मागास प्रवर्गाच्या सामाजिक उत्थानाच्या योजना बंद होत आहेत. ओबीसी एसटीएससी विद्यार्थ्यांच्या स्कॉलरशिप बंद करणे. हा या सरकारचा एजेंडा असल्याचे सांगत राज्यातील महाविकास आघाडीचा विजय हा केंद्रातील सत्ता बदल ठरेल दोन महिन्यात त्याचे परिणाम दिसतील असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केला.
राज्यातील महाविकास आघाडी आणि प्रागतिक रिपब्लिकन आघाडी यांच्या संयुक्त पत्रकार परिषदेत जितेंद्र आव्हाड हे बोलत होते. यावेळी या पत्रकार परिषदेस शिवसेना उबाठाचे नेते सुभाष देसाई, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड, यांच्यासह प्रागतिक रिपब्लिकन आघाडीचे श्याम गायकवाड, डेमोक्रॅटिक रिपब्लिकन आघाडीचे प्रा. सुकुमार कांबळे उपस्थित होते. तसेच माजी डिआयजी सुधाकर सुराडकर, सुनिल खोब्रागडे हे ही उपस्थित होते.
जितेंद्र आव्हाड पुढे बोलताना म्हणाले की, राज्यातील आणि देशातील हे सरकार दलित विरोधी आहे. दलित तसेच गरिबांच्या मुलांनी शिक्षण घेऊ नये असा अजेंडा भाजपा सरकारचा आहे. सरकारी नोकऱ्यामध्ये ठेकेदारीवर पदं नियुक्त केली जातात यामध्ये कर्मचाऱ्याचे नुकसान असून ठेकेदार असणाऱ्या राजकीय नेत्यांचा यामध्ये मोठा फायदा होतो असा आरोपही यावेळी केला.
रश्मी शुक्ला यांच्याबाबत बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले की, महाराष्ट्र राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांची झालेली बदली म्हणजे निवडणूक आयोगाला आता जाग आली का, असा सवाल करत म्हणाले की, रश्मी शुक्ला फोन टॅपिंग प्रकरणात होत्या. नाना पटोले यांचे नाव अहमजद खान ठेवून त्यांचा स्मगलिंगचा धंदा असल्याचे नावापुढे लिहीलं होतं. पेग्यॅसिसचा वापर सरकारची चमचेगिरी करणाऱ्यांनी केला. जो सरकारच्या पुढाऱ्यांचं ऐकत नाही त्याची अशा पोलिस अधिकाऱ्याची आठ तासात बदली केली जाते अशी दडपशाही या सरकारने चालविली असल्याचा आरोपही यावेळी केला.
यावेळी बोलताना काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या की, या सरकारने सामाजिक न्याय या महत्वाच्या खात्याला स्वतंत्र मंत्रीच दिला नाही, मुख्यमंत्र्यांनी हे खातं आपल्याकडेच ठेवलं विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळत नाही. आरक्षण संपवून खाजगीकरण चालू आहे अशी टीका करत केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील महायुती सरकारवर घणाघाती टीका केली.
शिवसेना उबाठा गटाचे नेते सुभाष देसाई म्हणाले की, लोकसभा निवडणूकीत सर्व रिपब्लिकन फुले शाहू आंबेडकर विचारवादी आणि अल्पसंख्यांक समाजाच्या आघाडी देशात इंडीया आघाडी सोबत होती. त्यामुळे संविधानवादी जनतेच्या सहकार्यामुळे चार सौ पारचा नारा देणारे २४० वर थांबले. आमच्या सोबत साहित्यिक अर्जुन डांगळे असल्याचेही यावेळी सांगितले.
प्रागतिक रिपब्लिकन आघाडीचे श्याम गायकवाड म्हणाले की, आंबेडकरी जनता कोणत्याही पक्षाशी बांधील नाही. राज्यातील युती सरकारला हाकलण्यासाठी ती एकत्र आली असून हे शासन जातीयवादी फॅसीस्टवादी असल्याचा आरोप केला.
डेमोक्रॅटिक रिपब्लिकन आघाडीचे प्रा. सुकुमार कांबळे म्हणाले की, आमच्या समाजासाठी बजेट मध्ये २५ टक्के तरतूद असताना या सरकारने ती ५ टक्क्यावर आणली. आमच्या हक्काचे पैसे या सरकारने लाडकी बहिण योजना, तीर्थदर्शन योजना, वारकऱ्यांसाठी आमचा पैसा वळवला अशा सरकारला घालवलं पाहिजे यासाठी आम्ही महाविकास आघाडी सोबत आहोत असेही यावेळी सांगितले.
Marathi e-Batmya