एकनाथ शिंदे यांची ग्वाही, रायगड किल्ल्यावरील पाण्याचे दुर्भिक्ष दूर करणार शिवछत्रपतींचा ३५३ वा शिवराज्याभिषेक सोहळा रायगड किल्यावर उत्साहात साजरा

रायगडावर पिण्यासाठी पुरेसे पाणी उपलब्ध व्हावे यासाठी गडावरील पाणीपुरवठा योजनेला नक्की मंजुरी देऊ अशी घोषणा उपमुखमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की, यासोबतच यंदा पावसाने काहीशी ओढ दिली असली तरीही अवघड परिस्थिती आल्यास महायुती सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहील. रायगड शिवराज्याभिषेक दिनोत्सव समिती आणि कोकणकडा मित्र मंडळ यांनी तिथीप्रमाणे आयोजित केलेल्या शिवराज्यभिषेक सोहळ्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज रायगडावर उपस्थित होते. त्यावेळी बोलताना त्यांनी ही ग्वाही दिली. यासोबतच लाडकी बहिण योजनेचे पैसे कधीही बंद होणार नाहीत याचाही त्यांनी पुनरुच्चार केला.

यावेळी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, आज आपण या रायगडच्या पवित्र भूमीत उभे आहोत. हा रायगड नुसता दगड धोंड्याचा किल्ला नाही तर आपल्या स्वाभिमानाचा कणा आहे. इथे उभे राहिले की अंगावर रोमांच उभे राहतात, छाती अभिमानाने फुलून येते, जेव्हा या मातीमध्ये ३५३ वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला तेव्हा काय आनंदोत्सव साजरा झाला असेल. तो सोहळा डोळे दिपवून टाकणारा असेल त्यामुळेच आपण हा दिवस तिथीप्रमाणे साजरा करत असल्याचे सांगितले.

एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की, स्वर्गीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनीही तिथीप्रमाणे हा सोहळा साजरा करा असे सांगितले होते. मात्र तारखेप्रमाणेही इथे शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा नुकताच साजरा करण्यात आला. या सोहळ्याचे महत्त्व असे आहे की तो कितीही वेळा साजरा केला तरीही त्याला येण्यासाठी शिवभक्तांचा उत्साह कमी पडणार नाही असे सांगितले.

एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की, मंत्री भरतशेठ गोगावले आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ३० वर्षापूर्वी हा सोहळा आयोजित करायला सुरवात केली. त्यात सहभागी होणाऱ्या शिवभक्तांची संख्या वर्षागणिक वाढत गेली. रायगड शिवराज्याभिषेक दिनोत्सव समिती आणि कोकणकडा मित्र मंडळ यांनी हा सोहळा आयोजित करायला सुरुवात केली, आणि शासनाने या आयोजनाला राजमान्यता दिली. आता हा उत्सव महोत्सव म्हणून नावारूपाला आला असल्याचे सांगितले.

पुढे बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, याच मातीत आपल्या राजाने हिंदवी स्वराज्याचा भगवा फडकवला, याच मातीत मराठा साम्राज्य जन्माला आले, आज मराठी अस्मितेचा हुंकार दाही दिशांना दुमदुमला आहे. ३५३ वर्षापूर्वी आजच्याच तिथीला शिवाजी महाराज हे छत्रपती झाले, मराठी मनांचे राजे झाले. शिवराज्याभिषेक सोहळा हा केवळ राजकीय सोहळा नव्हता. तर पारतंत्र्यात पिचलेल्या मराठी जनतेला सार्वभौम राजा मिळाल्याची ती एक ऐतिहासिक घटना होती. आजचा दिवस प्रत्येक मराठी माणसासाठी स्वराज्य स्वधर्म आणि लोककल्याण या कर्तव्याचे स्मरण करून देणारा आहे. आजच्या दिवशी आपले राजे फक्त सिंहासनावर बसले नाही तर जनतेच्या काळजात जाऊन बसले असल्याचे सांगितले.

एकनाथ शिंदे म्हणाले की, महाराजांनी कधी जात पात पाहिली नाही, माणूस पहिला दीनदुबळ्यांचे कल्याण एवढाच त्यांचा ध्यास होता. महिलांचा सन्मान कसा ठेवायचा ते शिकवले आहे. त्यामुळे त्यांचे जगणे आजही आपल्याला आदर्शवत आहे. त्यांचे आरमार, युद्धनीती, न्यायव्यवस्था, पर्यावरणाचा विचार हे सगळे आजही आपल्याला दिशा देत आहेत.

