माजी मंत्री रोहिदास पाटील उर्फ दाजी यांच्या निधनाने अनुभवी व लोकाभिमुख नेतृत्व हरपले काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा शोकसंदेश

काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री रोहिदास पाटील यांना त्यांच्या मतदारसंघासह संपूर्ण खान्देशात दाजी या टोपणनावाने परिचित होते. रोहिदास पाटील यांच्या निधानाचे वृत्त अत्यंत दुःखद व वेदनादायी आहे. रोहिदास पाटील हे काँग्रेस विचाराचे सच्चे पाईक होते. काँग्रेसचा विचार त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत सोडला नाही. रोहिदास पाटील यांच्या निधनाने सुसंस्कृत, संयमी, विनम्र अनुभवी व लोकाभिमुख नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे, अशी शोकभावना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केली.

रोहिदास पाटील हे मागील काही दिवसांपासून आजारी होते. त्यामुळे ते काहीसे दैंनदिन राजकारणातून बाजूला झाले होते. परंतु मागील काही दिवसात ते पुन्हा एकदा सक्रिय होण्याचे संकेत मिळत होते. मात्र रोहिदास पाटील यांचे आज सकाळी ११ वाजता त्यांचे निधन झाले. त्यांच्यावर उद्या सकाळी ११ वाजता शिवाजी विद्या प्रसारक संस्था येथून त्यांची अंत्ययात्रा निघणार असल्याची माहिती रोहिदास पाटील यांचे सुपुत्र तथा आमदार कुणाल पाटील यांनी दिली.

लोकसभा निवडणूकीच्या प्रचारासाठी काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी ये धुळे ग्रामीण येथे प्रचारासाठी आले असता. राहुल गांधी गांधी रोहिदास पाटील यांची आवर्जून भेट घेत त्यांच्या प्रकृतीची आस्थेने चौकशी केली होती.

आपल्या शोकसंदेशात नाना पटोले म्हणाले की, रोहिदास पाटील यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत आमदार, खासदार, विविध खात्याचे मंत्री अशा पदावर काम करुन आपली वेगळी ओळख निर्माण केली. खान्देशात काँग्रेस विचार तळागाळात पोहचण्याचे काम त्यांनी केले. त्यांनी विद्यार्थी दशेपासूनच समाजकारण आणि राजकारणात पाऊल ठेवले. त्यानंतर काँग्रेस सेवादलचे सदस्य, महाराष्ट्र युवक काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी, धुळे जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष अशी पदे भूषवली. १९७२ साली ते धुळे जिल्हा परिषदेवर निवडून गेले, १९८० साली त्यांनी विधानसभेच्या निवडणूकीत विजय मिळवला, १९८६ साली ते महसूल राज्यंमत्री झाले, कृषी, फलोत्पादन, रोजगार, ग्रामविकास, पाटबंधारे, गृहनिर्माण, संसदीय कार्यमंत्री अशा विविध खात्यांची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळून लोकांचे प्रश्न सोडवले.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते व उपाध्यक्ष पदावरही रोहिदास पाटील यांनी काम केले आहे. शैक्षणिक संस्था सुरु करून धुळे जिल्ह्यातील सर्वसामान्य कुटुंबातील मुला मुलींना शिक्षणाची सुविधा निर्माण करुन दिली तसेच जवाहर शेतकरी सहकारी सुत गिरणी, जवाहर महिला सहकारी सूत गिरणी, जवाहर सहकारी कुक्कुट पालन संस्था, जवाहर सहकारी पशुखाद्य संस्थेच्या माध्यमातून धुळे जिल्ह्यात सहकारी संस्थांचे जाळे विणले. धुळे जिल्ह्याला वरदान ठरणारे अक्कलपाडा धरण बांधण्यात त्यांचा मोठा पुढाकार होता. कृषी, सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रातही त्यांनी भरीव योगदान दिले. दांडगा जनसंपर्क व जनतेच्या कामासाठी सदैव तत्पर असणारा नेता अशी त्यांची ओळख होती. आपल्याला मिळालेल्या पदाच्या माध्यमातून त्यांनी समाजातील सर्व घटकांचा विकास करण्याचा प्रयत्न केला.

रोहिदास पाटील यांच्या निधनाने काँग्रेस पक्षाची कधीही न भरून येणारी हानी झाली आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून काँग्रेस पक्ष पाटील कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

About Editor

Check Also

मुंबईत पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या ४५ हजार घरांच्या हाऊसिंग टाऊनशिपला मंजूरी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुंबई पोलीसांसाठी शासकीय निवासस्थाने गृहनिर्माण प्रकल्पाला मंजूरी

मुंबई शहर व उपनगरातील पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी सुमारे ४० ते ४५ हजार शासकीय निवासस्थाने उपलब्ध …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *