्टीक, बँकींग, इन्शुरन्स, बीपीओ, हॉस्पिटॅलिटी, फायनान्स, शिक्षण, बांधकाम, माहिती तंत्रज्ञान, उद्योग क्षेत्रातील १२५ कंपन्या सहभागी होणार आहेत. त्यामध्ये ॲमेझॉन, हिंदुजा, एचडीएफसी, एसबीआय, बजाज, टाटा एआयजी, एअरटेल, आयसीसी लोम्बार्ड अशा नामांकीत कंपन्या असणार आहेत.

समाज माध्यम, जाहीराती तसेच शिवसेनेच्या मुंबईतील २३६ शाखा आणि शिवसेना पदाधिकारी यांनी मेळाव्याची लिंक (https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSdPR_-WoRBnI7EjM9VP2j5mrBB5uny6OVT-XZB64ZEtBbrM4Q/viewform) व क्यूआर कोड पाठवलेला आहे. आजपर्यंत ८ हजार युवकांनी नोंदणी केली आहे. सुमारे १० हजार युवकांना या मेळाव्यात रोजगार मिळणे अपेक्षित आहे.

नोंदणीसाठी चार दिवस शिल्लक आहेत. ही नोंदणी १५ हजार पर्यंत जाईल, युवकांनी सोबत बायोडेटा, केवायसी कागदपत्रे आणि छायाचित्र आणायचे आहे, असे महा नोकरी मेळाव्याचे आयोजक आमदार ॲड. अनिल परब यांनी सांगितले.

शिवसेनेने अनेक मेळावे घेतले आहेत. मात्र सुमारे १० ते १२ हजार युवकांना नोकरी देणारा महा मेळावा यावेळी प्रथम होत आहे. जाहिरनाम्यात दिलेल्या आश्वासनांची वचनपूर्ती म्हणून दरवर्षी महा नोकरी मेळाव्याचे आयोजन केले जाणार आहे. जाहिरनाम्यामध्ये दिलेल्या आश्वासनांची वचनपूर्ती पहिल्या शंभर दिवसात करण्याचे आश्वासन या महा रोजगार मेळाव्याच्या आयोजनाने ॲड. अनिल परब पूर्ण करत आहेत.

यासंदर्भात ॲड. अनिल परब म्हणाले की, महाविकास आघाडी राज्यातील बेरोजगारीची परिस्थिती हाताळण्यावर लक्ष केंद्रित करेल. प्रामुख्याने शेजारील गुजरातमध्ये स्थलांतर होत असलेले उद्योग रोखले जातील. महाविकास आघाडीचे सरकार आल्यास तरुणांना अधिक नोकऱ्या देण्यासाठी व सरकारी रिक्त जागा भरण्याचे काम वेगात केले जाईल. महाराष्ट्रात मविआ सरकार होते तेव्हा ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’चे तीन-चार कार्यक्रम झाले, ज्यामध्ये अनेक सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आल्या होत्या परंतु हे सरकार त्यातील उद्योग महाराष्ट्रात ठेवण्यास यशस्वी ठरले नाही.

जूनमध्ये पार पडलेल्या विधान परिषद निवडणुकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमेदवार ॲड. अनिल परब यांनी मुंबई पदधीर मतदारसंघात भाजपाचे उमेदवार किरण शेलार यांचा २६ हजार मतांनी पराभव केला होता. ॲड. अनिल परब हे विधान परिषदेचे शिवसेनेचे गटनेते असून त्यांची विधान परिषद आमदारकीची चौथी टर्म आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत