युवक काँग्रेसची मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान ‘वर्षा’ बंगल्यावर धडक डॉ. संपदा मुंडेंना न्याय देण्याच्या मागणीसाठी युवक काँग्रेस आक्रमक

फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्येप्रकरणी युवक काँग्रेसने मुंबईत आज तीव्र आंदोलन केले. युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान वर्षा बंगल्यावर थेट धडक दिली. नरीमन पॉइंट, मरीन ड्राईव्ह व वर्षा बंगला अशा तीन ठिकाणी युवक काँग्रेसने आंदोलन करून भाजपा महायुती सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणी दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली.

महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस व मुंबई युवक काँग्रेसने आयोजित केलेल्या या आंदोलनात युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदन भानू चिब, युवक काँग्रेसचे प्रभारी मनिष शर्मा, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे, मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्ष झीनत शबरीन, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष राजेश शर्मा, वरिष्ठ प्रवक्ते सचिन सावंत, युवक काँग्रेसचे प्रभारी अजय चिकारा यांच्यासह शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

गिरगाव चौपाटी येथून सुरु झालेले आंदोलन थेट वर्षा बंगल्यावर पोहचले. युवक काँग्रेसचे आंदोलन दडपून टाकण्यासाठी सरकारने पोलिसांच्या मदतीने प्रयत्न केला. अनेक कार्यकर्त्यांना चर्नी रोड स्थानकात अडवून ठेवले. गिरगाव चौपाटी भागातही ठिकठिकाणी बॅरिकेटींग करून कार्यकर्त्यांची धरपकड केली. पण आक्रमक कार्यकर्त्यांनी वानखेडे स्टेडियमजवळ मरिन ड्रायव्हवरच रास्ता रोको केला, यामुळे जवळपास अर्धा तास वाहतुक ठप्प झाली होती. पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले पण युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तन्वीर अहमद विद्रोही, लातूर जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष प्रविणकुमार बिराजदार आणि नागपूर ग्रामीण जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष मिथिलेश कान्हेरे यांनी मात्र पोलिसांना गुंगारा देऊन वर्षा बंगल्यावर धडक मारली व जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्यासह सर्व नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते यांना ताब्यात घेतले.

डॉ. संपदा मुंडे यांना भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व पोलीसांच्या अनन्वित छळाला कंटाळून आत्महत्या करावी लागली. पोलिसांनी याप्रकरणी दोघांना अटक केली असली तरी यामागचा मुख्य सुत्रधार भाजपाचा माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर मात्र अद्याप मोकाटच आहे. मुख्यमंत्र्यांनी तर निंबाळकरांना कोणत्याही चौकशी आधीच क्लिन चिट देऊन टाकली आहे. काँग्रेस पक्षाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. डॉ. संपदा मुंडे यांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मुंडे कुटुंबियांना दिली आहे. सरकार चौकशीच्या नावाखाली मुख्य आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे, पण जोपर्यंत संपदा मुंडे यांना न्याय मिळत नाही, तोपर्यंत काँग्रेसचा हा लढा सुरुच राहील.

About Editor

Check Also

अमरावतीच्या अंबादेवी संस्थानास चिखलदरा येथील एमटीडीसीची तीन एकर जमीन राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

अमरावती जिल्ह्यातील मौजे चिखलदरा येथील श्री अंबादेवी संस्थान, अमरावती यांना महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची ३ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *