जयकुमार रावल यांची माहिती, व्हिएतनामशी द्विपक्षीय सहकार्य आणि सबंध वृद्धिंगत करणार व्हिएतनामचे महावाणिज्यदूत ले क्वांग बिएन यांनी मंत्री जयकुमार रावल यांची मंत्रालयात सदिच्छा भेट घेतली

महाराष्ट्र हा व्हिएतनामी उद्योगांसाठी पसंतीचे गुंतवणूक केंद्र म्हणून उदयास येत असल्याने आर्थिक भागीदारी वाढत आहे. येणाऱ्या काळात गुंतवणूक, व्यापार आणि द्विपक्षीय सहकार्य वाढवण्यावर भर दिला जाईल, असे राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले. व्हिएतनामचे महावाणिज्यदूत ले क्वांग बिएन यांनी मंत्री जयकुमार रावल यांची मंत्रालयात सदिच्छा भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते.

मंत्री जयकुमार रावल म्हणाले, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या मार्गदर्शानाखाली शासन गुंतवणूक आणि व्यापार सहकार्य सुरळीत पार पडावे यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्यास कटिबद्ध आहे. हे सहकार्य महाराष्ट्र आणि व्हिएतनाम यांच्यातील परस्पर विश्वास व समान आर्थिक दृष्टीकोनाचे प्रतीक आहे. नवीन उपक्रम आणि शाश्वत विकासाच्या बळावर समृद्धीच्या नव्या पर्वाची आम्ही अपेक्षा करतो, असे त्यांनी सांगितले.

मंत्री जयकुमार रावल यांनी व्हिएतनाममधील अग्रगण्य उद्योगसमूह विंग ग्रुप, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) आणि उद्योग विभाग यांच्यात झालेल्या सामंजस्य कराराचे स्वागत केले. सुमारे ५४ हजार कोटींहून अधिकच्या गुंतवणुकीतून राज्यात जागतिक दर्जाची एकात्मिक परिसंस्था उभारण्यात येणार असून, यात टाउनशिप, आरोग्य, शैक्षणिक सुविधा तसेच इलेक्ट्रिक बसेस व टॅक्सींसह हरित ऊर्जा अशा गतिशीलता प्रकल्पांचा समावेश आहे. या गुंतवणुकीमुळे मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होणार असल्याचा विश्वास मंत्री रावल यांनी व्यक्त केला.

व्हिएतनामच्या उच्चस्तरीय नेतृत्व व व्यावसायिक प्रतिनिधीमंडळाच्या आगामी मुंबई दौऱ्याचे स्वागत करण्यास महाराष्ट्र शासन सज्ज असल्याचे मंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर संयुक्तपणे ‘व्हिएतनाम – महाराष्ट्र व्यवसाय मंच’ स्थापन करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. हा मंच उद्योग क्षेत्रातील थेट संवाद वाढवून आर्थिक सहकार्य वृद्धिंगत करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

मुंबई (भारत) आणि हो ची मिन्ह सिटी (व्हिएतनाम) यांच्यात ट्विनिंग सिटी करार अंतिम टप्प्यात असून राष्ट्रपतींच्या आगामी भेटीदरम्यान या ऐतिहासिक करारावर स्वाक्षऱ्या होणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. या शहरांच्या नात्यामुळे शहरी पायाभूत सुविधा, सांस्कृतिक देवाणघेवाण आणि थेट व्यापार संबंध अधिक मजबूत होतील.

बैठकीत कृषी आणि वस्त्रोद्योग क्षेत्रातही सहकार्य वाढविण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली. कृषी विपणन क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या महाराष्ट्राने पुरवठा साखळी मजबूत करण्यासाठी तसेच कृषी उत्पादनांच्या द्विपक्षीय व्यापारासाठी व्हिएतनामसोबत भागीदारी करण्याची तयारी दर्शवली. तसेच वस्त्रोद्योग क्षेत्रात बी-टू-बी सहकार्य वाढवून जागतिक निर्यात क्षमतेचा लाभ घेण्यावर भर देण्यात आला.

About Editor

Check Also

प्रताप सरनाईक यांची माहिती, परवानाधारक रिक्षा व टॅक्सी चालकांसाठी १ मे पासून मराठी भाषा आवश्यक अन्यथा लायसन्स इश्यू करणाऱ्या अधिकाऱ्यावर आणि चालकावर कारवाई करणार

येत्या १ मे, महाराष्ट्र दिनापासून परवानाधारक रिक्षा व टॅक्सी चालकांना मराठी भाषा येणे आवश्यक करण्यात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *