राज्यातील जनतेच्या हिताचे कायदे आणि राज्याचे सार्वभौम दोन्ही सभागृह असलेल्या विधान भवनाच्या प्रवेशद्वारावरच आज अचानक आग लागल्याची घटना घडली. मात्र त्यामुळे विधान भवनाच्या प्रवेशद्वाराच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर धुराचे साम्राज्य पसरल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे, विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन तोंडावर आले असताना विधान भवनाच्या प्रवेशद्वारावर आग लागल्याची घटना घडली आहे. आगीची घटना कळताच विधानभवनातील कार्यक्रमात व्यस्त असलेल्या विधानसभा अध्यक्षांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. मात्र आग नेमकी कशी लागली हे अद्याप स्पष्ट झाले नाही. पण सदरची आग शॉर्टसर्किटमुळे लागली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
विधानभवनात वेगवेगळ्या समित्याचे कार्यक्रम असतात, त्यामुळे राजकीय नेते आमदार, खासदार आणि कार्यकर्त्यांची सदैव वर्दळ असते. एवढेच नव्हे तर सर्वसामान्य नागरिकही येथे आपल्या समस्या घेऊन येत असतात. सोमवारी दुपारी अचानक विधानभवनाच्या प्रवेशद्वाराला आग लागल्यामुळे एकच गोंधळ उडाला. प्रवेशद्वारा लगतच्या परिसरात धुराचे काळे लोट बाहेर येत आहेत असे दिसताच तेथील पोलिस अधिकाऱ्यांनी आणि अग्निशमन दलाला पाचारण केले. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप कळाले नाही. पण प्रवेशद्वारा लगत असणाऱ्या स्कॅनिंग मशीनमध्ये शॉर्ट सर्किट झाल्यामुळे आग लागली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, विधान भवनातील आपल्या दालनात असलेले विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना आग लागल्याचे कळताच त्यांनी तात्काळ प्रवेशद्वारावर धाव घेतली. तेथील स्थितीचा आढावा घेतल्यानंतर ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला. विधानभवनाच्या प्रवेशद्वारावर असलेल्या स्वागत कक्षात जी स्कॅनिंग मशीन असते, त्यात शॉर्ट सर्किट झाल्यामुळे छोट्या प्रमाणात आग लागली आहे. ही आग नियंत्रणात आलेली आहे. त्यामुळे कुणीही चिंता करण्याची गरज नाही. तूर्त, स्कॅनिंग मशीनमधील शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सर्वजण सुरक्षित आहेत असे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सागितले.
पुढे बोलताना राहुल नार्वेकर म्हणाले की, हा एक अपघात आहे. ही आग इस्टाब्लिशमेंटच्या कनेक्शनमध्ये लागली नाही. स्कॅनिंग मशीनमध्ये काही बिघाड झाल्यामुळे शॉर्ट सर्किट झाले असेल. स्थिती पूर्णतः नियंत्रणात आहे. सर्वजण सुरक्षित आहेत. कोणत्याही प्रकारची हानी झाली नाही. मशिनच्या नुकसानीसंदर्भात आढावा घेऊन पुढील निर्णय घेतला जाईल, असेही यावेळी सांगितले.
शिवसेना उबाठाचे नेते आमदार आदित्य ठाकरे आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही आगीची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली. ते घटनास्थळी आले, तेव्हा राहुल नार्वेकर पत्रकारांशी संवाद साधून परत जात होते. जाता-जाता त्यांनी आदित्य ठाकरे यांना फारशी काळजी करण्याचे कारण नसल्याचे सांगितले. त्यानंतर ठाकरे व दानवे यांनी अग्निशमन दलाच्या जवानाशी विचारपुस करून माहिती घेत आढावा घेतला.
Marathi e-Batmya