भाजपाच्या व्होट जिहादमुळे अजित पवार गटाचे उमेदवार धोक्यात निवडणूक आयोगाकडूनही व्होट जिहाद शब्दावर आक्षेप

नवीनकुमार

लोकसभा निवडणूकीच्या काळात भाजपाने ४०० पारचा नारा दिला होता. मात्र राज्यातील महाविकास आघाडी आणि राष्ट्रीयस्तरावरील इंडिया आघाडीने भाजपाचा वारू रोखून धरला. त्यामुळे भाजपाने मुस्लिम समुदायाला लक्ष्य करण्यासाठी व्होट जिहाद चा मुद्दा निर्माण केला. लोकसभा निवडणुकीत मुस्लिम समाजाने इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीला एक गठ्ठा मते दिली. त्याचा फायदा महाविकास आघाडीला झालाही. या एकगठ्ठा मतांमुळे भाजपा आणि महायुतीचे नुकसान झाल्याची भावना भाजपाची झाली आहे. या पार्श्वभूमीवर आता विधानसभा निवडणुकीत हिंदू मतं मिळवण्यासाठी भाजपाने व्होट जिहाद सुरू केला आहे. मात्र भाजपच्या या व्होट जिहादमुळे महायुतीतील घटक पक्ष असलेल्या अजित पवार यांच्या महाराष्ट्रवादी काँग्रेसला फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

विधानसभा निवडणुकीत मुस्लिमांसाठी १० टक्के जागा राखीव ठेवणार असल्याची घोषणा दस्तुरखुद्द अजित पवार यांनी होती. अशा स्थितीत अजित पवार गटाच्या मुस्लिम उमेदवारांना भाजपाची मते मिळणार नाहीत, असे मानले जात आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभा निवडणुकीत अजित पवार गटाला कमी जागा मिळणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यातच केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केल्यानंतर राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोकलिंगम यांनी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत व्होट जिहाद हा शब्द जातीयवादी असल्याचे स्पष्ट करत निवडणुकीदरम्यान असे शब्द वापरू नयेत. व्होट जिहादबाबत कोणी तक्रार केल्यास कायदेशीर सल्ल्याने कारवाई केली जाणार असल्याचेही यावेळी सांगितले.

मुख्य निवडणूक अधिकारी एस चोकलिंगम यांनी व्होट जिहाद वरून भूमिका स्पष्ट केल्यानंतर भाजपाने व्होट जिहादवर मौन पाळलेले नाही. लोकसभा निवडणुकीच्या वेळीही राजकीय पक्ष मत जिहादवर भरभरून बोलले होते. व्होट जिहादपूर्वी लव्ह जिहाद आणि लँड जिहादचा मुद्दा उपस्थित केला होता. नुकतेच कोल्हापुरातील कणेरी मठातील एका कार्यक्रमादरम्यान भाजपा नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत १४ मतदारसंघात व्होट जिहाद झाला आहे, ज्यामुळे काही लोकांना आपण हिंदूंचा पराभव करू शकतो असा विश्वास निर्माण करून दिला. तर दुसऱ्याबाजूला वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी फडणवीस यांच्यावर टीका करत मुस्लीम मतांना व्होट जिहाद म्हटले तर तुम्हीही हिंदू मतांचा हिंदू जिहाद करत आहात काय फरक आहे असा उपरोधिक सवाल केला.

दरम्यानच्या भाजपाच्या व्होट जिहाद भूमिकेवरून विरोधक आक्रमक झाले असून शिवसेना उबाठाचे नेते संजय राऊत यांनी मदरसा शिक्षकांच्या पगारवाढीच्या निर्णयावरून महाराष्ट्रातील एकनाथ शिंदे सरकारवर निशाणा साधताना म्हणाले की, मदरसा शिक्षकांचे मानधन आणि पगारवाढीचा निर्णय म्हणजे मत जिहाद नाही का, असा सवाल केला. मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाची रक्कम ७०० वरून १,००० कोटी रुपयांपर्यंत वाढवण्याचे काम निवडणुकीचे गणित डोळ्यासमोर ठेवून केले जात असल्याचा आरोपही केला.

भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी शिंदे सरकारचा संरक्षणार्थ बोलताना म्हणाले की, भाजपाचे महायुती सरकार आरोग्य आणि शिक्षणाच्या बाबतीत धर्माच्या आधारावर भेदभाव करत नाही, असा दावा करत बचाव करण्याचा प्रयत्न केला.
मात्र राज्य सरकारच्या नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत डी.एड पदवी असलेल्या मदरसा शिक्षकांचे मानधन ६ हजार रुपयांवरून १६ हजार रुपये केले आहे. तर बीए, बीएड, बीएससी पदवी असलेल्या शिक्षकांचे मानधन ८,००० रुपयांवरून १८,०००रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आला.

लोकसभा निवडणुकीत अजित पवार गटाची कामगिरी खराब झाली. त्यांना केवळ एक जागा जिंकता आली. यानंतर अजित पवार यांनी आपल्या पक्षाने धर्मनिरपेक्षतता सोडली नसल्याचे सांगण्यास सुरुवात केली. विधानसभा निवडणुकीत त्यांचा पक्ष अल्पसंख्याकांना १० टक्के जागा देणार असल्याचेही भाजपाच्या भूमिकेनंतर स्पष्ट केले. देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधानंतरही नवाब मलिक यांचा महायुती समावेश करण्याच्या निर्णयापासून राष्ट्रवादीचे आमदार तथा अजित पवार मागे हटले नाहीत. तसेच हसन मुश्रीफ हे अजित पवार गटात आहेत. राज्याच्या ११.२४ कोटी लोकसंख्येपैकी ११.५६ टक्के मुस्लिम समुदायाची लोकसंख्या आहे.

About Editor

Check Also

हर्षवर्धन सपकाळ यांची स्पष्टोक्ती, देशात दोन विचारधारांची लढाई, काँग्रेसची विचारधारा संविधानवादी तर भाजपाची मनुवादी काँग्रेस व भाजपाच्या स्वप्नातील भारत वेगळा

देशात दोन विचारधारांची लढाई आहे, एक विचारधारा काँग्रेसची आहे तर दुसरी भाजपाची. काँग्रेस व भाजपाच्या स्वप्नातील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *