राज्यातील विधानसभा निवडणूकीत काँग्रेस पक्षाचा पराभव झाल्यानंतर प्रदेशाध्यक्ष असलेल्या नाना पटोले यांच्या जागी नव्या व्यक्तीची निवड करण्याची चाचपणी काँग्रेसकडून करण्यात येत होती. मात्र राज्याच्या राजकारणात फारसे परिचित नसलेल्या हर्षवर्धन सपकाळ यांची निवड काँग्रेसने प्रदेशाध्यक्ष पदी केली. त्यामुळे काँग्रेसमधील मुरब्बी नेत्यांबरोबरच तरूण नेत्यांमध्येही आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. त्यातच प्रदेशाध्यक्ष पदासाठी ज्यांच्या नावाची चर्चा सुरु होती, त्या सतेज बंटी पाटील आणि विश्वसजीत कदम यांनाही हर्षवर्धन सपकाळ यांच्या निवडीने धक्का बसला असून सपकाळ यांची निवड स्विकारणे अवघड वाटत असल्याचे बोलले जात आहे.
वास्तविक पाहता हर्षवर्धन सपकाळ हे राज्यात फारसे सक्रिय नव्हते. सपकाळ हे २०१४ ते २०१९ पर्यंत आमदार म्हणून निवडूण आले होते. मागच्या पाच वर्षात त्यांनी काँग्रेस पक्षाची भूमिका मांडल्याचे ऐकिवात आले नाही की, विधानसभेत भाजपा सरकारवर टीका करताना पाहिले नाही इतकेच नाही तर भाजपाकडून महाविकास आघाडीचे सरकार पाडले जात असतानाही ते कुठे दिसले नाही. त्यामुळे फारच नवख्या हर्षवर्धन सपकाळ यांच्या निवडीने काँग्रेसमध्ये आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान या मुद्यावर बोलताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, पक्षाचे नेतृत्व करण्यासाठी काँग्रेसने माझ्याशी संपर्क साधला होता. मात्र आपण त्यास नकार देत नव्या नेतृत्वाकडे ही जबाबदारी सोपवावी अशी सूचना करत त्यासाठी सतेज पाटील यांचे नाव आपण सुचविले होते. पण पक्षाने हर्षवर्धन सपकाळ यांच्या नावाची घोषणा झाली. त्यामुळे मला आश्चर्य वाटले. त्यांचे नाव ही चर्चेत कधी नव्हते. कदाचित सतेज पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष पदासाठी नकार दिला असावा असेही यावेळी सांगितले.
पुढे बोलताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, हर्षवर्धन सपकाळ यांना काँग्रेस पक्षाबरोबर महाविकास आघाडीच्या नेत्याशी समन्वय ठेवावा लागणार आहे. यात शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांच्या समावेश आहे. जर प्रस्थापित नेत्यांनी हे पद स्विकारण्यास नकार दिला असेल तर पक्षासमोर फारसा पर्याय उरला नसेल. त्यामुळे आमच्यासाठी हा विषय संपला असून हर्षवर्धन सपकाळ कसे काम करतात हे पाहू असेही यावेळी स्पष्ट केले.
यावर काँग्रेस नेते सतेज बंटी पाटील म्हणाले की, पक्षाने योग्य निर्णय घेतला आहे. हर्षवर्धन सपकाळ हे उत्तम संघटक आहेत. पक्षाच्या कार्यकर्त्यांना एकत्र बांधून नेण्यासाठी आवश्यक असणारे कौशल्य त्यांच्याकडे आहे. पक्षाच्या कार्यकर्त्यांना प्रशिक्षत करून भविष्यातील आव्हानाचा सामना करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे. त्यांच्यावर आतापर्यंत कोणतेही आरोप झालेले नाहीत. तसेच ते तटस्थ व्यक्ती आहे. त्यांची कारकिर्द जिल्हा परिषद अध्यक्ष आणि आमदार म्हणून काम केलेले आहे. ते सकाळी कार्यालयात येतात रात्रीपर्यंत सर्वांना भेटतात वेळ देत असल्याचेही यावेळी सांगितले.
पुढे बोलताना सतेज बंटी पाटील म्हणाले की, हर्षवर्धन सपकाळ यांची काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदी निवड झाल्यानंतर राज्यभरातील नेत्यांकडून आणि कार्यकर्त्याकडून फोन येत आहेत. प्रदेशाध्यक्ष पदाच्या जबाबदारीवरून विचारले असता संतेज पाटील म्हणाले, चार वर्षे हे पद सांभाळणे माझ्यासाठी अवघड होते. हे पद फार तर मी दोन वर्षे सांभाळलो असतो. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष पदाच्या शर्यतीततून माघार घेतली. आज पक्षाला पुर्नरुजिवीत करणे ही प्राथमिकता आहे. त्यासाठी लागणारा वेळ आणि शक्ती सपकाळ यांच्याकडे असून ते प्रत्येक जिल्ह्यात भेटी देतील आणि नेत्यांमधील मतभेद दूर करून कार्यकर्त्यांना एकत्र करून पुढे नेतील पक्षाला पुन्हा ऊर्जितावस्था आणतील अशी आशाही यावेळी व्यक्त केली.
तर यासंदर्भात विश्वजीत कदम यांना विचारले असता ते म्हणाले की, हर्षवर्धन सपकाळ यांच्या निवडीचे कारण तुम्ही पक्षालाच विचारा, मी तर कधीच प्रदेशाध्यक्ष पदाच्या शर्यतीत नव्हतो.
तर सचिन सावंत म्हणाले की, हर्षवर्धन सपकाळ हे अनेक वर्षापासून पक्षात कार्यरत आहेत. ते एनएसयुआयचे अध्यक्ष होते. पक्षाने त्यांना पद देताना अनेक पैलूंचा विचार केला असेल कार्यकर्त्याला संधी देऊन पक्षाने एक चांगला निर्णय घेतला आहे.
Marathi e-Batmya