मध्य प्रदेशात व्यापम नोकर भरती घोटाळा झाला होता, परंतु आपल्याकडील एमपीएससी (MPSC) नोकर भरतीचा घोटाळा व्यापमपेक्षा मोठा आहे. एमपीएससीची सर्व व्यवस्थाच भ्रष्ट झाली असून विद्यार्थ्यांच्या भविष्याशी सुरु असलेला खेळ थांबला पाहिजे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने या प्रकरणात लक्ष घालून तातडीने ऑनलाईन परीक्षा व Normalization रद्द करावे, अन्यथा राज्यभर आंदोलन करू, असा इशारा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिला.
एमपीएससीच्या सीबीटी CBT व Normalization विरोधात काँग्रेसचे बेमुदत साखळी उपोषण व ठिय्या आंदोलन बेलापूर येथे तीन दिवसापासून सुरु असून आज काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आंदोलन स्थळी भेट दिली. यावेळी प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष आबा दळवी, रोजगार व स्वयंरोजगार विभागाचे प्रमुख धनंजय शिंदे, प्रदेश सरचिटणीस व नवी मुंबईचे प्रभारी गुरुचरण बच्छर, प्रवक्ते सय्यद नासीर हुसेन, संतोष शेट्टी, प्रदेश सचिव आनंद सिंग आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, भाजपा महायुतीचे सरकार मुकं, बहिरं व आंधळं आहे, यांच्याशी चर्चा कशी करावी हाच प्रश्न आहे. या सरकारला एक परिक्षाही व्यवस्थित घेता येत नाही. नीटचा पेपर फुटला पण तो काही आताच नाही तर आतापर्यंत ७७ वेळा फुटला. सर्वत्र भ्रष्टाचार बोकाळला आहे. एमपीएससीच्या परिक्षेचे कंत्राट खाजगी कंपनीला देऊन त्या ऑनलाईन घेतल्या जात आहेत, त्याला विद्यार्थ्यांचा तीव्र विरोध आहे. काँग्रेस पक्षाने विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन आंदोलन सुरु केले असून हे आंदोलन राज्यभर होत आहे. मागण्या पूर्ण होईपर्यंत काँग्रेस पक्ष गप्प बसणार नाही. तातडीने मागण्या मान्य करा अन्यथा आंदोलनाचा हा वणवा राज्यभर पेटेल, असा इशारा दिला.
हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, ऑनलाईन परीक्षा पद्धतीत घोळ आहे, परीक्षा ऑफलाईन तसेच पारदर्शक पणे घ्यावी. ऑनलाईन परीक्षेचे कंत्राट काही विशिष्ट लोकांच्या खाजगी कंपन्यांना देण्यात आले आहे. पैसे घेऊन नोकऱ्या दिल्या जात आहेत, पारदर्शकता नाही, तसेच नवीन पद्धत भ्रष्टाचाराचे रॅकेट असून खाजगी कंपनीकडून घेतल्या जाणाऱ्या ऑनलाईन पद्धतीवर विद्यार्थ्यांचा विश्वास नाही. चार दिवसापासून सुरु असलेल्या आंदोलनाकडे एकही सरकारी वा एमपीएससीचा अधिकारी फिरकलेला नाही, हे जाणीवपूर्वक केले आहे. चोरी निरंतर चालु रहावी यासाठी ते आले नसावेत किंवा त्यांच्याकडे काहीच उत्तर नाही म्हणून ते आले नाहीत. सरकार आंदोलन चिरडून टाकण्याचा प्रयत्न करत आहे पण आंदोलन सुरुच राहिल, असेही सांगितले.
एका प्रश्नाला उत्तर देताना हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, राम मंदिरात चोरी झाल्याचे प्रकरण अंगलट येत आहे म्हणून लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी सिद्धीविनायक मंदिरात चोरी झाल्याचे पुढे आणले जात आहे, या चोरीची चौकशी करायची असेल तर नक्की करावी पण राम मंदिरातील चोरीचा उलगडा झाला पाहिजे. राम मंदिराच्या देणग्या व दान चोरीला गेले त्याची चौकशी केली पाहिजे. चंपतराय, अनिल मिश्रा यांना वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे. राम मंदिरातील चोरीवर पंतप्रधान मोदी, योगी आदित्यनाथ, देवेंद्र फडणवीस कोणीच बोलत नाहीत. सर्वजण गप्प आहेत, तसेच राम मंदिरातील देणग्या चोरीच्या विरोधात काँग्रेस पक्षाचे राज्यभर आंदोलन सुरु आहे असेही सांगितले.
Marathi e-Batmya