अयोध्येतील प्रभू रामाच्या मंदिरातील देणगीवर दरोडा टाकून भाजपा व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने कोट्यवधी भाविकांच्या श्रद्धेशी खेळ केला आहे. दरोड्यावर आता आरएसएस मधून नाराजी व्यक्त केली जात आहे पण नाराजी व्यक्त करून काही फायदा नाही, राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये हिम्मत असेल तर मर्यादा पुरुषोत्तम प्रभूरामाच्या नावावर अब्जावधी रुपयांचा दरोडा टाकणाऱ्या संघाशी संबंधित सर्वांना संघातून निष्काशित करावे, असे आव्हान महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिले.
छत्रपती संभाजीनगर येथे मराठवाडा विभागाची जिल्हानिहाय आढावा बैठक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीला खासदार डॉ. कल्याण काळे, खा. डॉ. शिवाजीराव काळगे, खा. रविंद्र चव्हाण, प्रदेश उपाध्यक्ष ऍड. गणेश पाटील, संभाजीनगर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष किरण पाटील डोणगावकर, संभाजीनगर शहर काँग्रेसचे अध्यक्ष अक्रम सय्यद अब्बास, प्रवक्ते हनमंत पवार, सुरेंद्र घोडसकर यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, राम मंदिराचा वापर भाजपा व रा. स्व. संघाने स्वतःच्या फायद्यासाठी केला. मंदिर निर्माण व प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाचा मोठा इव्हेंट करून सर्व श्रेय आपल्याच पदरात कसे पडेल यासाठी आटापिटा केला. पण त्यांचा खरा चेहरा आता उघड झाला आहे. श्रीरामाला भक्तिभावाने दान दिलेल्या पैशांवरच या लोकांनी दरोडा टाकला. या दरोड्याला सर्व विश्वस्त मंडळच जबाबदार आहे. मंदिरातील आर्थिक व्यवहाराचा हिशोब ठेवण्याची जबाबदारी कोषाध्यक्ष यांचीच आहे. पण दरोड्याशी माझा संबंध नाही, असे जर ते म्हणत असतील तर ते हास्यास्पद आहे. विश्वस्त मंडळाची आताची भूमिका ‘तो मी नव्हेच’ अशी आहे, असा आरोपही यावेळी केला.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष एनडीए बरोबर जाण्याच्या चर्चेवर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, अशा पद्धतीच्या चर्चा मागील काही दिवसापासून सुरु आहेत. परंतु या पक्षाच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांनी याचे खंडन केले असून त्यांच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. तसेच सत्ताधारी पक्षात सत्तेचा समतोल बिघडलेला आहे, सर्व काही आलबेल आहे असे नाही असेही यावेळी म्हणाले.
पेपरफुटीविरोधात काँग्रेस आक्रमक..
उद्धव ठाकरेंसंदर्भातील प्रश्नाला उत्तर देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, काँग्रेस पक्षाने लोकशाही, संविधान रक्षण, नीट पेपर फुटी, टीईटी पेपर फुटी, एमपीएससीतील गैरकारभाराविरोधात आवाज उठललेला आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही नीट पेपर फुटीविरोधात ‘छात्रों की गुंज’ कार्यक्रम देशभर सुरु केलेला आहे. काँग्रेस पक्षाने भाजपा सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतलेली आहे, असेही यावेळी सांगितले.
बोगस सरकारचा बोगस कारभार..
शेवटी बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, राज्यात दुबार पेरणीचे संकट आले असून राज्य सरकारने दुष्काळाचा सामना करण्यासाठी काहीही तयारी व नियोजन केलेले नाही. एल निनो मुळे उद्भवणाऱ्या परिस्थितीला तोंड देण्यास सरकार तयार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते पण वस्तुस्थिती वेगळी आहे. पिण्याच्या पाण्याचे व शेतीच्या पाण्याचे संकट मोठे आहे. बोगस बियाणांप्रमाणे सरकारही बोगस असून त्यांचा कारभारही बोगस आहे. शेतकरी कर्जमाफीस जाणीवपूर्वक विलंब केला जात आहे. आयकर विभागाकडून यादी मागवण्यात आली आहे, ही यादीही उशिरा द्या असे एका मंत्र्यांनी सांगितले असून कर्जमाफी देण्यास सरकार टाळाटाळ करत असल्याचा आरोपही यावेळी केला.
Marathi e-Batmya