व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांच्या अटकेनंतर न्यूयॉर्कच्या तुरुंगात रवानगी त्यांची पत्नी आणि मुलांनाचीही तुरुंगात रवानगी

अमेरिकन सैन्याने काराकासमध्ये केलेल्या कारवाईत व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो आणि त्यांच्या पत्नीसह ताब्यात घेतले. त्यानंतर रविवारी न्यूयॉर्कमधील एका नजरकैद केंद्रात हलवण्यात आले. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या दक्षिण अमेरिकन नेत्याला ताब्यात घेण्यासाठी आणि देशावर व त्याच्या प्रचंड तेलसाठ्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी छाप्याचे आदेश दिले होते.

पदच्युत झालेल्या ६३ वर्षीय नेत्यावर ‘नार्को-टेररिझम’ (अंमली पदार्थ-दहशतवाद) प्रकरणी फौजदारी खटला चालवला जाणार आहे, असे ट्रम्प प्रशासनाने म्हटले आहे. निकोलस मादुरो यांचे सरकार अंमली पदार्थांच्या निर्मितीमध्ये, कार्टेलना आश्रय देण्यात आणि “अमेरिकन लोकांचे जीवन उद्ध्वस्त करण्यासाठी” अमेरिकेत अंमली पदार्थांची तस्करी करण्यात सामील होते, असा आरोप त्यांच्यावर आहे. अमेरिकेने व्हेनेझुएलाचा कारभार तात्पुरता हाती घेऊन, इतर राष्ट्रांना विक्रीसाठीही त्याच्या मोठ्या तेलसाठ्याचा वापर केला जाईल, अशी घोषणा डोनाल्ड ट्रम्प यांनी केली.

निकोलस मादुरो यांच्यावर न्यूयॉर्कमध्ये त्यांची पत्नी, मुलगा आणि इतर तिघांसोबत आरोप ठेवण्यात आले आहेत. व्हेनेझुएलाच्या राष्ट्राध्यक्षांवर चार आरोपांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे – नार्को-टेररिझमचा कट, कोकेन आयातीचा कट, मशीनगन आणि विनाशकारी उपकरणे बाळगणे आणि मशीनगन व विनाशकारी उपकरणे बाळगण्याचा कट. ते सोमवारी मॅनहॅटन फेडरल न्यायालयात पहिल्यांदा हजर होण्याची शक्यता आहे.

निकोलस मादुरो यांना ताब्यात घेतल्याची घोषणा करताना, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, अमेरिका या दक्षिण अमेरिकन देशाचा कारभार तात्पुरता हाती घेईल आणि इतर राष्ट्रांना विक्रीसाठी त्याच्या प्रचंड तेलसाठ्याचा वापर करेल. “जोपर्यंत आपण सुरक्षित, योग्य आणि न्याय्य सत्तांतर करू शकत नाही, तोपर्यंत आम्ही देशाचा कारभार चालवू,” असे सांगत डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगत पुढे म्हणाले की, “ही अत्यंत यशस्वी कारवाई अमेरिकेच्या सार्वभौमत्वाला धोका निर्माण करणाऱ्या किंवा अमेरिकन लोकांचे जीवन धोक्यात घालणाऱ्या कोणालाही इशारा म्हणून काम करेल.”

दरम्यान, व्हेनेझुएलाच्या सर्वोच्च न्यायालयाने उपराष्ट्रपती डेल्सी रॉड्रिग्ज यांची हंगामी राष्ट्राध्यक्ष म्हणून नियुक्ती केली. प्रशासकीय सातत्य आणि राष्ट्राच्या सर्वसमावेशक संरक्षणाची हमी देण्यासाठी रॉड्रिग्ज “व्हेनेझुएलाच्या बोलिव्हियन प्रजासत्ताकाच्या राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारतील,” असा निर्णय न्यायालयाने दिला.

‘ऑपरेशन ॲब्सोल्यूट रिझॉल्व्ह’ नावाचे हे ऑपरेशन शनिवारी स्थानिक वेळेनुसार पहाटे २.०० वाजताच्या सुमारास पार पडले, जेव्हा एफबीआय आणि सीआयएच्या मदतीने अमेरिकेच्या डेल्टा फोर्सच्या विशेष कमांडोंनी काराकासमधील फोर्ट टियुना लष्करी संकुलातील राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांच्या मुख्य निवासस्थानात प्रवेश केला.

व्हेनेझुएला सरकारने या लष्करी आक्रमणाचा निषेध केला असून, ही एक अत्यंत गंभीर घटना आहे आणि त्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाच्या हस्तक्षेपाची आवश्यकता आहे, असे म्हटले आहे. “या हल्ल्याचा उद्देश व्हेनेझुएलाची सामरिक संसाधने, विशेषतः तेल आणि खनिजे ताब्यात घेणे आणि राष्ट्राचे राजकीय स्वातंत्र्य जबरदस्तीने हिरावून घेण्याचा प्रयत्न करणे हाच आहे. ते यशस्वी होणार नाहीत,” असे व्हेनेझुएलाने म्हटले आहे. या कारवाईदरम्यान अमेरिकन सैन्याने काराकास आणि इतर भागांवर बॉम्बफेक केली, ज्यामुळे वीज ग्रीडसह महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधांचे नुकसान झाले. न्यूयॉर्क टाइम्सच्या वृत्तानुसार, रात्री झालेल्या या हल्ल्यात किमान ४० लोक ठार झाले.

निकोलस मादुरोच्या अटकेवर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या, काही नेत्यांनी या कृतीचा निषेध केला, तर इतरांनी तिचे स्वागत केले. क्युबाच्या अध्यक्षांनी या कारवाईचे वर्णन अमेरिकेने केलेला “राज्य दहशतवाद” असे केले, तर ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर म्हणाले की, “त्यांच्या राजवटीच्या समाप्तीबद्दल ब्रिटनला कोणतेही दुःख नाही”. व्हेनेझुएलाचे प्रमुख समर्थक असलेल्या रशिया आणि चीन या दोन्ही देशांनी अमेरिकेवर टीका केली. बीजिंगने म्हटले की, “आम्ही अमेरिकेच्या अशा वर्चस्ववादी वर्तनाचा तीव्र विरोध करतो, जे आंतरराष्ट्रीय कायद्याचे गंभीर उल्लंघन आहे”.

भारताने व्हेनेझुएलावरील अमेरिकेच्या हल्ल्यांबद्दल “गहन चिंता” व्यक्त केली आणि म्हटले की ते परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. “व्हेनेझुएलामधील अलीकडील घडामोडी ही गंभीर चिंतेची बाब आहे. आम्ही विकसित होत असलेल्या परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहोत. भारत व्हेनेझुएलाच्या लोकांच्या कल्याणासाठी आणि सुरक्षेसाठी आपला पाठिंबा पुन्हा व्यक्त करतो. आम्ही संबंधित सर्वांना आवाहन करतो की त्यांनी संवादाद्वारे शांततेने समस्या सोडवाव्यात, जेणेकरून प्रदेशात शांतता आणि स्थिरता सुनिश्चित होईल,” असे एका निवेदनात म्हटले आहे.

गेल्या वर्षी नोबेल शांतता पुरस्कार जिंकणाऱ्या आणि तो डोनाल्ड ट्रम्प यांना समर्पित करणाऱ्या व्हेनेझुएलाच्या विरोधी नेत्या मारिया कोरिना मचाडो यांनी निकोलस मादुरोच्या अटकेनंतर “स्वातंत्र्याची वेळ” आल्याचे म्हटले. त्या म्हणाल्या की, व्हेनेझुएलाच्या नागरिकांविरुद्ध आणि इतर अनेक राष्ट्रांच्या नागरिकांविरुद्ध केलेल्या घृणास्पद गुन्ह्यांसाठी मादुरोला आता आंतरराष्ट्रीय न्यायाचा सामना करावा लागेल. त्यांनी पुढे सांगितले की, वाटाघाटीद्वारे तोडगा स्वीकारण्यास नकार दिल्यानंतर, अमेरिकन सरकारने कायदा लागू करण्याचे आपले वचन पूर्ण केले आहे.

अमेरिका-व्हेनेझुएला यांच्यातील तणाव अनेक वर्षांच्या तणावपूर्ण संबंधांमधून निर्माण झाला आहे, ज्यामध्ये निर्बंध, वादग्रस्त निवडणुका आणि व्यापक फौजदारी आरोप यांचा समावेश आहे. या संबंधांमधील दुरावा १९९९ मध्ये ह्यूगो चावेझ यांच्या समाजवादी ‘बोलिव्हेरियन क्रांती’ने सुरू झाला, ज्याने अमेरिकन तेल कंपन्यांचे राष्ट्रीयीकरण केले आणि देशाला रशिया आणि इराणसोबत उघडपणे अमेरिका-विरोधी युतीकडे नेले. दशके जुना हा संघर्ष “कमाल दबाव” निर्बंध, बिघडत चाललेले मानवतावादी संकट आणि २०२० मध्ये मादुरोवर अमेरिकेने ठेवलेल्या बक्षीसामुळे अधिकच वाढला. शनिवारी डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेतृत्वाखाली आर्थिक एकाकीपणातून थेट लष्करी हस्तक्षेपात त्याची परिणती झाली.

About Editor

Check Also

इराणचे सर्वोच्च नेते अय्यातुल्लाह खामेनी यांच्या हत्येवर शांतता, देशाच्या परराष्ट्र धोरणावर शंका काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांची भारत-इराण संबध आणि मोदी सरकारवर टीकेची झोड

मोदी सरकारवर कडक टीका करताना, काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मंगळवारी (३ मार्च …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *