देवेंद्र फडणवीस सरकार दिल्लीच्या आदेशाने मुंबईतील मौल्यवान व अत्यंत महत्वाच्या जमिनी लाडक्या उद्योगपतीच्या घशात घालत आहे. विमानतळ, धारावी, देवनार डंपिंग ग्राऊंड, मोतीलाल नगर, एअर इंडिया वसाहत, मदर डेअरीची जमीन व मिठागरांची जमीन दिल्यानंतर आता वांद्रे रिक्लमेशन येथील एमएसआरडीसीच्या कार्यालयाची २४ एकर जमीनही अदानीला बेकायदेशीरपणे दिली आहे. अदानीला आतापर्यंत मुंबईतील ३ ते ४ हजार एकर जमीन दिली असल्याचा गंभीर आरोप करत वांद्र्याच्या जमीन व्यवहारात अनेक नियमांना बगल दिली आहे, लवकरच पुराव्यासह त्याचा पर्दाफाश करू, असा इशाराही मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी दिला आहे.
यासंदर्भात विशेष पत्रकार परिषदेत बोलताना खासदार वर्षा गायकवाड पुढे म्हणाल्या की, एमएसआरडीसीने स्वतःच्या कार्यालयाची जागा अदानीला देऊन, त्यांचे ऑफिस ते आता दादर येथील कोहिनर स्केअरमध्ये स्थलांतर करत आहेत, त्यासाठी दरमहा २ कोटी १५ लाख रुपये भाडे द्यावे लागणार आहे. वांद्रे सी-लिंकजवळील २४ एकर जमीन ज्याची बाजारभावानुसार किंमत जवळपास ८ हजार कोटी रुपये असू शकते, ती एका बोर्ड मीटिंगद्वारे अदानीला सुपूर्द करण्यात आली, ही जमीन केवळ एमएसआरडीसीच्या हक्काची नसताना असा निर्णय कसा घेण्यात आला? हा विषय कॅबिनेटमध्ये का मांडण्यात आला नाही? अदानीला जमीन देण्याची एवढी घाई का होती? असे प्रश्न उपस्थित करून अदानींसाठी टीडीआरचे नवे नियम तयार केले जात आहेत आणि जमिनी अक्षरशः अत्यंत स्वस्त दरात दिल्या जात आहेत.
मुंबईचे ‘अदानीकरण’ करण्याचे षडयंत्र
वर्षा गायकवाड म्हणाल्या की, भाजपा सरकारने मुंबई विकायला काढली असून ती फक्त अदानीलाच व तेही कवडीमोल भावाने विकली जात आहे. मुंबईचे अदानीकरण करण्याचे हे षडयंत्र आहे, पण मुंबईकरांचे लक्ष या मुद्द्याकडे जाऊ नये यासाठी जाणीवपूर्वक जात व धर्माचा मुद्दा भाजपा पुढे करत आहे. मुंबईची जीवनवाहिनी लोकल ट्रेन व बेस्ट बस सेवा सुधारण्याऐवजी ३ लाख कोटी रुपयांची अहमदाबाद मुंबई बुलेट ट्रेन मुंबईकरांच्या माथ्यावर मारत आहेत. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे तीचे महत्व करण्याचा डाव असून याचा पर्दाफाश काँग्रेस करेल, असे सांगितले.
शेवटी बोलताना वर्षा गायकवाड म्हणाल्या की, बदलापूर बालिका अत्याचार प्रकरणातील आरोपी तुषार आपटेला भाजपा सरकार स्विकृत नगरसेवक बनवते ही अत्यंत अतिशय दुर्दैवी बाब आहे. ही घटना घडली त्यावेळी तुषार आपटे फरार होते, त्यांनी काही केले नव्हते तर ते फरार का झाले होते, त्यांनी त्याचवेळी समोर यायला हवे होते असा सवालही यावेळी केला.
यावेळी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व मुंबई काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते सचिन सावंत उपस्थित होते.
Marathi e-Batmya