हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल, आणीबाणीबाबत बाळासाहेबांची भूमिका भाजपाला मान्य नाही का? पण ११ वर्षापासून सुरु असलेल्या अघोषित आणीबाणीचे काय?

देशातील तत्कालीन परिस्थितीमुळे इंदिराजी गांधी यांना आणीबाणीचा निर्णय घ्यावा लागला होता. त्यावेळी झालेल्या काही घटनांवर इंदिराजी, सोनियाजी व राहुलजी गांधी यांनी प्रशासनाकडून काही चूका झाल्याचे मान्य केले आहे पण भाजपा मात्र आणीबाणीवर फक्त कांगावा करत आहे. रा. स्व. संघाचे सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांनी आणीबाणीचे समर्थन केले होते. तसेच जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनाशी आरएसएसचा संबंध नाही असेही जाहिर केले होते. भाजपाला बाळासाहेब देवरसांची भूमिका मान्य नाही का? असा सवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी विचारला.

टिळक भवन येथे पत्रकार परिषदेत बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपाचा खरपूस समाचार घेताना म्हणाले की, पंतप्रधान इंदिर गांधी यांनी १९७५ साली आणीबाणी लागू करण्याचा जो निर्णय घेतला होता तो संविधानिक होता. देशात काही शक्ती अराजक निर्माण करू पहात होत्या. नंतर आणीबाणी उठवून निवडणुका घेतल्या आणि लोकशाही प्रक्रिया पार पाडली. इंदिर गांधी यांनी आणीबाणीवेळी देशाची संपत्ती विकली नाही, सार्वजनिक क्षेत्रातील  कंपन्या उद्योगपतींच्या घशात घातल्या नाहीत. पण देशात मागील ११ वर्षांपासून अघोषीत आणीबाणी सुरु आहे, विमानतळ, बंदरे, खाणी, बँका, सरकारी जमिनी लाडक्या उद्योगपतीला विकल्या जात आहेत. धारावीची जमीन विकली आहे. देशात आज हुकूमशाही असून भाजपाचा भस्मासूर लोकशाही गिळू पहात असल्याचेही यावेळी सांगितले.

सरकारी जाहिरातीत राजमुद्रा गायब करून सेंगोल कसा?

हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, भारतीय जनता पक्षाच्या सरकारने आज आणीबाणी संदर्भात कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी करत जाहिरातबाजी केली आहे. सरकारी जाहिरातीतून राजमुद्रा गायब असून सेंगोल दाखवला आहे. सेंगोल कशाचे प्रतिक आहे, हे वेगळे सांगायला नको. भाजपाला लोकशाही व संविधान संपवून गोलवलकर यांचे ‘बंच ऑफ थॉट’ लागू करायचे आहे, असेही सांगितले.

काँग्रेस मुख्यपत्र शिदोरीचा आणीबाणी विशेष अंक

पुढे बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, काँग्रेस पक्षाचे मुख्यपत्र जनमानसाची शिदोरी या मासिकाचा आणीबाणी विशेष अंक काढला आहे. या अंकात इंदिर गांधी, पुपुल जयकर, ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर, दैनिक सामनाचे संपादक व खा. संजय राऊत यांच्यासह अनेक ज्येष्ठ लेखकांनी लेख लिहिले आहेत. या अंकातून आणीबाणी संदर्भातील सत्य लोकांसमोर आणले जाणार असून भाजपच्या खोट्या प्रचाराला चोख उत्तर मिळेल असेही सांगितले.

मतचोरीची उच्चस्तरीय चौकशी करा..

हर्षवर्धन सपकाळ पुढे बोलताना म्हणाले की, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी विधानसभा निवडणुकीतील मतचोरीसंदर्भात ट्वीट करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघात ८ टक्के मतदार वाढले हे आरटीआयमधून उघड झाले आहे. फडणवीसांविरोधात निवडणूक लढलेले काँग्रेस उमेदवार प्रफुल्ल गुडदे पाटील यांनी ही माहिती मागविली आहे. विशिष्ट मोबाईल नंबरवरून अनेक मतदारांची नोंद केल्याचेही स्पष्ट झालेले आहे. याची शहानिशा करावी असे निवडणूक आयोगाने सांगितले पण शहानिशा केलेली नाही. गुडदे पाटील यांनी न्यायालयात दोन याचिकाही दाखल केलेल्या आहेत. फडणवीस यांनी या सर्व प्रश्नांची उत्तरे दिलेला नाहीत. या मतचोरीची उच्चस्तरीय चौकशी करावी व चौकशी होईपर्यंत त्यांनी पदावरून दूर रहावे असेही सांगितले.

चांदीच्या ताटात पाहुणचार..

शेवटी बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, संसद व विधिमंडळ अंदाज समितीतील लोकांनी पाच हजार रुपयांचे शाही भोजन, ५५० रुपये भाड्याच्या चांदीच्या ताटात पाहुणचार झोडला तो धुळे विश्रामगृहातील खोली क्रमांक १०२ मध्ये सापडलेल्या अंदाज समितीच्या पैशातून होता का, असा प्रश्न विचारून अंदाज समितीच्या तमाशाचा हा दुसरा वग आहे. शाही पाहुणचार झोडून काटकसर कशी करायची, हे समितीने सांगितले असावे. शेतक-यांना कर्जमाफी द्यायला, लाडक्या बहिणीला २१०० रुपये देण्यास पैसे नाहीत आणि मेजवाणी झोडण्यासाठी मात्र पैसे असल्याचेही यावेळी सांगितले.

About Editor

Check Also

शिवेंद्रसिंह राजे भोसले यांचा निर्णय, शासकीय निवासस्थानांच्या चटई क्षेत्रफळात वाढ सरकारी कर्मचारी-अधिकाऱ्यांना मोठ्य़ा आकाराची घरे मिळणार

राज्यातील शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात येणाऱ्या शासकीय निवासस्थानांच्या चटई क्षेत्रफळात सुधारणा करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *