राज्यातील विधानसभा निवडणूकीसाठी मतदानाची प्रक्रिया पार पडल्यानंतर २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी पार पडत आहे. या मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर अनेक खाजगी कंपन्यांनी एक्झिट पोलचे अंदाज जाहिर करत राज्यातील महायुती आणि महाविकास आघाडीला मिळणाऱ्या जागांचे अंदाज वर्तविले आहे. यापैकी एखादं-दुसरा अपवाद वगळता बहुतांष एक्झिट पोल जाहिर करणाऱ्यांनी महायुतीच्या बाजूनं विधानसभेतील बहुमताचा आकडा टाकला आहे. तर महाविकास आघाडीच्या बाजूनं कमी जणांनी बहुमताचा अंदाज वर्तविला आहे.
राज्यातील कोणत्या मतदारसंघात कोणत्या पक्षाच्या उमेदवाराला आणि वारं कोणाच्या बाजूनं गेलं याचा अंदाज प्रत्येक पक्षाच्या कोअर टीमला चांगलाच आलेला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील पक्ष आणि महायुतीतील राजकिय पक्षांकडून सावध भूमिका व्यक्त करण्यात येत आहे. मात्र या दोन्ही महायुती आणि महाविकास आघाड्यांकडून अपक्ष आमदार आणि बंडखोर आमदारांना पुन्हा एकदा चुचकारण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. ज्या उमेदवारांनी ज्या पक्षाच्या उमेदवारांच्या विरोधात बंडखोरी केली. त्या बंडखोरांनी पुन्हा एकदा स्वपक्षाच्या नेत्यांच्या हाकेला ओ दिला आहे. त्यात महाविकास आघाडीचे उमेदवार आणि महायुतीच्या उमेदवारांचाही समावेश आहे.
तरीही काँग्रेस, शिवसेना उबाठा आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून पक्षाच्या अधिकृत उमेदवारांच्या विरोधात निवडणूक लढविलेल्या बंडखोरांशी संपर्क करण्यात येत असून विजयी झाल्याचे प्रमाणपत्र घेऊनच मुंबई गाठा असे आदेश पक्षाच्या संभावित आमदारांसह बंडखोरांनाही निरोप दिले जात आहेत. तर भाजपा, शिंदेंच्या शिवसेनेत आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीत तशी तुलनेते कमी बंडोखोरी झाली आहे. त्यामुळे जे पक्षाचे सदस्य नसलेले मात्र अपक्ष आमदार म्हणून निवडणूकीला सामोरे गेलेल्या आमदारांना तसेच लहान राजकिय पक्षाच्या नावाखाली निवडणूक लढविलेल्या आमदारांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न भाजपा आणि महायुतीच्या नेत्यांकडून सुरु करण्यात आला आहे. अशा आमदारांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शासकिय निवासस्थान असलेल्या सागर बंगल्यावर चर्चेसाठी बोलाविण्यात येत आहे. तर काहींना फोनवरूनच कळविले जात आहे.
या सर्व अपक्ष आणि बंडखोर आमदारांना विजयाची घौडदोड पूर्ण होताच तडक मुंबई गाठण्यास सांगण्यात येत असून त्यासाठी मुंबईतील काही पंचतारांकीत हॉटेल्सही बुक करण्यात आल्याची चर्चा मुंबईच्या राजकिय वर्तुळात सुरु झाली आहे. राज्यातील मतदानाच्या आधारे महायुतीला १२० ते १३० इतकेच संख्याबळ मिळणार असल्याचे स्पष्ट होत आहे. तर महाविकास आघाडीचे १५० च्या आसपास आमदार निवडूण येणार असल्याची चर्चा सुरु आहे. त्यामुळे महायुतीकडून सर्वाधिक बंडखोर आणि अपक्ष आमदारांशी संपर्क साधण्याचे प्रयत्न करण्यात येत असून या अपक्ष-बंडखोरांना जास्तीत जास्त आमिषे दाखविण्याचा प्रयत्न केला जात आहे.
तर दुसऱ्याबाजूला महाविकास आघाडी १५० जागांवर विजय मिळणार असल्याबाबतचा आत्मविश्वास आहे. त्यामुळे महाविकास आघाडीकडून फक्त महाविकास आघाडीतील बंडखोरांशीच संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र उद्या शनिवारी मतमोजणीत महायुतीला आणि महाविकास आघाडीला किती जागा मिळणार यावरच या अपक्ष आमदारांच्या पाठिंब्याची किंमत ठरणार आहे.
दरम्यान, भाजपा पुरस्कृत काही आमदारांनी आज मुंबईत सागर बंगल्यावर आपली पायधुळ झाडल्याची चर्चा आहे. यात प्रहार पक्षाचे बच्चू कडू, मनसेचे बाळा नांदगांवकर यासह अन्य काही जणांनी भेट देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याचे बोलले जात आहे.
Marathi e-Batmya