मी देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांना धन्यवाद देतो की छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा त्यांनी नौदलाच्या नवीन लोगोमध्ये अंतर्भूत केली आहे. या कृतीद्वारे छत्रपती शिवाजी महाराजांची किर्ती सातासमुद्रापार पोहोचली आहे.

आदर्श राजा कसा असावा याचे उदाहरण छत्रपती शिवाजी महाराजांनी घालून दिला. त्यामुळेच आज इतक्या वर्षांनी देखील त्यांचा जयंती दिवस, शिवराज्याभिषेक सोहळा त्याच उत्साहात साजरा केला जातो. दिल्लीतल्या लाल किल्ल्यावर देखील छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली जाते. अनेक देशांमध्ये विद्यार्थी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करतात.

आपल्या देशात अनेक बादशहा झाले, अमलगिर होऊन गेले मात्र याच मातीमध्ये गाडले गेले हे या महाराष्ट्राचे वैशिष्ट्य आहे. मराठी माणसाची अस्मिता त्याचा स्वाभिमान शिवाजी महाराजांनी जागृत केला. ज्या लोकशाहीचे आपण गोडवे गातो त्याचा पहिला धडा या राज्यभिषेक सोहळ्याद्वारे त्यांनी घालून दिला. आपण आज जो मोकळा श्वास घेतो त्याचे श्रेय या राज्याभिषेकाला आहे.

या राज्याभिषेकापूर्वी चलनात मुघलांची नाणी वापरावी लागत होती, जमीन मोजायला त्यांची पद्धत वापरावी लागत होती. शेतसारा मुघलांच्या पद्धतीने आकारला जात होता, दक्षिणेतील सारा कारभार फारशी किंवा उर्दू भाषेत चालायचा. या सगळ्या परंपरा महाराजांनी खंडित केल्या. त्यांनी स्वतःची शिवराज्याभिषेक शक हे नवे कॅलेंडर सुरू केले. स्वतःची सोन्याची नाणी घडवली, शेतकरी कल्याण, महसूल प्रशासन यांची घडी घातली. दुष्काळाच्या काळात शेतकऱ्यांना बिनव्याजी कर्ज आणि मोफत जनावरे देण्याची व्यवस्था केली. सैन्याला आदेश होते की शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठाला देखील हात लागता कामा नये, असे नीतीने त्यांनी राज्य केले.

महिलांचा आदर, धार्मिक सलोखा राखण्यासाठी फक्त कायदे केले नाहीत तर स्वतःच्या वागण्यातून तसे उदाहरण घालून दिले. जुनी जमीनदारी वतनदारी पद्धत मोडीत काढली, महसूल गोळा करण्यासाठी अधिकाऱ्यांची नेमणूक केली. गडावर पाण्याची सोय केली, शत्रूवर मारा करण्यासाठी तोफांची रचना केली. महाराजांच्या हातून महाराष्ट्र घडला. सगळ्यात महत्वाचे म्हणजे ते स्वतःला जनतेचा मालक न समजता जनतेचा सेवक समजायचे.

माझ्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात मी शिवसृष्टीला मान्यता दिली. आज देवेंद्रजींच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात हे काम पुढे चालू आहे. रायगड किल्यासह राज्यातील १२ किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत स्थान दिले आहे. छत्रपतींचं कार्य यानिमित्ताने जगभरात पोहचत आहे ही आपल्या सर्वांसाठी अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची बाब असल्याचे यावेळी आवर्जून नमूद केले.

यावेळी रोजगार हमी मंत्री भरतशेठ गोगावले, गृहराज्यमंत्री योगेश कदम, माजी आमदार रुपेश म्हात्रे, युवासेना कोअर समिती सदस्य विकासशेठ गोगावले, रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे, रायगड पोलीस अधीक्षक आंचल दलाल आणि शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते आणि हजारो शिवभक्त यावेळी आवर्जून उपस्थित होते.

About Editor

Check Also

काँग्रेस पक्षाच्या ब्लॉक अध्यक्षांच्या नियुक्त्या जाहीरः यादी पहा संघटन सृजन अभियानांतंर्गत स्थानिक पदाधिकाऱ्यांची चर्चा करून नियुक्त्या

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने देशभरात पक्ष संघटना बांधणीवर भर देत संघटन सृजन अभियान हाती घेतले …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *