राज्यातील मराठा समाजाला मिळणाऱ्या आरक्षणाबाबत विधानसभा निवडणूकीच्या आचारसंहितेपूर्वी निर्णय घेण्याचे आवाहन मराठा आरक्षण समर्थक मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकार आणि देवेंद्र फडणवीस यांना केले. जर राज्य सरकारने विशेषतः देवेंद्र फडणवीस यांनी आचारसंहिता लागू होण्यापूर्वी आरक्षणाबाबत निर्णय घेतला नाही तर तुमची सगळी गणितं बिघडवणार असल्याचा इशाराही आज मनोज जरांगे पाटील यांनी दिला.
विधानसभा निवडणूकीचा कार्यक्रम आणि आचारसंहिता अद्याप जाहिर झालेली नसली तरी दसऱ्यानंतर यासंदर्भातील आचारसंहिता जाहिर होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांनी भाजपा आणि देवेंद्र फडणवीस यांना इशारा दिला.
मनोज जरांगे पाटील पुढे बोलताना म्हणाले की, मी राजकीय स्वार्थासाठी आंदोलनात उतरलेलो नाही. माझा एकच राजकिय स्वार्थ आहे तो म्हणजे मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे. योग्य वेळेनंतर योग्य संधी येते म्हणतात तशी आता योग्य वेळ आली आहे. गोरगरीब मराठे, दलित, मुस्लिम, ओबीसी या सगळ्यांच्या एकजुटीची लाट आलेली आहे. यानंतर ही लाट येणार नाही. त्यामुळे गोरगरीबांना आरक्षण मिळण्याची हीच संधी असल्याचेही यावेळी सांगितले.
तसेच पुढे बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, दसरा मेळावा आणि विधानसभा निवडणूका एकत्रितच आल्या आहेत. त्याला मी काही करू शकत नाही. नारायण गडावर होणारा दसरा मेळावा हा फक्त मराठ्यांचा होणारा नसून यात अठरा पगड जातीचे लोकही येणार आहेत. देवेंद्र फडणवीस आरक्षण दिल्याशिवाय आचारसंहिता लागू करणार नाही, मी लोकसभा निवडणूकीच्या आधी सांगितले होते की, निवडणूकीच्या आधी मराठ्यांच्या मागण्याचा विचार करा अन्यथा पश्चाताप करण्याची पाळी येईल असेही यावेळी सांगितले.
मनोज जरांगे पाटील पुढे बोलताना म्हणाले की, भाजपातील मराठ्यानो विचार करा, फडणवीस यांना तुम्ही समजावून सांगा. आचारसंहिता लागू करण्यापूर्वी मराठ्यांच्या सगळ्या मागण्या मान्य करा नाही तर नाही तर माझ्या नावाने बोंबलायचे नाही. फडणवीस यांना सांगतो मराठ्यांना डावलू नका, तुमला शब्द आहे. मागण्या मान्य केल्या नाहीत तर तुमचा सुफडा साफ होईल माझा नाईलाज आहे असा इशाराही यावेळी दिला.
तसेच निवडणूकीपूर्वी जर मराठा समाजाला आरक्षण मिळालं नाही तर तुमची सगळी गणित बिघडवणार असल्याचा इशाराही यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी दिला.
Marathi e-Batmya