राज्यातील १० वी, १२वी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांना लागणाऱ्या विविधप्रकारच्या कागदपत्रांसाठी भरून द्यावे लागणाऱ्या ५०० रूपयांचे मुद्रांक शुल्क अर्थात स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञा पत्र लिहून द्यावे लागत होते. मात्र आता यापुढे राज्यातील विद्यार्थ्यांना कोणत्याही लागणाऱ्या कागदपत्रांसाठी ५०० रूपयाचे स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञा पत्र लिहून देण्याची गरज राहणार नाही. केवळ स्वःहस्ताक्षरात साध्या कागदावर अर्ज करून आवश्यक ती कागदपत्रे मिळणार आहेत. त्यामुळे राज्यातील पालकांचे किमान ३ हजार रूपये वाचणार आहेत. यासंदर्भातील आदेश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आजच प्रशासनाला दिले.
राज्यभरातील लाखो विद्यार्थ्यांसह कोट्यवधी नागरिकांना या निर्णयामुळे दिलासा मिळाला असून विद्यार्थी आणि पालकांवरील आर्थिक ताण आता कमी होणार आहे, अशी आशा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केली.
चंद्रशेखर बावनकुळे पुढे बोलताना म्हणाले की, कुठल्याही शैक्षणिक कामाकरीता जात प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी प्रमाणपत्र, नॉन क्रीमिलेयर अथवा राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र तसेच शिक्षणाकरिता महसूल विभागाकडून जी प्रमाणपत्र लागतील त्याला कुठलेही मुद्रांक शुल्क लागणार नाही. हा निर्णय विद्यार्थी आणि पालकांसाठी महत्वपूर्ण आहे. या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचेही यावेळी सांगितले.
पुढे बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, साधारणतः दहावी बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर हे दाखले मिळवावे लागतात. यासाठी पालकवर्ग तहसील कार्यालयात जाऊन दाखले मिळवतात. प्रत्येक दाखल्यासाठी ५०० रुपये याप्रमाणे सुमारे तीन हजार रुपये यासाठी पालक खर्ची घालतात. नव्या निर्णयामुळे पालकांचा हा आर्थिक भुर्दंड वाचणार आहे. साध्या कागदावर अर्ज लिहून तो सेतू कार्यालयामार्फत तहसील कार्यालयात द्यावा लागेल. त्यानंतर लागलीच दाखले मिळतील,असेही यावेळी सांगितले.
कोणत्याही प्रकारच्या प्रमाणपत्रासाठी किंवा शासकीय दस्तऐवजासाठी भराव्या लागणाऱ्या स्टॅम्प ड्युटी अर्थात मुद्रांक शुल्कामध्ये सरकारने गेल्या वर्षी १६ ऑक्टोबररोजी वाढ केली होती. ही स्टॅम्प ड्युटी १०० व २०० रुपयांवरून थेट ५०० रुपये करण्यात आली होती. त्यामुळे सर्व प्रकारच्या दस्तऐवजांप्रमाणेच विद्यार्थ्यांना लागणाऱ्या कागदपत्रांसाठीही ५०० रुपयांचे मुद्रांक शुल्क भरावे लागत होते. यामुळे विद्यार्थ्यांना नाहक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत होता.
या प्रमाणपत्रांसाठी विद्यार्थ्यांना ५०० रू. स्टँम्प पेपर भरून देण्याची गरज नाही
५०० रुपयांचे मुद्रांक शुल्क माफ
- जात पडताळणी प्रमाणपत्र
- उत्पन्नाचा दाखला
- रहिवासी प्रमाणपत्र
- नॉन क्रिमिलेयर सर्टिफिकेट
- राष्ट्रीयतत्व प्रमाणपत्र
- शासकीय कार्यालयात दाखल करायच्या
Marathi e-Batmya