आजच्या प्रवेशाच्या कार्यक्रमाला उपस्थिती पाहून इंदापूर विधानसभेचा निकाल काय लागणार हे आता जाहीर झालंय, असे भाकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी करत महाराष्ट्र लढणाऱ्या माणसांच्या मागं उभा राहतो. दिल्लीश्वरांनी शरद पवार यांना मोडण्याचे प्रयत्न केला, ईडीची नोटीस पण पाठवली, पण पवार साहेबांनी मराठी स्वाभिमान दाखवला असे गौरवोद्वगार यावेळी काढले.
हर्षवर्धन पाटील यांनी भाजपामधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. या प्रवेशाच्या सोहळ्याला पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी संबोधित केलं. यावेळी त्यांनी जोरदार बॅटींग केली.
जयंत पाटील पुढे बोलताना म्हणाले, महाराष्ट्रातील जनता छत्रपती शिवाजी महाराजांच्या मागं का उभी राहिली? महाराजांना माणसं आजही का विसरु शकत नाहीत. महाराष्ट्राला लढणारा नेता पाहिजे असतो. लढणाऱ्या नेत्याच्या मागं उभं राहण्याची महाराष्ट्रातील माणसांची पद्धत असल्याचं स्पष्ट करत दिल्लीवाल्यांनी जेव्हा जेव्हा जबरदस्ती केली तेव्हा शरद पवारसाहेबांनी मराठी स्वाभिमान दाखवण्याचं काम केलं. आज देखील मागच्या काही वर्षात दिल्लीश्वर हे शरद पवारसाहेबांना नमवण्याचे आटोकाट प्रयत्न करत होते. सर्व मार्गांचा अवलंब झाल्याचेही यावेळी सांगितले.
पुढे बोलताना जयंत पाटील म्हणाले की, २०१९ च्या निवडणुकीच्या आधी ईडीची नोटीस आली. पवारसाहेबांना मोडल्यानंतर महाराष्ट्र मोडता येईल अशी भावना या लोकांची होती. महाराष्ट्र मोडण्याचं काम दिल्लीत बसून काही लोकं करत आहेत. म्हणून स्वाभिमानी माणसं शरद पवारांच्या मागं उभी राहिल्याचे आवर्जून सांगितले.
जयंत पाटील पुढे बोलताना म्हणाले की, हर्षवर्धन पाटील भाजपामध्ये त्यावेळच्या काही प्रश्नांमुळं गेले. पण, तुम्ही स्वगृही येत आहात, यापूर्वीच तुम्ही यायला हवं होतं पण आमच्याकडे गर्दी होती, आता येत आहात याचा आनंद असल्याचं सांगत बहुजनांच्या उद्धाराचं राजकारण करण्याची पवारसाहेबांची भूमिका आहे. महाराष्ट्रात शाहू फुले आंबेडकरांचा विचार उजवा ठरला पाहिजे, ही भूमिका शरद पवार यांनी जपली आहे. कितीही हल्ले झाले तरी बहुजन समाजाच्या विकासाची पताका खांद्यावर घेऊन ते चालत आहेत, त्यामुळं शरद पवारांसोबत लोक येत असल्याचेही यावेळी सांगितले.
शेवटी बोलताना जयंत पाटील म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत ज्या बहिणी लाडक्या नव्हत्या त्या दोन महिन्यासाठी लाडक्या झाल्या. पण सध्या महिलांवरील अत्याचारांच्या घटना थरकाप उडवणाऱ्या आहेत. महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांच्या हातात काही राहिलेले नाही. माझे बहिणींना हेच सांगणे आहे की, सावत्र भावाच्या प्रेमाला भाळून काही चुका करू नका असा सूचक इशाराही यावेळी दिला.
Marathi e-Batmya