दुर्घटनाग्रस्तांना मुख्यमंत्र्यांचा आधार, “तुम्ही स्वत:ला सावरा, बाकीचं आमच्यावर सोडा” आम्ही सर्वांचंच पुनर्वसन करणार असल्याची दिली ग्वाही

महाड (तळीये) : प्रतिनिधी

डोंगराच्या पायथ्याला असलेल्या तळीये गावावर काल अतिवृष्टीने दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत ४० जणांना मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून मृत्यू झाला. काल संध्याकाळपर्यंत जवळपास ३७ जणांचे मृतदेह ढिगाऱ्यांखालून काढण्यात आले. त्यात  आज आणखी वाढ होवून ही संख्या ४० वर पोहोचली. घटनास्थळाची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे आज येथे आले.

त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी बजावलेल्या दुर्घटनाग्रस्तांशी संवाद साधताना एका व्यक्तीने आपली आपबीती सांगत आता आम्ही कसं जगावं असा प्रश्न केला. त्यावर मुख्यमंत्री ठाकरे यांनी दुर्घटनाग्रस्तास दिलासा देत म्हणाले की, तुमच्यावर कोसळलेला प्रसंग मोठा आहे. त्यामुळे तुम्ही स्वत:ला सावरा. बाकीच्या गोष्टी सरकारवर सोडा. आम्ही तुमचं पुनर्वसन करू. सर्वांना मदत दिली जाईल, अशा शब्दांत आधार देत त्यांनी तळीये गावातील मृतांच्या नातेवाईकांचे अश्रू पुसण्याचा प्रयत्न केला.

मुख्यमंत्री आज दुपारी सव्वा दोनच्या सुमारास तळिये गावात पोहोचले. यावेळी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री आदिती तटकरे, मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, परिवहन मंत्री अनिल परब, मिलिंद नार्वेकर, खासदार सुनील तटकरे, आमदार भरत गोगावले, मुख्य सचिव सीताराम कुंटे आणि जिल्हाधिकारी निधी चौधरी आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री भरपावसात चिखलातून वाट काढत घटनास्थळी पोहोचले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घटनास्थळी येताच स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी त्यांना घटनेची माहिती दिली. मुख्यमंत्र्यांनी स्थानिकांचं म्हणणं ऐकून घेतलं. त्यांचं सांत्वन करत त्यांना धीर दिला.

 हे आक्रीत घडलेले आहे. आजकाल पावसाळ्याची सुरुवात सुद्धा चक्रीवादळाने होते. तळीयेतील गावकऱ्यांनी अजिबात काळजी करू नये. सरकार त्यांना सर्व मदत करेल, संपूर्ण नुकसान भरपाई दिली जाईल. त्यांचे योग्य पुनर्वसन करू. अशा घटना पाहता डोंगरउतार आणि कडेकपाऱ्यात राहणाऱ्या वाड्या- वस्त्या यांना स्थलांतरित करण्याचे नियोजन करण्यात येईल. पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा नद्यांचे पाणी पावसाळयात वाढून पूर परिस्थिती उद्भवते. यासंदर्भात काहीतरी मार्ग काढण्यासाठी पाण्याचे नियोजन करण्याची गरज आहे, त्यादृष्टीने जल आराखडा तयार केला जाईल. ही आपत्ती इतकी मोठी होती की मदतीला त्याठिकाणी पोहोचताना जवानांना आणि पथकाला अडचणी आल्या. कारण सगळ्या सामुग्रीनिशी त्यांना बचाव कार्य करायचे होते. राज्य शासन आपत्तीचा मुकाबला करण्यासाठी तयार होते. केंद्राने देखील सहाय्य केले, लष्कर, एनडीआरएफ सर्वांनीच मदत केल्याचे त्यांनी सांगितले.

About Editor

Check Also

हर्षवर्धन सपकाळ यांची टीका, विधानभवनात बॉम्बची अफवा ही ढासळलेल्या कायदा सुव्यवस्थेचा परिणाम विधानभवनही सुरक्षित नाही तर जनतेच्या सुरक्षेचे काय

इराणच्या विरोधात अमेरिका आणि इस्रायलने पुकारलेल्या युद्धामुळे देशभरात एलपीजी गॅस सिलेंडरचा प्रचंड तुटवडा आहे त्याला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *