हॉटेल व्यावसायिक जया शेट्टी हत्याप्रकरणी कुख्यात गँगस्टर राजेंद्र निकाळजे ऊर्फ छोटा राजनला ठोठावण्यात आलेली जन्मठेपेची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी रद्द केली. तसेच त्याला याप्रकरणी जामीनही मंजूर केला. परंतु, अन्य खटल्यांमध्ये छोटा राजन आरोपी असल्यामुळे याप्रकरणी जामीन मिळूनही त्याला कारागृहातच रहावे लागणार आहे.
न्या. रेवती मोहिते-डेरे आणि न्या. पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने छोटा राजनला एक लाखाच्या वैयक्तिक जात मुचलक्यावर जामीन मंजूर केला. साल २००१ मधील हॉटेल मालक जया शेट्टीच्या हत्येप्रकरणात ठोठावलेल्या शिक्षेला स्थगिती देण्याची आणि जामीन मिळण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. छोटा राजनच्या याचिकेला केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) विरोध केला. याप्रकऱणी मुंबईतील विशेष सीबीआय न्यायालयाने ३० मे रोजी छोटा राजनसह अन्य तीन जणांना दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.
दक्षिण मुंबईतील ‘गोल्डन क्राउन’ हॉटेलचे मालक असलेल्या जया शेट्टीची त्यांच्या कार्यालयासमोर ४ मे २००१ रोजी दोन अज्ञात व्यक्तींनी गोळ्या झाडून हत्या केली होती. या घटनेनंतर अजय सुरेश मोहिते उर्फ अजय सुरजभान श्रेष्ठ या आरोपीला अटक करण्यात आली होती. नेपाळी उर्फ चिकनाला दोन बंदुकांसह पकडण्यात आले. त्याने जया शेट्टीवर गोळी झाडल्याचा आरोप आहे. तर सहआरोपी कुंदनसिंग रावत सुरुवातीला पळून जाण्यात यशस्वी झाला पण नंतर त्यालाही पोलिसांकडून अटक करण्यात आली. खटल्याच्या समाप्तीपूर्वी रावतचा मृत्यू झाला आणि अजय मोहिते पॅरोलवर असताना चकमकीत मारला गेला.
खटल्यादरम्यान, छोटा राजनकडून ५० लाखांच्या खंडणी कॉल आला होता तो देण्यास वडिलांनी नकार दिला होता, अशी जया शेट्टीच्या मुलांनी साक्ष दिली होती. फिर्यादीने आपला खटला संशयापलीकडे सिद्ध केलेला नाही आणि रेकॉर्डवरील पुरावे छोटा राजनला दोषी ठरवण्यासाठी अपुरे असल्याचा युक्तीवाद छोटा राजनच्या याचिकेत करण्यात आला. दरम्यान, जया शेट्टीला हेमंत पुजारी या टोळीतील सदस्याकडून खंडणीची धमकी देण्यात आली होती आणि खंडणीचे पैसे न दिल्याने त्याची हत्या केल्याचे तपासात समोर आले होते.
Marathi e-Batmya