भारतीय प्रशासन सेवेतील (आय.ए.एस) सन २०२४ च्या तुकडीतील आठ परिविक्षाधीन अधिकाऱ्यांनी त्यांच्या प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मंत्रालयात सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान अजित पवार यांनी नवोदित अधिकाऱ्यांना प्रशासकीय कामकाजातील मूलभूत तत्त्वे आणि सध्याच्या नवीन तंत्रज्ञानासंदर्भात मार्गदर्शन केले. विशेषतः विकासात्मक दृष्टिकोन, सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी प्रयत्न आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरावर त्यांनी भर दिला.
या ८ परिविक्षाधीन अधिकाऱ्यांमध्ये देशभरातील विविध भागांतून भारतीय प्रशासकीय सेवेत महाराष्ट्र केडरमध्ये निवडले गेलेले उमेदवार आहेत.ते सध्या नांदेड, नाशिक, नागपूर, वाशिम, गोंदिया, अमरावती, हिंगोली आणि नंदुरबार जिल्ह्यात प्रशिक्षण घेत असून अधिसंख्य सहायक जिल्हाधिकारी या पदावर कार्यरत आहेत.
मंत्रालयातील उपमुख्यमंत्र्यांच्या समिती कक्षात झालेल्या या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले, नेहमी विकासात्मक दृष्टिकोन ठेवावा. सर्वसामान्यांची कामे प्राधान्याने करावी. जर काम होत असेल तर स्पष्टपणे ‘हो’ म्हणावे आणि काम होत नसेल तर ‘नाही’ असे सांगावे. त्यांनी पुढे सांगितले की, प्रशासकीय कामकाजात सर्वांना सोबत घेऊन चालावे आणि वेळेचे महत्व ओळखून काम करावे.
बैठकीत सध्याच्या तंत्रज्ञानाच्या प्रगतीवर चर्चा करताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) वापरावर विशेष भर दिला. ते म्हणाले, “सध्या कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा सर्वत्र वापर करण्यात येत आहे. राज्यात कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरासाठी ५०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.” या तरतुदीमुळे शेतकऱ्यांना पीक उत्पादन, हवामान अंदाज आणि बाजारपेठेच्या विश्लेषणात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने फायदा होईल, असे त्यांनी स्पष्ट केले. ग्रामीण भागात एआय सारख्या आधुनिक संकल्पना कशा प्रकारे राबवल्या जात आहेत, हे प्रत्यक्ष पाहण्यासाठी या अधिकाऱ्यांची बारामती येथे भेट आयोजित करावी, अशी सूचना केली.
राज्यातील वेगवेगळ्या भागांत वेगवेगळे प्रश्न असल्याचे सांगून त्यांनी अधिकाऱ्यांना स्थानिक परिस्थितीचा विचार करून निर्णय घेण्याचा सल्ला दिला.
यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे सहसचिव सुभाष उमराणीकर, उपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. राजेश देशमुख, यांच्यासह नांदेड येथे कार्यरत दोनुरू अनन्या रेड्डी, नाशिक येथील पी.के. सिद्धार्थ रामकुमार, नागपूर येथील कुश मोटवानी, वाशीम येथील आकाश वर्मा,गोंदिया येथील साईकिरण नंदाला, अमरावती येथील कौसल्या एम., हिंगोली येथील योगेश कुमार मीना आणि नंदुरबार येथे कार्यरत असलेले शिवांश सिंग हे परिविक्षाधीन अधिकारी उपस्थित होते.
Marathi e-Batmya