शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाविरोधात बंडाचा झेंडा फडकावित वेगळी चूल मांडणारे एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांपैकी १२ जणांच्या विरोधात अपात्रतेप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात लढाई सुरु आहे. याच परिस्थितीत निवडणूक आयोगाने उध्दव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटाला नोटीस बजावित कागदपत्रे सादर करण्याचे आदेश दिले. त्यामुळे या दोघांमधील संघर्ष आता निवडणूक आयोगाच्या कोर्टात असतानाच बंडखोर आमदार गुलाबराव पाटील यांनी मोठे वक्तव्य करत धनुष्यबाण आमचाच असल्याचं मोठं वक्तव्य केले.
गुलाबराव पाटील हे एका वृत्तवाहिनीशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी विधान केले.
धनुष्यबाण कोणाचा आहे? न्यायालयात काय निर्णय होईल? असा सवाल त्यांना विचारला असता, गुलाबराव पाटील म्हणाले, न्यायालयाच्या लढाईत आम्हाला फारसं बोलता येणार नाही. पण अशा स्थितीत कोणत्याही ठिकाणी सामान्यत: डोकी मोजली जातात आणि डोक्यांनाच महत्त्व असतं. तसेच आम्ही अद्याप शिवसेना पक्ष सोडला नाही. त्यामुळे असा संभ्रम कुणी तयार करत असेल तर तो करू नये. आम्ही पार्टी सोडलेली नाही. आम्ही पार्टीच्या अंतर्गत हा उठाव केलेला आहे.
पक्ष सोडला असता तर धनुष्यबाण कोणाचा? असे प्रश्न पडले असते. मात्र, शिवसेना पक्षानं नैसर्गिक युती करावी, अशी मागणी आम्ही शिवसेना पक्षप्रमुखांकडे केली होती. बहुतांशी आमदारांनी हीच मागणी केली होती. पण ही मागणी न ऐकल्यामुळे आम्हाला हा उठाव करावा लागला. आम्ही शिवसेना पक्ष सोडलेला नाही, त्यामुळे धनुष्यबाण हा आमचाच राहणार असल्याचे ते म्हणाले.
मंत्रिमंडळ विस्तार कधी होईल? असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले, मंत्रिमंडळ विस्तार कधी होईल? याचा कधी विचारच केला नाही. जो व्यक्ती मंत्रीपद सोडून आलाय, तो कशाला अशा गोष्टींचा विचार करेन? ८ मंत्र्यांनी राजीनामा देण्याची ही देशातील पहिलीच घटना आहे. लोकं सत्तेकडे जातात आम्ही सत्तेतून बाहेर पडलोय, मंत्रिपदं आमच्याकडे होती. लोकं साधं सरपंच पद देखील सोडत नाहीत. आम्ही कॅबिनेट मंत्रिपद आणि पालक मंत्रिपद सोडलंय, याचाच अर्थ आम्हाला आमचा धनुष्यबाण वाचवायचा होता. शिवसेना वाचवायची होती, त्यामुळे मंत्रीपद कधी येईल? किंवा न्यायालयात काय निर्णय लागेल, याच्याशी आम्हाला काही देणं-घेणं नाहीये, आम्हाला शिवसेना वाचवायची आहे.
Marathi e-Batmya