महात्मा गांधी यांच्या दक्षिण आफ्रिकेतील वास्तव्यापासून महाराष्ट्र आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात ऐतिहासिक संबंध आहेत. हे संबंध व्यापारवृद्धीच्या माध्यमातून अधिक दृढ करण्यास महाराष्ट्र उत्सुक असून खनिज उत्खनन क्षेत्रात व्यापारवृद्धीच्या मोठ्या संधी आहेत, असे राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले.
दक्षिण आफ्रिकेचे महावाणिज्यदूत गिडीयन लबाने यांनी आज महाराष्ट्राचे राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांची सह्याद्री अतिथीगृह येथे सदिच्छा भेट घेतली. यावेळी दोघांनी व्यापारवृद्धीच्या क्षेत्रांबाबत औपचारिक चर्चा करण्यात आली.
मंत्री जयकुमार रावल म्हणाले, भारत आणि दक्षिण आफ्रिका हे दोन्ही देश विकासाच्या वाटेवर आहेत. महाराष्ट्र हे भारताचे पॉवर हाऊस आहे. येथे पर्यटनाबरोबरच विविध क्षेत्रात विकासाच्या संधी आहेत. खनिज उत्खनन, विविध उत्पादने आदी क्षेत्रे निश्चित करुन महाराष्ट्र आणि दक्षिण आफ्रिका यांच्यादरम्यान व्यापार वृद्धी शक्य आहे. याच माध्यमातून दोघांमधील ऐतिहासिक संबंध अधिक वृद्धींगत होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. महाराष्ट्राला दक्षिण आफ्रिकेविषयी नेहमीच आत्मियता राहिली असल्याचे यावेळी सांगितले.
दक्षिण आफ्रिकेचे महावाणिज्यदूत गिडीयन लबाने यांनी महात्मा गांधी यांनी दक्षिण आफ्रिकेतील वास्तव्यादरम्यान केलेल्या कार्यापासून प्रेरणा घेऊन नेल्सन मंडेला यांनी दक्षिण आफ्रिकेच्या स्वातंत्र्य आणि विकासामध्ये मोलाची भूमिका बजावल्याचे सांगितले. भारत हे कृषी उत्पादन क्षेत्रात चांगले कार्य करीत असून दक्षिण आफ्रिकेला मदतीची अपेक्षा असल्याचे त्यांनी सांगितले.
‘कॉटन टू क्लॉथ’च्या माध्यमातून महाराष्ट्र आणि दक्षिण कोरिया यांच्यात वस्त्रोद्योग क्षेत्रात व्यापारवृद्धीची संधी
महाराष्ट्र आणि दक्षिण कोरिया दरम्यान वस्त्रोद्योग क्षेत्रात व्यापारवृद्धीची मोठी संधी आहे. महाराष्ट्रातील कापूस आणि दक्षिण कोरियातील टेक्स्टाईल मशिनरी यांच्या माध्यमातून भागिदारीने परस्पर संबंध अधिक वृद्धींगत होतील, असा विश्वास राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी व्यक्त केला.
दक्षिण कोरियाचे महावाणिज्यदूत डोंगवान यू यांनी मंत्री जयकुमार रावल यांची सह्याद्री अतिथीगृह येथे सदिच्छा भेट घेतली. यावेळी महाराष्ट्र आणि कोरिया दरम्यान व्यापारवृद्धीच्या विविध संधींवर चर्चा करण्यात आली.
राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल म्हणाले, महाराष्ट्र हे भारताचे पॉवर हाऊस आहे. उत्पादन क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्यावर भर देऊन महाराष्ट्र आणि कोरियादरम्यान व्यापारवृद्धीच्या संधी निश्चित करण्यावर भर देणे गरजेचे आहे. महाराष्ट्रात कुशल मनुष्यबळ उपलब्ध असल्याने महाराष्ट्र आणि कोरियामध्ये गुंतवणूक आणि व्यापाराच्या विविध संधी विचारात घेऊन इच्छुकांना प्रोत्साहन देता येईल. विशेषत: महाराष्ट्रातील कापूस आणि कोरियातील टेक्स्टाईल मशिनरी यांच्या माध्यमातून भागिदारीने व्यापार करुन परस्पर संबंध वृद्धींगत होतील, असा विश्वास व्यक्त केला.
पुढे बोलताना जयकुमार रावल म्हणाले की, महाराष्ट्रात मुंबई-पुण्याबरोबरच विविध जिल्ह्यांमध्ये उद्योजकांना सोयी सुविधा उपलब्ध करुन दिल्या जात आहेत. महाराष्ट्र ॲग्रो प्रोसेसिंग बरोबरच फळे, भाजीपाला निर्यातीत अग्रेसर असून कोरियाच्या उद्योजकांचे राज्यात स्वागतच केले जाईल, असेही मंत्री जयकुमार रावल यांनी यावेळी सांगितले.
कोरियन महावाणिज्यदूत डोंगवान यू यांनी व्यापार आणि गुंतवणुकीच्या दृष्टीने महाराष्ट्र हे भारतातील महत्त्वाचे राज्य असल्याचे सांगितले. मुंबई-पुणे परिसरात विविध उत्पादनांच्या अनेक कोरियन कंपन्या असल्याचे सांगून येत्या १२ ऑक्टोबर रोजी मुंबईत होणाऱ्या कोरियन महोत्सवासाठी त्यांनी मंत्री रावल यांना निमंत्रण दिले.
Marathi e-Batmya