१९५३ साली झालेल्या करारानुसार विदर्भातील जनतेला आम्ही वचन दिलेलं की, विदर्भातील प्रश्न मांडण्यासाठी दरवर्षी सहा आठवड्याचे अधिवेशन घेऊ. आता सहा आठवड्याचे अधिवेशन एक आठवड्यावर आले आहे. त्यात किमान एक दिवस तरी विदर्भाच्या प्रश्नांवर चर्चा व्हावी, अशी अपेक्षा होती. ती फोल ठरली. हा विदर्भाच्या जनतेचा अवमान असल्याचा आरोप जंयत पाटील यांनी आज अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना केला.
जयंत पाटील पुढे बोलताना म्हणाले की, गल्लीत गोंधळ आणि दिल्लीत मुजरा असे काहीसे वर्णन या सरकारचे करता येईल. सरकारने दिलेलं एकही आश्वासन पूर्ण झालेलं नाही, त्यामुळे जनतेत प्रचंड रोष आहे. लाडक्या बहिणींना २१०० रुपये देऊ, महिला सुरक्षितेसाठी २५ हजार महिलांचा पोलिस दलात समावेश करू, शेतकऱ्यांचे कर्ज माफ करू असे जाहीरनाम्यात आश्वासन दिले आहे. याची आकडेवारी सरकारने जाहीर करावी. १०० दिवसाचे व्हिजन राहिले बाजूला २०४७चे महाराष्ट्र व्हिजन दाखवायचे काम सुरू केले आहे. या डॉक्युमेंटवर जनतेचा अभिप्राय जरूर घ्यावा ही माझी विनंती असल्याचा उपरोधिक टोलाही यावेळी लगावला.
पुढे बोलताना जयंत पाटील म्हणाले की, जुन्या लोकांना आणि जुन्या विचारांना भाजपाने केराची टोपली दाखवायला सुरू केली आहे. भाजपात कानामागून आले आणि तिखट झाले ही म्हण खरी ठरत आहे. पाच लाख कॉन्ट्रॅक्टरची सुमारे ९० हजार कोटींची बिले थकली आहेत. माझ्या मतदारसंघातील हर्षद पाटील या तरुण सब कॉन्ट्रॅक्टने आत्महत्या केली. आजपर्यंत जागतिक बँकेकडून सव्वा लाख रुपयांचे कर्ज आपण घेतले आहे. देशातील सर्व राज्यांनी जेवढ कर्ज घेतलं आहे, त्यातले निम्मे कर्ज आपणच घेतले आहे. ओपन मार्केटमधून सुमारे ५ लाख ६० कोटी रुपये कर्ज घेतलं आहे. सिंगापूर देशाकडून सुद्धा कर्ज घेतले आहे. फॉरेन एक्सचेंज मध्ये कर्ज घेतले आहे, हा भार खूप मोठा आहे. त्यात रुपयाची किंमत पडली आहे. मोदी साहेबांच्याच भाषेत सांगायचे तर देशाची अब्रू खाली गेली असल्याचा खोचक टोलाही यावेळी लगावला.
जयंत पाटील म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की, महाराष्ट्र आता थांबणार नाही. मात्र एका वर्षात लोकांचा भ्रमनिरास झाला. त्यामुळे महाराष्ट्र आता कर्ज काढण्यासाठी थांबणार नाही असा अर्थ लोकांनी काढायला सुरू केला आहे. मंत्रिमंडळात राजी नाराजी सुरू आहे. एक पक्षच गैरहजर आहे. मग सारवासारव. ‘महाराष्ट्र आता थांबणार नाही’ पासून सुरू झालेला प्रवास ‘महाराष्ट्रात हे कधी थांबणार’ इथपर्यंत येऊन पोहोचला असल्याची खोचक टोलाही यावेळी भाजपाला लगावला.
जयंत पाटील पुढे बोलताना म्हणाले की, १७ अब्ज डॉलरची गुंतवणूक परदेशी कंपन्यांनी काढून घेतली आहे. गेल्या दशकात सुमारे १८ लाख नागरिकांनी नागरिकत्व सोडून दिलं. तरी बाकी सब ठीक हैं…! असं या सरकारचे झाले आहे. कोल्हापूरच्या चपलांचा आपला ठेवा, आता प्राडा नावाचा ब्रँड त्याच्यावर पैसे कमावणार. येवल्याची पैठणी, सावंतवाडीची खेळणी, विदर्भातील संत्री, सोलापूरी चादर या जपल्या पाहिजेत. पूर्वी अमेरिकेने हळद आणि बासमती तांदूळचे पेटंट घेतले होते. त्यावेळी डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी ते लढाई करून पुन्हा मिळवले. त्यांच्याच नेतृत्वाखाली समिती नेमून हा सगळा आपला सांस्कृतिक ठेवा जपावा असेही यावेळी सांगितले.
पुढे बोलताना जयंत पाटील म्हणाले की, कोल्हापूर प्रमाणे पुण्यालाही खंडपीठ व्हावे अशी मागणी आहे, सरकारने त्यासाठी प्रयत्न करावा. गुंडांना पासपोर्ट, शस्त्र परवाने देऊन पोसले जात आहेत. सामाजिक कार्यकर्ते राम खाडे यांनी अनेक देवस्थान जमिनींचे घोटाळे बाहेर काढले. त्यांना देण्यात आलेले पोलिस संरक्षण काढून घेण्यात आले. बंदुकीचा परवाना रीन्यू करून दिला नाही. त्यांच्यावर १० – १२ जणांनी हल्ला केला. त्यांचे प्राण कसेबसे वाचले. १५ दिवस उलटून गेले तरी आरोपी पकडले गेले नाहीत. पोलिस काय करतायत? असा सवालही यावेळी केला.
पुण्याच्या परिस्थितीबाबत बोलताना जयंत पाटील म्हणाले की, पुण्याला ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट म्हणायचे ते आता गुंडांचे माहेरघर झाले आहे. गँगवॉर तर नित्याची बाब झाली आहे. खंडणी प्रथा बळावते आहे. पुण्यात व्यवसाय करणे अशक्य झाले आहे. पुण्यात शिक्षण घेणाऱ्या मुलींना पोलिसांनी जातीवाचक शिवीगाळ केली. पोलिस एफआयआर घेत नाहीत. त्या मुलींनी लढा दिला. अनगर मध्ये नगराध्यक्ष पदाच अर्ज भरून दिला नाही. ही कायदा सुव्यवस्थेची अवस्था आहे. बाळासाहेब थोरात साहेब यांना उद्देशून आम्हाला नथुराम व्हावे लागेल अशी भाषा वापरली गेली. आपली संतांची परंपरा आहे. खरंतर सभागृहाने बाळासाहेबांच्या पाठी खंबीर उभे राहायला हवे होते असे सांगत पुण्यातील नवले ब्रीज मृत्यूचा सापळा झालेला आहे. ‘ना खाऊंगा ना खाने दूंगा’ यात देवेंद्र फडणवीस यांनी थोडा बदल केला आहे ‘मैं नहीं खाऊंगा, पर खाने दूंगा’. अशी शंका येत असल्याचा टोलाही यावेळी लगावला.
शहरे-जिल्ह्यांच्या नाव बदलावरून बोलताना जयंत पाटील म्हणाले की, आमच्या उरूण इस्लामपूर शहराचे नामकरण करून ईश्वरपूर करण्यात आले. मात्र त्यात उरूण ही शहराची ओळख पुसून टाकली. लोकांनी आंदोलन केले तेव्हा घाईघाईत त्यात बदल केला गेला. मात्र केंद्रातून तसा बदल अद्याप झालेला नाही. माझी विनंती आहे देवेंद्रजींना, त्यांचे केंद्रात वजन आहे. त्यांनी अहमदाबादचे नाव बदलून सरदार वल्लभभाई पटेल नगर करण्यासाठी प्रयत्न करावे अशी खोटक टीपण्णीही यावेळी केली.
जयंत पाटील पुढे बोलताना म्हणाले की, अतिवृष्टीचे रौद्ररूप शेतकऱ्यांनी अनुभवले. नद्यांनी आपली पात्र बदलली. पिके बेचिराख झाली. शेतकरी उघड्यावर आले. मात्र तुटपुंजी मदत देत त्यांची थट्टा करण्यात आली. शेतकऱ्यांना ठोस मदतीची अपेक्षा आहे. कुंभमेळ्यासाठी २५ हजार कोटी रक्कम मंजूर झाली आहे. आता यासाठीचे विविध कॉन्ट्रॅक्ट मराठी माणसांना मिळावे ही काळजी सरकारने घ्यावी अशी सूचना केली.
शेवटी बोलताना जयंत पाटील म्हणाले की, महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले आहे. साताऱ्यातील सावरी गावात ड्रग्सच्या कच्चा मालाचा साठा जप्त करण्यात आला आहे. हे लोण आता खेड्यापाड्यात पोहोचते आहे, याची सरकारने नोंद घ्यावी. पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील रस्त्यांचे काम पूर्ण न करताच कामाचे १११ कोटी रुपये काढण्याचा प्रयत्न उघडकीस आला. या प्रकरणात सखोल चौकशी व्हावी अशी मागणीही यावेळी केली.
Marathi e-Batmya