Breaking News

अमित शाह यांचा सवाल, राहुल गांधी तुम्हाला एमएसपीचा लाँगफॉर्म माहित आहे का? अग्निपथ योजनेतील एकही तरूण बेरोजगार राहणार नाही

हरियाणा विधानसभा निवडणूकीतील लढाई आता चांगलीच रंगत येत चालली आहे. या लढाईत राहुल गांधी यांनी हरियाणातील तरूण अवैध मार्गाने अमेरिकेत जात असल्याचा आणि अवैध मार्गाने अमेरिकेत पोहोचलेल्या व्यक्ती आणि त्यांच्या कुटुंबासोबतच्या चर्चेचा मुद्दा उपस्थित केला. त्यामुळे भाजपाची पुरती पंचायत झाल्याने भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शुक्रवारी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधत राहुल गांधी यांना सवाल केला की, विरोधी पक्षाने पिकांच्या किमान आधारभूत किमतीच्या (एमएसपी) मुद्द्यावर खोटे बोलणे थांबवावे, असे सांगत राहुल बाबा तुम्हाला एमएसपीचा लॉगफॉर्म तरी माहित आहे का असा सवाल केला.

हरियाणामध्ये पिकांच्या एमएसपी केंद्रस्थानी आल्याने आणि मुख्य विरोधी पक्षाने सत्तेत आल्यास त्यासाठी कायदेशीर हमी देण्याचे आश्वासन दिल्याने, अमित शाह यांनी दावा केला की राज्यातील भाजपा सरकारने मागील काँग्रेसच्या सरकारपेक्षा जास्त किमतीत शेतकऱ्यांकडून पिकांची खरेदी केल्याचा दावा केला.

भाजपा उमेदवारांच्या समर्थनार्थ रेवाडी येथे एका प्रचार सभेला संबोधित करताना अमित शाह म्हणाले. काही एनजीओने राहुल बाबांना सांगितले आहे की एमएसपी मते आकर्षित करेल, राहुल बाबा, तुम्हाला एमएसपी MSP चा पूर्ण लाँगफॉर्म माहित आहे का? खरीप पिके कोणती आणि रब्बी कोणती हे तुम्हाला माहिती आहे का? असा सवाल करत हरियाणातील भाजपा सरकार एमएसपीवर २४ पिकांची खरेदी करते. हरियाणातील काँग्रेसच्या नेत्यांनी आम्हाला सांगावे की देशातील काँग्रेसच्या नेतृत्वाखालील कोणत्या सरकारने २४ पिकांची खरेदी केली असा सवालही यावेळी केला.

काँग्रेस सरकारच्या काळात धानाचा भाव १३१० रुपये प्रति क्विंटल होता, असे सांगून अमित शाह म्हणाले की, भाजपा सरकारच्या काळात २३०० रुपये प्रति क्विंटल करण्यात आला आहे. हरियाणात कमळाचे भाजपा सरकार बनवा आणि आम्ही ३,१०० रुपये प्रति क्विंटल दराने धान्य खरेदी करू, असे आश्वासन यावेळी दिले.

बाजरीच्या मुद्द्यावर अमित शाह म्हणाले की, भाजपा सरकारने पिकाचा एमएसपी १२५० रुपये प्रति क्विंटलवरून २,६२५ रुपये प्रति क्विंटल केला. हुडा साहेब, तुमच्या सरकारच्या काळात बाजरी [एमएसपीवर] खरेदी केली जात नव्हती. राजस्थानमधील तुमच्या काँग्रेस सरकारनेही बाजरी [एमएसपीवर] खरेदी केली नाही. राजस्थानचे शेतकरी आपली बाजरी हरियाणात विकायचे कारण ते इथे एमएसपी MSP वर विकत होते [भाजपा सरकारच्या काळात]. आम्ही गव्हाचा एमएसपी १,४०० रुपयांवरून २,२७५ रुपये केला, तर मोहरीची किंमत पूर्वीच्या ३,०५० रुपयांवरून ५,६५० रुपये केल्याचेही यावेळी सांगितले.

अग्निपथ योजनेंतर्गत बोलताना अमित शाह म्हणाले की, अग्निपथ योजनेतंर्गत लष्करातील कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर अग्निवीर परतल्यावर त्यांना बेरोजगार केले जाईल, असा गैरसमज काँग्रेस पसरवत आहे. पण मी आज एक वचन देत आहे, हरियाणाचा एकही अग्निवीर नोकरीशिवाय राहणार नाही. त्यांना कायमस्वरूपी नोकरी देण्याचा नरेंद्र मोदीं निर्णय आहे ज्यात पेन्शनचीही तरतूद असेल, असेही सांगितले.

अग्निपथ हा राज्यातील महत्त्वाच्या मुद्द्यांपैकी एक असून, जिथून भारतीय सशस्त्र दलात मोठ्या संख्येने सैनिकांची भरती केली जाते, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत, ज्यामध्ये भाजपा आणि काँग्रेसने प्रत्येकी पाच जागा जिंकल्या होत्या. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने सर्व १० जागा जिंकल्या. आगामी हरियाणा विधानसभा निवडणुकीतही भाजपाला टार्गेट करण्यासाठी काँग्रेस पुन्हा अग्निपथ तयार करत आहे.

राहुल गांधींवर ताशेरे ओढत अमित शाह म्हणाले की, या राहुल बाबांना अफवा पसरवण्याशिवाय काही काम नाही. त्यामुळे आपला हरियाणा इतका मागासलेला आहे. काँग्रेस सरकारमध्ये मुख्यमंत्र्यांच्या एका जिल्ह्यातच कामे झाली. भ्रष्टाचार वाढायचा. जेव्हा दुसरा मुख्यमंत्री सत्ता हस्तगत करायचा तेव्हा त्यांच्या जिल्ह्यात काम व्हायचे. भाजपाने सरकार स्थापन केल्यानंतर हरियाणात विकासकामे झाल्याचा दावा करत आमच्या भाजपा सरकारने ‘३६ बिरादरी’साठी काम केले. १० वर्षांत भ्रष्टाचार पूर्णपणे नष्ट झाल्याचा दावाही यावेळी केला.

हरियाणा विधानसभेची निवडणूक ५ ऑक्टोबरला होणार असून, ८ ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत