हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी, मोदींनी जाहीर माफी मागावी महानगरपालिका निवडणुकीत आघाडीचा निर्णय स्थानिक पातळीवर

नॅशनल हेराल्ड प्रकरणी न्यायालयाने दिलेला निर्णय भारतीय जनता पक्षाच्या खोटारडेपणाचा बुरखा फाडणारा आहे. केवळ सोनियाजी गांधी व राहुलजी गांधी यांना बदनाम करण्यासाठी रचलेले एक कुंभाड असल्याचे आज उघड झाले. ईडी सारख्या सरकारी यंत्रणांच्या माध्यमातून विरोधी पक्षांचा आवाज दडपण्याचा भाजपाचा अजेंडा आहे. न्यायालयाच्या निर्णयाने दूध का दूध पाणी का पाणी झाले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी व भारतीय जनता पक्षाने सोनियाजी व राहुलजी यांची नाहक बदनामी केल्याबद्दल जाहीर माफी मागावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.

टिळक भवन येथे पत्रकार परिषदेत बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, नॅशनल हेराल्ड ही कंपनी स्वातंत्र्य़ चळवळीच्या वेळी ब्रिटिशांविरोधात लढताना एक अजेंडा चालवण्यासाठी देशप्रेमातून स्थापन केलेली संस्था आहे. या संस्थेच्या स्थापनेसाठी स्वातंत्र्य सैनिकांनी स्वतः पैसे दिले होते. ही संस्था एक वर्तमान पत्र चालवत होती व ना नफा तत्वावर या संस्थेचे काम चालत होते व आहे. स्वातंत्र्यानंतरच्या काळात या संस्थेत काम करणाऱ्या पत्रकार, कर्मचारी यांचे पगार देण्याचा प्रश्न उद्भवला तेव्हा काही व्यवहार झाले पण त्यातून कोणत्याही सभासदाला लाभांश वगैरे आर्थिक लाभ झालेला नाही. पण मनी लाँडरिंग झाल्याचा आरोप करत भाजपाने खोटे गुन्हे दाखल करण्यास तपास यंत्रणाना भाग पाडले. सोनियाजी व राहुलजी यांना तासनतास चौकशीच्या नावाखाली त्रास देण्यात आला. आज भाजपाचा खोटेपणा उघड झाल्याचे सांगितले.

महानगरपालिका निवडणुकांच्या रणनितीसाठी बैठक..

महानगरपालिका निवडणुकीच्या रणनितीसाठी काल व आज दोन दिवस टिळक भवन येथे बैठक संपन्न झाली. यावेळी विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार, काँग्रेस कार्य समितीचे सदस्य नसीम खान, प्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रशासन ऍड. गणेश पाटील, प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष वजाहत मिर्झा, प्रदेश सरचिटणीस गुरविंदरसिंग बच्चर, यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीनंतर प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, राज्यातील २८ महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या रणनितीवर या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली आहे. मुंबई महानगरपालिकेसंदर्भात स्वतंत्र चर्चा करण्यात येईल. उद्यापासून इच्छुक उमेदवारांच्या जिल्हा पातळीवर मुलाखती होतील व त्यानंतर २५ व २६ डिसेंबर रोजी राज्य पार्लमेंटरी बोर्डाच्या बैठकीत उमेदवार निश्चित केले जातील. महानगरपालिका निवडणुकीतही आघाडी करण्याचे अधिकार स्थानिक नेतृत्वाला देण्यात आले आहेत. ज्या समविचारी पक्षांचे आघाडीसाठी प्रस्ताव येतील त्यावर निर्णय घेतला जाईल असे सांगितले.

मंत्री माणिकराव कोकाटेंची हकालपट्टी करा..

शेवटी बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, महायुती सरकारमधील क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांना सदनिका घोटाळ्याप्रकरणी २ वर्षांची शिक्षा जिल्हा न्यायालयानेही कायम ठेवली आहे पण सरकार कोकाटेंना वाचवण्यासाठी आणखी संधी देईल. राहुलजी गांधी व सुनिल केदार यांना शिक्षा होताच २४ तासात त्यांचे खासदारकी व आमदारकी रद्द केली होती पण माणिकराव कोकाटेंना मात्र सरकार वाचवत आहे. सत्ताधारी पक्षातील लोकांना एक न्याय व विरोधी पक्षातील लोकांना दुसरा न्याय लावला जात आहे. सरकारने तात्काळ माणिकराव कोकाटेंची हकालपट्टी करावी अशी मागणी सपकाळ यांनी केली.

About Editor

Check Also

अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे ९४ उमेदवार मुंबई पालिका निवडणूकीत ९४ उमेदवारांमध्ये ५२ लाडक्या बहिणी निवडणूक रिंगणात नशीब आजमावणार ;लाडक्या बहिणींना लागणार लॉटरी

मुंबई महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने आज ३० उमेदवारांची तिसरी आणि अंतिम यादी जाहीर केली …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *