मायणी वैद्यकीय महाविद्यालय आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी दीपक देशमुख यांना सशर्त जामीन अटक बेकायदेशीर असल्याचे उच्च न्यायालयाचे निरीक्षण

मायणी वैद्यकीय महाविद्यालयातील आर्थिक गैरव्यवहाराच्या गुन्ह्यात अटकेत असलेले दीपक देशमुख यांना उच्च न्यायालयाने शुक्रवारी जामीन मंजूर केला. देशमुख यांची अटक बेकादेशीर असल्याचे निरीक्षण नोंदवून न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला. देशमुख हे श्री छत्रपती शिवाजी एज्युकेशन सोसायटीचे संचालक आप्पासाहेब देशमुख यांचे पुत्र आहेत.

न्या. रेवती मोहिते-डेरे आणि न्या. पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने २१ ऑक्टोबर रोजी या याचिकेवरील निर्णय राखून ठेवला होता तो शुक्रवारी जाहीर केला. प्रथमदर्शनी देखमुख यांची अटक बेकायदेशीर असल्याचे आढळून येत असल्याचे निरीक्षण नोंदवून तपासात सहकार्य करण्याच्या अटींवर आणि ५० हजार रुपयांच्या मुचलक्यावर न्यायालयाने देशमुख यांना जामीन मंजूर केला.

सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) केलेल्या अटकेला देशमुख यांचे बंधू सचिन देशमुख यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. दिपक देशमुखांनी भाजपा आमदार जयकुमार गोरे यांचा कोविडकाळातील घोटाळा उघड केला होता. उच्च न्यायालयात दिपक देशमुखांची याचिका न्यायप्रविष्ट असून जयकुमार गोरे आणि त्यांच्या परिवाराच्या चौकशीचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्यादरम्यानच ईडीने देशमुख यांना अटक केली होती. त्यामुळे ही अटक निव्वळ राजकीय दबावापोटी केल्याचा आरोप सचिन देशमुख यांनी अॅड. संदीप कर्णिक आणि ॲड. वैभव गायकवाड यांच्यामार्फत याचिकेतून केला होता.

भ्रष्टाचाराचे प्रकरण काय

दीपक देशमुख यांच्याविरुद्ध वडूज पोलीस ठाण्यात २०२३ साली एका संस्थेची जागा दुसऱ्या संस्थेला बक्षीसपत्राने देत बोगस दस्त केल्याचा गुन्हा दाखल आहे. यामध्ये कोट्यवधींचा गैरव्यवहार असल्याने हे प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे तपासासाठी सोपवण्यात आले होते. तसेच यातील काही गुन्ह्यांचा तपास ‘ईडी’कडून स्वतंत्ररीत्या सुरू आहे. देशमुख यांना या गुन्ह्यात सातारा आर्थिक गुन्हे शाखेत तपासासाठी हजर राहण्यासह अन्य अटींवर न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मिळाला होता. सातारा पोलिसांकडे सुरू असलेल्या चौकशीसाठी देशमुख सातारा पोलीस मुख्यालय आले असता ‘ईडी’ने कारवाई करत त्यांना ताब्यात घेतले. यावेळी सुमारे दीड तास त्यांची चौकशी केल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली होती. मागील महिन्यात ‘ईडी’च्या पथकाने देशमुख यांच्या मायणी येथील घरी छापा टाकला होता.

About Editor

Check Also

शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या कामात खंड नको २३ जानेवारी २०२७ पुर्वी पूर्ण झालेच पाहिजे

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या कामात कोणत्याही प्रकारे खंड पडता कामा नये २३ जानेवारी २०२७ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *