गेल्या दहा वर्षांत आमच्या महायुती सरकारच्या कार्यकाळात मराठा समाजाला जितका न्याय मिळाला तो इतर कोणत्याही सरकारच्या कार्यकाळात मिळाला नाही. मराठा समाजाला आरक्षण आम्हीच दिले. मराठा समाजाचे आरक्षण टिकले. आता देखील आम्ही मराठा समाजासाठी मंत्रिमंडळ उपसमिती तयार केली आहे. मराठा समाजाच्या मागण्यांवर त्या मार्फत विचार सुरू असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देत पुढे म्हणाले की, त्यांनीही सरकारला सहकार्याची भूमिका घेतली आहे. सरकारचीही सहकार्याची भूमिका असल्याचे यावेळी स्पष्ट केले.
पुढे बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, मराठा समाजाच्या मागण्यांसाठी लोकशाही पदधतीने आम्ही चर्चा करण्यास पूर्णपणे तयार आहोत. मागण्यांबाबतही सकारात्मक आहोत. चर्चा करू आणि तोडगा काढू असे सांगत आता जे पक्ष सोयीची भूमिका घेत आहेत त्यांना माझे आवाहन आहे की त्यांनी सोयीची भूमिका सोडून आता ठाम भूमिका घ्यावी. जे कोणी या आंदोलनावर राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करत आहेत ते त्यांनी करू नये अन्यथा त्यांचेच तोंड भाजेल असा इशाराही विरोधकांना दिला.
मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले की, मराठा,ओबीसी अशा सर्वच समाजाच्या हिताचा विचार करूनच सरकार निर्णय घेईल. मनोज जरांगे पाटील यांनीही समाजाला शांततेचे आवाहन केले आहे, माझेही मराठा समाजाने शांततेतच आंदोलन करावे असे आवाहन राहील. यानिमित्ताने दोन समाज एकमेकांसमोर येणे चुकीचे असल्याचे सांगत राज्यात अशा पद्धतीने दोन समाज एकमेकांसमोर ठाकणे पहिल्यांदाच झाले असल्याचे सांगितले.
पुढे बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, मनोज जरांगे आता मुंबईत उपोषणाला बसले आहेत. त्यांच्यासोबत मराठा बांधवही राज्यभरातून मोठया प्रमाणात मुंबईत एकवटले आहेत. आता उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसारच प्रशासनाला काम करावे लागत आहे. जरांगेंनी पुन्हा परवानगी मागितली आहे तिचा प्रशासन न्यायालयाच्या निर्देशांच्या चौकटीत राहून सकारात्मक विचार करेल. पण केवळ घोषणा करून चालत नाही. एखादया निर्णयाचे दीर्घकालीन परिणाम होत असतात. मागण्यांबाबत कायदेशीर मार्ग काढावे लागतील संविधानात बसणारे मार्ग काढावे लागतील. मंत्रिमंडळ उपसमिती आम्ही स्थापन केली आहे. या समितीला कॅबिनेटचेच अधिकार असतात. न्या.शिंदे समितीला मुदतवाढीचा निर्णय या समितीने आधीच घेतला आहे. ही समिती निश्चित चर्चा करेल. मग माझ्यासोबत, एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यासोबतही चर्चा करेल. चर्चेतूनच तोडगा निघतो. शासन याबाबत पूर्णपणे सकारात्मक असल्याचे यावेळी सांगितले.
शेवटी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, आता वेगवेगळे पक्ष जे या संदर्भात सोयीची भूमिका घेत आहेत त्या पक्षांना माझे आवाहन आहे की, सोयीची नको ठाम भूमिका घ्या. जे कायदेशीर आहे ती भूमिका घ्या. मात्र ते त्यांची भूमिका सांगणार नाहीत. कारण त्यांना समाजा-समाजात भांडण होताना राजकीय फायदयाचा वास येतो. आम्हाला राजकारण करायचे नाही. इतके मतदान आम्ही घेतले कारण आमच्यावर सगळया समाजांचा विश्वास आहे. या सगळया लोकांनी मागच्या काळात सर्वपक्षीय बैठकीत ठराव करून सहया केलेल्या आहेत. त्यांची भूमिका त्या पत्रातून बाहेर आली आहे. आता सोयीची भूमिका घेऊन लोकांची दिशाभूल बंद करा असे आवाहनही यावेळी केले.
दरम्यान, नांदेडमध्ये मोठया प्रमाणात पाऊस होत आहे. मी सातत्याने संपर्कात आहे. वरच्या भागातील धरणांमधून अधिक वेगाने पाणी सोडल्याने तिथे पाणी शिरले आहे. आपला शेजारील राज्यांशी संपर्क आहे. आता धरणांचा विसर्ग नियंत्रित करण्यास सुरूवात झाली आहे. एनडीआरएफ तैनात आहेच, पण पाण्याचा वेग पाहता आपण लष्कराला देखील पाचारण केले आहे. जिवितहानी होऊ नये यासाठी सर्व प्रयत्न प्रशासनामार्फत सुरू आहेत. जिल्हाधिका-यांना सर्व मदत करायला सांगितले असल्याचेही सांगितले.
Marathi e-Batmya