नवरात्री सणाच्या निमित्ताने आणि आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थिती नवे थीम साँग आज जारी केले. हे थीम साँग राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहचविण्याचे आवाहनही यावेळी उद्धव ठाकरे यांनी उपस्थित शिवसैनिकांना केले.
दादर येथील शिवसेना भवनात आयोजित कार्यक्रमात शिवसेना उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे हे बोलत होते. यावेळी शिवसेना ज्येष्ठ नेते संजय राऊत, अरविंद सावंत, गीत लेखक श्रीरंग गोडबोले, गायक संदेश उमप आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, पूर्वी संत एकनाथ महाराज होते, आता त्यांच्या नावाचा गैरफायदा घेत अनेक तोतये आज काल भिरत आहेत. त्यांनी रचलेल्या भारूडाच्या धर्तीवर “दार उघड बये आता दार उघड” गाण्याच्या नंदेश उमप यांनी हे गाणं गायलं असल्याचे सांगत, राक्षसी दैत्याचा नाश करण्यासाठी मशाल हाती दे अशी मागणी करणारं गाण श्रीरंग गोडबोले यांनी लिहिलं असल्याचंही यावेळी सांगितले.
उद्धव ठाकरे पुढे बोलताना म्हणाले की, मागील दोन अडीच वर्षापासून घटनाबाह्य मुख्यमंत्री आणि त्यांच्या महाशक्तीच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयाकडून न्यायाची वाट पहात आहोत. परंतु अद्याप तरी न्याय मिळालेला नाही. त्यामुळे आता आम्ही जनतेच्या न्यायालयात न्याय मागण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात महिलांवर अत्याचाराच्या घटनेत सातत्याने वाढ होत आहे. महिला भगिनींना न्याय देण्यासाठी कोणी वाली उरल्याचे दिसत नाही. त्यामुळे आता आदीमाया अंबाबाईनेच राक्षसी दैत्याचे निर्दालन करण्यासाठी आमच्या हाती मशाल द्यावी म्हणून देवीला साकडे घालण्यासाठीच हे गीत आम्ही जारी केले आहे.
यावर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी अमित शाह यांनी केलेल्या टीकेवर प्रतिक्रिया व्यक्त करण्याचा प्रयत्न केला असता उद्धव ठाकरे म्हणाले की, मी आधीच सांगितले होते, की आज राजकिय काहीही बोलणार नाही. कोणाला काय बोलायचेय माझ्यावर बोलू द्या दसऱ्यादिवशी मी सौ सोनार की लोहार की करून दाखवतो. त्यामुळे आता कोणतीही वक्तव्य राजकारणावर करणार नसल्याचे यावेळी सांगितले.
गोंधळ गीत अनावरण सोहळा | प्रमुख उपस्थिती – पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे | शिवसेना भवन, दादर – #LIVE https://t.co/MfQ3LxwfMj
— ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) October 3, 2024
Marathi e-Batmya