Breaking News

विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर आणि राजू शेट्टी एकत्रित येणार ? वंचित बहुजन आघाडी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना यांच्यात चर्चा

आगामी विधानसभा निव़डणूकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील काही पक्षांशी वंचित बहुजन आघाडीची बोलणी सुरू आहे. प्रामुख्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांची वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्यासोबत बैठक झाल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष प्रा. सोमनाथ साळुंखे यांनी दिली.

विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडी यांच्या पेक्षा वेगळी तिसरी आघाडी स्थापन करण्याच्या हालचाली प्रहारचे बच्चू कडू आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या मदतीने स्थापन करण्याच्या हालचाली राज्यात सुरु आहेत. त्यातच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्यात नुकतीच बैठक झाल्याने प्रकाश आंबेडकर तिसऱ्या आघाडीसोबत जाणार की स्वतंत्र निवडणूक लढविणार याबाबत तर्क वितर्क लढविले जात आहेत.

सोमनाथ साळुंखे म्हणाले की, राजू शेट्टी यांची स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि महाराष्ट्रातील अन्य शेतकरी संघटना यांची युती अगोदरच जाहीर झालेली आहे. यामध्ये वामनराव चटप, शंकरराव धोंडगे पाटील यांच्या संघटनांसोबत राजू शेट्टी यांची आघाडी जाहीर झाली आहे. वंचित बहुजन आघाडीसोबत असणारे आदिवासी पक्ष प्रामुख्याने गोंडवना पार्टी, भारतीय आदिवासी संघ अशा वेगवेगळ्या राजकीय पक्ष संघटनांसोबत वंचित बहुजन आघाडीने युती घोषित केली आहे.

पुढे बोलताना सोमनाथ साळुंखे म्हणाले की, राजू शेट्टी यांच्यासोबत आघाडी करताना काही अडचणी निर्माण झाल्या. विशेष करून वामनराव चटप जे राजू शेट्टी यांच्यासोबत आहेत ते राजोरा विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवणार आहेत. तिथे वंचित बहुजन आघाडीने गोंडवना पक्षाशी आघाडी केल्यामुळे त्यांना ती जागा देण्याचा शब्द वंचित बहुजन आघाडीने दिल्यामुळे ती आघाडी विदर्भ आणि मराठवाड्यात होऊ शकली नाही असेही यावेळी सांगितले.

सोमनाथ साळुंखे पुढे बोलताना म्हणाले की, या पार्श्वभूमीवर ॲड. प्रकाश आंबेडकर आणि राजू शेट्टी यांनी पश्चिम महाराष्ट्रात विभागीय स्तरावर आघाडी करण्याचे आणि बोलणी करण्याचे ठरवले आहे. त्या अनुषंगाने आमची स्वाभिमानी शेतकरी संघटनेशी सकारात्मक बोलणी सुरू आहेत. त्यामुळे ती आघाडी पूर्णत्वास येण्याची शक्यता असल्याचेही यावेळी सांगितले.

पुढे बोलताना सोमनाथ साळुंखे म्हणाले की, राजू शेट्टी यांनी काही इतर राजकीय नेत्यांची नावे घेत, काही इतर पक्षांसोबत वंचित बहुजन आघाडीने चर्चा करायला पाहिजे. जसे मनोज जरांगे पाटील, बच्चू कडू वगैरे. मात्र, बच्चू कडू यांच्यासोबत चर्चा होऊ शकत नाही. कारण, ते अकोल्याचे पालकमंत्री असताना वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना त्यांच्यामुळे त्रास सहन करावा लागला. त्यामुळे बच्चू कडू यांच्यासोबत आघाडी करण्यास आमचा तीव्र विरोध असल्याचेही यावेळी स्पष्ट केले.

शेवटी बोलताना सोमनाथ साळुंखे म्हणाले की, आरक्षणाच्या संदर्भात ज्या राजकीय पक्षांची भूमिका स्पष्ट होत नाही त्यांच्यासोबत वंचित बहुजन आघाडीची बोलणी होऊ शकत नसल्याचे स्पष्टपणे सांगितले असून आगामी विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आल्या असताना वंचित बहुजन आघाडी आणि स्वाभिमानी शेतकरी यांची युती झाली तर महाराष्ट्राचे राजकीय चित्र बदलू शकते अशी आशाही यावेळी व्यक्त केली.

Check Also

संजय गायकवाड यांचे वादग्रस्त वक्तव्य, राहुल गांधी यांची… ११ लाखाचे बक्षिस सत्ताधाऱी आमदाराकडूनच पातळी सोडून वक्तव्य

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचे आमदार संजय गायकवाड हे मागील काही दिवसांपासून काही ना …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *