मला माझ्या जातीला आणि जातीच्या लेकरांना मोठे करायचे आहे. त्यासाठी मी एवढे कष्ट सहन करतोय. त्यामुळे कोणीही आंदोलनात गोंधळ घालू नका. न्यायालयाने दिलेल्या नियमांचे सर्वांनी पालन करा. रस्त्यांवरील गाड्या हटवून पार्किंगमध्ये लावा, तिथेच झोपा आणि बाहेर निघायचे असेल तेंव्हा आझाद मैदानावर या. परंतु कोणत्याही परिस्थितीत मुंबईकरांना त्रास होऊ देऊ नका असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी उच्च न्यायालयाच्या निकालानंतर मराठा आंदोलकांना केले. तसेच जातीसाठी मी मरायला तयार आहे, त्यामुळे सरकारने बंदूकीने गोळ्या घातल्या तरी मी आझाद मैदानातून उठणार नाही, असा निर्धारही यावेळी व्यक्त केला.
सोमवारी, न्यायालयाने मंगळवारपर्यंत रस्ते मोकळे करा असे आदेश दिल्यानंतर मनोज जरांगे पाटील म्हणाले की, आंदोलकांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन करत वृत्तवाहिन्यांकडून सरकारच्या सांगण्यावरून आंदोलनाविषयी चुकीच्या बातम्या दिल्या जात आहेत. न्युज चॅनेलवर बहिष्कार घालायचा इशारा दिला. त्याचवेळी त्यांनी मराठा आंदोलकांना रस्ते अडवू नका, तुम्ही माझे ऐकणार नसाल तर मी उपोषण सोडून निघून जातो,’ असा दम भरला आणि पत्रकारांना, सर्वसामान्य मुंबईकरांना शांत राहून सहकार्य करा, असे आवाहन केले. आंदोलनकर्ते हुल्लडबाजी करत असल्याच्या बातमीवरही संताप व्यक्त करत ‘आंदोलनकर्ते हुल्लडबाज नाहीत, तर राज्य सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हुल्लडबाज आहेत,’ असा आरोपही यावेळी केला.
Marathi e-Batmya