मुख्यमंत्री फडणवीस यांचे आश्वासन, लोकसंख्येच्या प्रमाणात पोलीस भरतीला प्राधान्य पोलीस दलाला बळकटी देणाऱ्या इमारतीचे उद्घाटन

राज्यात आदर्श पोलीस प्रशासन निर्माण करण्यासाठी लोकसंख्येच्या अनुरुप पोलीसांची संख्या ठेवली जाणार आहे. त्यामुळे गृह विभागामार्फत नव्याने ४० हजार पोलीसांची भरती केली आहे. यापुढेही राज्यात पोलीस भरतीला प्राधान्य देणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

सांगली जिल्हा पोलीस दलाच्या वतीने बांधण्यात आलेल्या तीन इमारतींचे उद्घाटन व निवासस्थान इमारतीच्या भूमिपूजन कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते.

यावेळी राज्याचे उच्च शिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडिक, खासदार विशाल पाटील, आमदार सर्वश्री  अरुण लाड, जयंत पाटील, डॉ. सुरेश खाडे, सुधीर गाडगीळ, डॉ. विश्वजीत कदम, गोपीचंद पडळकर, सत्यजीत देशमुख, सुहास बाबर, अमल महाडिक,मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, जिल्हाधिकारी अशोक काकडे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, महानगरपालिका आयुक्त सत्यम गांधी, पोलीस महासंचालक तथा व्यवस्थापकीय संचालक अर्चना त्यागी, विशेष पोलीस महानिरीक्षक (कायदा व सुव्यवस्था) मनोजकुमार शर्मा, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक (प्र) डॉ. शशिकांत माहवरकर, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अपर पोलीस अधीक्षक रितू खोखर आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, पोलीस गृहनिर्माण महामंडळातर्फे राज्यातील पोलीस कार्यालय व पोलीसांच्या निवासस्थानासाठी निधी उपलब्ध करुन दिला आहे.सध्या ९४ हजार निवासस्थाने उपलब्ध झाली आहेत. प्रत्येक जिल्ह्यात फॉरेंन्सिक व्हॅन उपलब्ध करुन देण्यात येत असून सायबर गुन्ह्यांच्या उकलीमध्ये देशात महाराष्ट्र पोलीस अव्वल असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले. अंमली पदार्थाच्या तस्करीत, व्यवसायात, पोलीसांचा सहभाग आढळल्यास संबंधीत पोलीसाला निलंबित न करता थेट बडतर्फ करण्याचा इशारा देत अंमली पदार्थांच्या बाबतीत झिरो टॉलरन्स असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यात गुन्हेगार मोकाट सुटणार नाही हा विश्वास राज्यातील सामान्य माणसाला वाटेल अशा रितीने पोलीस विभाग कार्यरत राहील मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. पोलीस गृहनिर्माण महामंडळाने राज्यातील निवासस्थाने अतिशय गुणवत्तापूर्वक उभी केली असल्याबद्दल त्यांनी पोलीस महासंचालक तथा व्यवस्थापकीय संचालक अर्चना त्यागी यांचे विशेष अभिनंदन केले.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, जिल्ह्याचे पोलीस दल अधिक सक्षम करण्यासाठी शासन कटीबध्द असून त्याला योग्य तो निधी दिला जाईल, तसेच जिल्ह्यात ड्रग्ज विरोधी मोहिम प्रभावीपणाने राबविली जाईल. जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था  अबाधित रहावी यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हा वार्षिक योजनेतून प्राप्त सुमारे २ कोटी १३ लाख इतक्या रुपयांच्या १६ वाहनांचे लोकार्पण त्याचबरोबर सायबर विभाग अधिक गतिशील व्हावा या उद्देशाने जिल्हा वार्षिक  योजनेतून प्राप्त झालेले सुमारे १५० संगणक, १५० स्कॅनर तर ४० मल्टी फंक्शन प्रिंटरचे सायबर विभागाला हस्तांतरण केले. तत्पूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयाची नवीन प्रशासकीय इमारत त्याचबरोबर कडेगाव व आटपाडी पोलीस ठाण्याच्या इमारतींचे उद्घाटन तर सांगली येथे पोलिसांसाठी उभारण्यात येणाऱ्या २२४ सदनिकांचे रिमोटद्वारे भुमिपूजन केले.

जिल्ह्यात ६ उपविभाग कार्यरत असून सांगली व मिरज या दोन विभागाकरिता सदनिका मंजूर झाल्या आहेत. नवीन पोलीस मुख्यालय इमारतीमध्ये आधुनिक सुविधांनी युक्त कार्यालये, प्रशिक्षण हॉल्स, अधीक्षक कार्यालय, गुन्हे अन्वेषण विभाग, आणि कर्मचारी वसतिगृहे यांचा समावेश आहे.

या नव्या सुविधांमुळे जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या कार्यात अधिक कार्यक्षमता येईल असा विश्वास व्यक्त करुन जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्याला जिल्हा पोलीस दलाचे प्राधान्य असल्याचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी प्रास्ताविकामध्ये सांगितले.

सांगली शहरामध्ये उभारण्यात आलेल्या या पोलीस अधीक्षक कार्यालय, नवीन प्रशासकीय इमारतीमध्ये जिल्हा पोलीस प्रमुखांचे कार्यालय, विविध शाखांचे स्वतंत्र विभाग, सुसज्ज कॉन्फरन्स हॉल, तांत्रिक सुविधांनी सज्ज विभाग, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग यंत्रणा, महिलांसाठी स्वतंत्र कक्ष आदींचा समावेश आहे. ही इमारत पूर्णतः सीसीटीव्ही प्रणाली अंतर्गत सुरक्षित असून शाश्वत ऊर्जा वापराच्या दृष्टीने सौरऊर्जा सुविधांनाही प्राधान्य देण्यात आले आहे. दिव्यांगांसाठी अनुकूल पायाभूत सुविधा, प्रशस्त पार्किंग व स्वच्छतागृहे, ऊर्जा कार्यक्षम रचना व हरित इमारत, रेन वॉटर हर्वेस्टींग या संकल्पना राबविण्यात आली आहे.

या इमारतीत चार मजले असून ५२४४ चौ.मी. इतके बांधकाम क्षेत्रफळ आहे.  सुमारे १४ कोटी ३४ लाख रुपये खर्च झाला. या उद्घाटन सोहळ्याला पोलीस अधिकारी, कर्मचारी, आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार प्रदर्शन अपर पोलीस अधीक्षक रितू खोखर यांनी केले.

About Editor

Check Also

अमरावतीच्या अंबादेवी संस्थानास चिखलदरा येथील एमटीडीसीची तीन एकर जमीन राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

अमरावती जिल्ह्यातील मौजे चिखलदरा येथील श्री अंबादेवी संस्थान, अमरावती यांना महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची ३ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *