हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी, जमीन व्यवहाराची श्वेतपत्रिका काढून चर्चा करा कोट्यवधी रुपयांच्या जमिनी बळकावणाऱ्या दलालांचे सुत्रधार मंत्रालयात; भूखंड घोटाळे सामुहिक गुन्हेगारीचे कृत्य

भाजपा महायुतीचे सरकार गेंड्याचे कातडीचे असून या सरकारचा कारभार पाहता त्यांनी बेशरमपणाचा कळस गाठला आहे. दररोज एक मोठे प्रकरण उघड होत असून कारवाई मात्र शून्य आहे. सत्ताधारी पक्षातील लोकांनी व त्यांच्या नातेवाईकांनी राज्य लुटण्याचा सपाटा लावला आहे. मुंबई, पुणेसह राज्यात कोट्यवधी रुपयांचे भूखंड कवडीमोल भावाने लाटले जात आहेत. या सर्व जमीन व्यवहारांची श्वेतपत्रिका काढा आणि येत्या हिवाळी अधिवेशनात त्यावर एक संपूर्ण दिवसभर चर्चा करा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.

टिळक भवन येथे पत्रकार परिषदेत बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपा महायुती सरकारचा खरपूस समाचार घेतला, ते पुढे म्हणाले की, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार यांनी पुण्यातील ४० एकर महार वतनाची जमीन ३०० कोटी रुपयांना खरेदी केली, त्यासाठी केवळ ५०० रुपये मुद्रांक शुल्क रुपये भरले, त्या जागेवर आयटी पार्क उभारण्याचा प्रस्तावही तातडीने मान्य करण्यात आला, दस्तावेजामध्ये मोठ्या प्रमाणात फेरफार करण्यात आले. हा भ्रष्ट कारभार उघड झाल्यानंतर आता जमीन खरेदी व्यवहार रद्द केला असे सांगितले जात आहे, म्हणजे चोरी केल्याची कबुली देत आहेत, मग कारवाई का करत नाहीत? एफआयआर मध्ये पार्थ पवारांचे नाव का नाही? पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीने याआधी पुण्याच्या बोपोडीतील ॲग्रीकल्चर डेअरीची सरकारी जमिन बोगस कागदपत्रे तयार करून हडपली. या सर्व व्यवहारासाठी पैसे कुठून आले तर ते एका साखर कारखान्यातून आले. हे पैसे कोणी दिले? कसे दिले? या प्रश्नांची उत्तरे जनतेला मिळाली पाहिजेत. चौकशी समिती नेमून सरकार फक्त वेळकाढूपणा करत आहे.

पुढे बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, भाजपाचे केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पुण्यात जैन बोर्डिंगची जमीन लाटली होती, तो प्रकार उघड होताच व्यवहार रद्द करण्यात आला हे जाहीर करण्यात आले पण हे प्रकरण संपलेले नाही. याप्रकरणातील धर्मादाय आयुक्त हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नातेवाईक आहेत, त्यांच्यावर काय करवाई झाली? मुंबईत अदानीला शेकडो एकर जमीन फुकटात दिली. भाजपाच्या मुंबईतील कार्यालयासाठी सरकारी जमिनीचा केलेला व्यवहार, देवेंद्र फडणवीस यांनी उभा केलेला नवा शेठ मोहित कंभोजला एसआरएच्या जमिनी दिल्या आहेत. पुण्यात रिंगरोडच्या जमीन अधिग्रहणात मोठा घोटाळा करण्यात आला. समृद्धी महामार्गात कोणाची समृद्धी झाली हेही जनतेला कळाले पाहिजे, यासाठी सर्व जमीन व्यवहारांची श्वेतपत्रिका काढली पाहिजे, अशी मागणीही यावेळी केली.

‘वंदे मातरम्’ जातीय/धार्मिक दंगे करण्यासाठी नाही

शेवटी बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, राष्ट्रीय गीत ‘वंदे मातरम्’ला १५० वर्ष झाल्यानिमित्त भारतीय जनता पक्ष देशभरात विविध कार्यक्रम घेत आहे, पण भाजपा व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने ‘वंदे मातरम्’ला नेहमीच विरोध केला आहे, संघाच्या शाखेत हे गीत कधीच गायले नाही, ‘वंदे मातरम्’ हे स्वातंत्र्य संग्रामात गायले जात, याला मोठा त्याग व बलिदानाचा इतिहास आहे. भाजपाने आता इतक्या वर्षांनंतर ते स्वीकारले याचा आम्हाला आनंदच आहे. पण आता भाजपा या गीताचा वापर राजकीय हेतूने करत आहे. हे पवित्र गीत धार्मिक वा जातीय दंगे घडवण्यासाठी तसेच सामाजिक शांतता भंग करण्यासाठी नाही असे बजावून ‘वंदे मातरम्’ गीतावरचे भाजपाचे प्रेम हे पुतणा मावशीचे असल्याची टीकाही यावेळी केली.

About Editor

Check Also

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, भाडेतत्त्वावरील परवडणाऱ्या घरांसाठी सक्षम यंत्रणा कार्यान्वित करा भाडेतत्त्वावरील परवडणाऱ्या घरांसाठी पोर्टलची निर्मिती

मुंबईमध्ये नोकरी, व्यवसाय निमित्ताने बाहेरून मोठ्या संख्येने नागरिक येत असतात. त्यांच्याकरिता मोठ्या प्रमाणावर घरांची आवश्यकता असल्याने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *