मराठा आरक्षणप्रश्नी राज्य सरकारचा मोठा निर्णय, हैद्राबाद गॅझेटची अंमलबजावणीस मंजूरी मनोज जरांगे -पाटील यांच्या भेटीला जात मंत्रिमंडळ उपसमितीची माहिती

मागील चार दिवसांपासून राज्यातील मराठा आरक्षण प्रश्नी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या मागणीला अखेर राज्य सरकारने मंजूरी दिल्याची माहिती मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे-पाटील आणि शिवेंद्रराजे भोसले यांनी मंत्रिमंडळ बैठकीत झालेल्या निर्णयाची माहिती दिली. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांच्या आझाद मैदानावरील आंदोलन यशस्वी ठरले असून संपूर्ण मराठा आंदोलकांमध्ये एकच जल्लोष सुरु झाला.

मनोज जरांगे पाटील यांनी मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष आणि इतर मंत्रिगण भेटायला आले. त्यावेळी राज्याच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झालेल्या निर्णयाची माहिती राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिली. त्यानुसार हैद्राबाद गॅझेटीयरची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. तर सातारा संस्थानच्या गॅझेटची एक महिन्यात अंमलबजावणी करणार असल्याचे आश्वासन मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी दिले. त्यानंतर तशी माहिती मनोज जरांगे पाटील यांनी शासन निर्णयाच्या कच्च्या ड्राफ्टचे वाचन उपस्थित आंदोलकांसमोर केले. त्या कच्च्या ड्राफ्टला आंदोलकांसह सर्वांनी होकार कळविला, त्यानंतर साधारणतः तासाभरात राज्यपालांच्या सहीने हा शासन निर्णय जारी करणार असल्याचे आश्वासन राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिले. त्यावर मनोज जरांगे पाटील यांनी शासन निर्णय जारी झाल्यानंतर रात्री ९ वाजेपर्यंत मुंबई रिकामी करणार असल्याची घोषणा केली.

यावेळी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील म्हणाले की, आपण राज्य सरकारकडे प्रामुख्याने दोन मागण्या केल्याल होत्या. त्यातील पहिली मागणी हैद्राबादचे गॅझेटीयर लागू करावे, त्यास राज्य सरकारने मंजूरी दिली आहे. त्यामुळे आपली प्रमुख मागणी मान्य झाली आहे. तर आपली दुसरी मागणी सातारा संस्थानचे गॅझेट लागू करण्यासंदर्भात होती. मात्र त्यातील काही तांत्रिक त्रुटीमुळे हे गॅझेट आता लगेच लागू करता येत नाही. त्यामुळे त्यास १५ दिवसात लागू करण्यात येणार आहे, त्यासाठी शिवेंद्र राजे भोसले यांनी पुढाकार घेऊन हमी दिली. त्यासाठी मंत्रिमंडळ उपसमितीला १५ दिवसाऐवजी १ महिन्याची मुदत अपेक्षित असल्याची मनोज जरांगे पाटील यांनी जाहिर केले.

त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आंदोलकांवर मुंबईत जे काही गुन्हे दाखल झालेले आहेत ते सर्व गुन्हे राज्य सरकार मागे घेणार असल्याचे आश्वासन उद्योग मंत्री उदय सामंत यांनी जरांगे पाटील यांना दिल्याचे सांगितले. तसेच मागील आंदोलनावेळी मराठा आंदोलकांवर जे काही गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले त्याबाबतच्या निर्णयाची माहिती राज्य सरकार शासन निर्णयात देणार आहे. त्याचबरोबर ज्या आंदोलनकांनी आपले प्राण गमावले त्यांना आर्थिक मदत आणि मृतांच्या कुटुंबातील वारसांना नोकरीच्या आश्वासनाचा उल्लेखही करण्यात येणार असल्याचे सांगितले.

दरम्यान, राज्य सरकारच्या या निर्णयाचे संपूर्ण श्रेय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जाणार असल्याचेही यावेळी सांगितले.
शेवटी बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, सरकारच्या शासन निर्णयाची प्रत एकदा हाती पडली की रात्रो ९ वाजेपर्यंत मुंबई रिकामी करणार असल्याचे जाहिर केले. त्यानंतर आझाद मैदानावर मराठा आंदोलकामध्ये एकच जल्लोष सुरु झाला.

About Editor

Check Also

नरहरी झिरवाळ यांची माहिती, ‘ब्लिंकइट’द्वारे कालबाह्य अन्न वितरण प्रकरणात कंपनीवर कारवाई विधानसभेत भीमराव तापकीर यांच्या प्रश्नाला उत्तर देताना माहिती

पुणे शहरात ब्लिंकइट या ऑनलाईन अन्न वितरण सेवेच्या माध्यमातून कालबाह्य खाद्य पदार्थांचे वितरण होत असल्याबाबत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *