देवेंद्र फडणवीस यांचा नेमका कोणाला टोला, उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे अडीच वर्षात कोणी सोडून गेलं नाही- जनतेचा कौल हिसकावून घेण्यात आला

राज्यातील महायुतीला संशयातीत बहुमत मिळविल्यानंतरही मुख्यमंत्री पदाचा घोळ तब्बल १० दिवस सुरु राहिला. त्यानंतर आज विधानसभेत सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपाच्या विधिमंडळाच्या गटनेते पदी भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांची निवड करण्यात आली. विधान भवनातील सेंट्रल हॉलमध्ये आयोजित या बैठकीला भाजपाचे केंद्रीय निरिक्षक गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपानी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांच्या उपस्थितीत होते. भाजपा आमदारांनी एकमताने निवड करण्यात आल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी भाजपाच्या आमदारांना मार्गदर्शन केले. मात्र हा संवाद साधताना देवेंद्र फडणवीस यांनी अप्रत्यक्ष उद्धव ठाकरे यांना लक्ष्य करत टोला लगावला.

यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, २०१९ साली राज्यात महायुतीला जनतेने कौल दिला. तरीही त्यावेळी युतीला मिळालेला कौल हिसकावून घेण्यात आला आणि जनतेशी बेईमानी केली. त्यानंतर मागील अडीच वर्षात आपल्या आमदारांना मोठ्या प्रमाणावर त्रास देण्यात आला. परंतु आपल्यातील कोणीही सोडून गेला नाही असे सांगत शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता आणि अप्रत्यक्ष एकनाथ शिंदे यांना टोला लगावला.

पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मागील अडीच वर्षाच्या काळात सगळे आमदार, सगळे नेते संघर्ष करत होते, २०२२ मध्ये आपलं सरकार सत्तेवर आलं. आता पूर्ण बहूमत मिळालं असून महायुतीला २३० हून अधिक जागा मिळाल्या. हा इतिहास अभूतपूर्व असल्याचे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मी आभार मानेन, बुथ कार्यकर्ता म्हणून सुरुवात केलेल्या माझ्या सारख्या कार्यकर्त्याला मोदींनी संधी दिली. हा पक्ष मोदींच्या नेतृत्वात मोठा झाला. त्यामुळे मी पंतप्रधान मोदी आणि अमित शाह आणि जे पी नड्डा यांचे आभार मानतो असेही यावेळी सांगितले.

शेवटी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्र भाजपा पूर्ण ताकदीने उतरला असून पुढची वाट ही संघर्षाची आणि अपेक्षा पूर्ण संदर्भातील आहे. आपलं हे महायुतीचं सरकार असून सगळ्या मित्रांना एकदिलाने घेऊन पुढे घेऊन जायचं आहे. सगळ्यांच्या मनात असलेल्या गोष्टी पूर्ण करता येत नाहीत. आपण मोठं लक्ष्य घेऊन चाललो आहोत. येत्या काळात चार गोष्टी मनासारख्या होतील तर चार गोष्टी मनाच्या विरुद्ध होतील. तरीही आपण पूर्ण शक्तीनिशी काम करू असेही यावेळी सांगितले.

About Editor

Check Also

आरटीई अंतर्गत १७ फेब्रुवारीपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू १० मार्च पर्यंत करता येणार अर्ज

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमांतर्गत (आरटीई) दुर्बल आणि वंचित घटकातील बालकांना स्वयं अर्थसहाय्यित …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *