Breaking News

मंगलप्रभात लोढा यांची माहिती, उपराष्ट्रपती यांच्या हस्ते संविधान मंदिराचे लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते कौशल्य विकास विभागाच्या योजनांचा प्रारंभ

कौशल्य विकास विभागामार्फत राज्यातील ४३४ औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) मध्ये ‘संविधान मंदिर लोकार्पण ‘ हा कार्यक्रम उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते १५ सप्टेंबर रोजी होणार आहे. त्याचप्रमाणे राज्यातील एक हजार महाविद्यालयांमध्ये ‘आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र शुभारंभ’ आणि ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी स्टार्टअप योजना शुभारंभ’ पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या हस्ते २० सप्टेंबर रोजी होणार आहे, अशी माहिती कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली.

मंत्रालय विधिमंडळ वार्ताहर कक्ष येथे आयोजित पत्रकार परिषदेत मंत्री मंगल प्रभात लोढा बोलत होते. यावेळी कौशल्य विकास विभागाचे सचिव गणेश पाटील, राज्य नाविन्यता सोसायटीचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी विकास नाईक यावेळी उपस्थित होते.

संविधान मंदिर लोकार्पण सोहळा

राज्यातील ४३४ आयटीआयमध्ये जागतिक लोकशाही दिनाच्या संविधान मंदिर लोकार्पण कार्यक्रम उपराष्ट्रपती जगदीप धनखड व राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, कौशल्य,रोजगार,उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या उपस्थितीत रविवार १५ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ११ वाजता एल्फिन्स्टन तांत्रिक महाविद्यालय येथे होणार आहे.प्रत्येक विद्यार्थ्यांला आपल्या भारतीय संविधानाची शिकवण देण्यात येणार असून भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आजच्या पिढीला माहिती व्हावे यासाठी हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र व पुण्यश्लोक अहिल्यादेवी स्टार्टअप योजना शुभारंभ कार्यक्रम

राज्यातील १००० महाविद्यालयांमध्ये आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी स्टार्टअप योजना शुभारंभ कार्यक्रम पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या हस्ते वर्धा येथे २० सप्टेंबर रोजी होणार आहे. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय उद्योगमंत्री जीतन राम मांझी, केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरिराज सिंह, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, वने मंत्री सुधीर मुनगंटीवार, उच्च व तंत्रशिक्षण चंद्रकांत पाटील कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा हे उपस्थित राहणार आहेत.

आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र योजना

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, २०२० मध्ये व्यावसायिक शिक्षणाला महत्त्व आलेले आहे. या धोरणाच्या अंमलबजावणीतंर्गत “आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र” ही नाविन्यपूर्ण योजना सुरु केली आहे. एक हजार नामांकित महाविद्यालयांमध्ये कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्यात येणार आहे. या कौशल्य विकास केंद्रात प्रतिवर्षी साधारण १५० युवक-युवतींना कौशल्य विकासाचे मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यामुळे संपूर्ण राज्यात १५ ते ४५ वयोगटातील दरवर्षी साधारण १ लाख ५० हजार युवक-युवतींना कौशल्य विकासाचे मोफत प्रशिक्षण मिळणार आहे.विद्यार्थ्यांना देण्यात येणारे प्रशिक्षण संपूर्णपणे मोफत असून या योजनेसाठीचा सर्व खर्च कौशल्य विकास विभाग करणार आहे.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना

महिलांच्या सक्षमीकरणासाठी महिला स्टार्टअप्सना निधी तसेच आर्थिक पाठबळ देण्यासाठी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना’ सुरू करण्यात आली आहे. या योजनेत राज्यातील महिला स्टार्टअप्सला स्वावलंबी व आत्मनिर्भर बनविणे, देशातील सर्वाधिक महिला स्टार्टअप्स असलेले राज्य म्हणून महाराष्ट्राची ओळख निर्माण करणे हा योजनेचा उद्देश आहे. या योजनेसाठी १०० कोटी निधीची तरतूद करण्यात आली असून, सुमारे एक हजार स्टार्टअप्सना २५ लाखांपर्यंत आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे.

मंत्री मंगल प्रभात लोढा म्हणाले, “अनेक कौशल्य संपन्न आणि नीतिमंत व्यक्तिमत्वांनी आपल्या भारत देशाला घडवण्यासाठी आपले योगदान दिले. आज त्यांच्या मेहनतीमुळे आपण आजवर इतकी प्रगती करू शकलो आहोत. संविधान मंदिराच्या माध्यमातून संविधान निर्मितीचा इतिहास, त्याचे महत्व, येणा-या पिढीला समजावे हा आमचा प्रयत्न आहे. येणारा काळ हा युवाशक्तीचा आहे, भारतातील युवकांसाठी सुवर्ण संधींचा आहे. संविधान मंदिर आणि महाविद्यालयांमध्ये कौशल्य विकास केंद्र उभे करण्यामागे आमचा हाच उद्देश आहे. नक्कीच युवकांचा त्याला चांगला प्रतिसाद मिळेल. उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कार्यक्रमास येण्यासाठी आपला अमूल्य वेळ दिला, त्याबद्दल त्यांचे आभार मानतो!”

Check Also

एसटी कर्मचाऱ्यांचा संप मागेः मुळ वेतनामध्ये ६५०० रुपयांची वाढ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांना एप्रिल २०२० पासून मुळ वेतनामध्ये ६५०० रुपयांची वाढ करण्याचा निर्णय मुख्यमंत्री …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *