ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथील दोन अल्पवयीन मुलींवर झालेल्या कथित लैंगिक अत्याचाराच्या घटनेची चौकशी आणि बदलापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात कुचराई करणाऱ्या बदलापूर पोलीस ठाण्यातील संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर काय कारवाई केली, अशी विचारणा उच्च न्यायालयाने बुधवारी राज्य सरकारला केली.
विभागीय चौकशीनुसार एका अधिकाऱ्यावर कर्तव्यात कसूर केल्याचा आरोप सिद्ध झाले आहेत. तसेच पुढील कारवाईसाठी पोलीस आयुक्तांकडे अहवाल पाठवण्यात आल्याची माहितीही महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांनी न्या. रेवती मोहिते-डेरे आणि न्या. पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठाला दिली. त्याची दखल घेऊन बदलापूर पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांवर काय कारवाई केली त्याबाबतची माहिती सहा आठवड्यानंतर होणाऱ्या पुढील सुनावमीवेळी सादर करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले. तसेच शाळा आणि अन्य शैक्षणिक संस्थांमधील मुलांची सुरक्षिततेच्या मुद्द्यावर अभ्यास करण्यासाठी गठीत केलेल्या समितीने पुढील सुनावणी होईपर्यंत अहवाल सादर केल्यास तोही खंडपीठासमोर ठेवण्यात यावा, असेही आदेश न्यायालयाने दिले.
तत्पूर्वी, याप्रकऱणातील दोन्ही अल्पवयीन पीडितांच्या कल्याणासाठी सर्व उपाययोजना आणि योग्य ती पावले उचलण्यास आली आहेत. तसेच राज्य सरकारच्या मनोधैर्य योजनेंतर्गत (लैंगिक अत्याचाराच्या बळींसाठी) भरपाईची रक्कम वितरित करण्यात आल्याची माहितीही सराफ यांनी खंडपीठाला दिली.
बदलापूर येथील शाळेत १ ऑगस्टपासून कंत्राटी तत्त्वावर सफाई कर्मचारी म्हणून कार्यरत असलेल्या अक्षय शिंदे या २३ वर्षीय तरूणाने शाळेतील तीन आणि चार वर्षांच्या दोन बालवाडी विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर पोलिस तपासातील गंभीर त्रुटींबद्दल जनक्षोभ उसळल्यानंतर राज्य सरकारने या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापना केली. अटकेनंतर काही दिवसांनी आरोपी शिंदेचा पोलीस चकमकीत मृत्यू झाला. या प्रकरणाची उच्च न्यायालयाने स्वतःहून याचिका दाखल केली असून न्यायालय तपासावर देखरेख करीत आहे..
Marathi e-Batmya