परंपरागत शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्क मैदानावर पार पडत आला आहे. मात्र गतवर्षी शिवसेनेत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाविरोधात बंड पुकारत विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदार आणि १३ खासदारांनी वेगळी चूल मांडली. त्यानंतर मागील वर्षी आणि यंदाच्यावर्षीही उद्धव ठाकरे यांच्याकडून दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदानाची मागणी केली असतानाही पुन्हा एकदा शिंदे गटाकडूनही दसरा मेळाव्यासाठी त्याच जागेची मागणी केली. मात्र अखेर आज अचानक दसरा मेळाव्यासाठीचा अर्ज शिंदे गटाने मागे घेतला. त्यामुळे शिवाजी पार्क मैदानावर फक्त ठाकरे गटाचा दसरा मेळावा पार पडणार असून शिंदे गटाचा दसरा मेळावा मात्र इतरत्र होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
वास्तविक पाहता गेल्या ५०-५६ वर्षापासून शिवसेनेचा दसरा मेळावा हा शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्या हयातीपासून त्यांचे चिरंजीव तथा पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून दसरा मेळाव्याचे शिवाजी पार्कवरील मैदानावर आयोजन करण्यात येत आहे. तसेच गेल्यावर्षी शिंदे गटाच्या शिवसेनेला बंडानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाकडून शिवसेना पक्ष नाव आणि धनुष्यबाण चिन्ह देण्यात आला. त्यानंतर शिंदे गटाने आमचीच शिवसेना खरी असल्याचा दावा करत शिवाजी पार्क मैदानावर दसरा मेळावा आयोजित करण्याचा निर्णय घेतला. तसेच या प्रश्नावरून मुंबई उच्च न्यायालयातही दाद मागण्यात आली. परंतु न्यायालयाने सर्वात आधी आलेला अर्ज ठाकरे गटाचा असल्याने आणि ठाकरे गटाकडूनच दसरा मेळाव्यासाठी अर्ज करण्यात आल्याने उद्धव ठाकरे गटाला मैदानाचा निर्णय घेतला.
यंदाही शिवाजी पार्क मैदानासाठी शिंदे गटाकडून दसरा मेळाव्यासाठी अर्ज करण्यात आला. ठाकरे गटाकडूनही नेहमीप्रमाणे याच मैदानाची मागणी करण्यात आली होती. मात्र यंदाचे वर्ष हे निवडणूकांचे वर्ष असल्याने शिंदे गटाकडून शिवाजी पार्क मैदानाचा मुद्दा प्रतिष्ठेचा करण्याची अटकळ बांधली जात होती. तसेच न्यायालयीन लढाई लढली जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती.
मात्र ऐनवेळी मुंबई महापालिकेकडे शिंदे गटाने शिवाजी पार्कसाठी केलेला अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेत तसा अर्ज मुंबई महापालिकेला सादर केला. तसेच शिंदे गटाचा दसरा मेळावा अन्यत्र आयोजित करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे दसरा मेळावाच्या निमित्ताने ठाकरे गट विरूध्द शिंदे गट असा सामना होण्याची शक्यता मावळली आहे.
दरम्यान, अजित पवार यांच्या महायुतीतील सहभागामुळे शिंदे गटाचे राजकिय महत्व कमी झाले आहे. त्यातच शिंदे गटाचे काही आमदार मातोश्रीच्या संपर्कात असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे शिंदे गटातील अनेक आमदार स्वगृही परतण्याची शक्यता वर्तविण्यात येत असल्याने पुढील राजकिय रणनीतीचा भाग म्हणून एकनाथ शिंदे यांनी शिवाजी पार्क मैदानाच्या राजकिय युध्दातून माघार घेतल्याचे बोलले जात आहे.
शिवाजी पार्क मैदानावरील दसरा मेळाव्यासाठीचा आग्रह सोडत असल्याचे ट्विट शिंदे गटाचे नेते तथा आमदार सदा सरवणकर यांनी आज केले. त्यामुळे शिवाजी पार्क मैदानावर फक्त उद्धव ठाकरे गटाचाच दसरा मेळावा होणार हे स्पष्ट झाले. तसेच गतवर्षीप्रमाणे शिंदे गटाचा दसरा मेळावा बीकेसीच्या मैदानावर किंवा चर्चगेट स्थानकाजवळील ओव्हल मैदानावर आयोजित करण्यात येणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
दसरा हा हिंदूंचा महत्वाचा सण !
शिवसैनिकांसाठी हा महोत्सवच असतो.
माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे गेली ५० वर्षे शिवतीर्थावरून ज्वलंत हिंदुत्वाचे विचार अखंड पणे देत आले.
यावर्षी देखील शिवसेनेचा दसरा मेळावा त्याच उत्साहात व्हावा व हिंदूसणांमध्ये एकमेकांमधील वाद टाळावा म्हणून…— Sada Sarvankar (@misadasarvankar) October 10, 2023
Marathi e-Batmya