नाना पटोले यांचा निर्धार, मोदी शाहंचा विचार महाराष्ट्रात रूजू होऊ देणार नाही रमेश चेन्नीथला यांचे आवाहन, भाजपा युती सरकारच्या चुनावी जुमल्यांना फसू नका

विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस व मविआ सज्ज आहे. भाजपा युती सकारने अडीच वर्षात प्रचंड भ्रष्टाचार केला आहे, तिजोरीत पैसा नाही, निधीची तरतूद नाही असे असतानाही दोन महिन्यात युती सरकारने केवळ जनतेची दिशाभूल करणाऱ्या घोषणा केल्या आहेत. विधानसभा निवडणुका नजरेसमोर ठेवून केवळ घोषणाबाजी केली असून ते सर्व चुनावी जुमले आहेत. जनतेने या जुमलेबाजीला फसू नये, महाराष्ट्राच्या विकासासाठी मविआलाच विजयी करा, असे आवाहन महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी केले.

नाशिक येथे आयोजित पत्रकार परिषदेत रमेश चेन्नीथला बोलत होते. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, निवडणुकीच्या तोंडावर मुंबईतील पाच टोल नाक्यावरील टोल माफ करण्याचा निर्णय घेतला, त्याचे स्वागतच आहे पण महाराष्ट्रातील टोल का माफ केले नाहीत? मुंबई व महाराष्ट्राची जनता वेगळी आहे का? फडणवीस व गडकरी यांनीच ‘टोलमुक्त महाराष्ट्र’ करणार अशी घोषणा केली होती, त्याचे काय झाले? १० वर्षापासून भाजपा महाराष्ट्राला लुटत आहे. भाजपा युतीचे सरकार फक्त घोषणाबाजी करणारे आहे. राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडली आहे पण फडणवीस सक्षम गृहमंत्री अशी जाहिरात बाजी केली जात आहे परंतु फडणवीस हे सर्वात निक्रीय गृहमंत्री आहेत अशी टीका केली.

नाना पटोले पुढे बोलताना म्हणाले की, महाविकास आघाडी निवडणुकीसाठी सज्ज असून मविआ २८८ जागांवर लढणार आहे, आघाडीत छोटा भाऊ मोठा भाऊ असा वाद नाही. महाराष्ट्राला वाचवणे हे आमचे लक्ष्य असून ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केला त्यांना राज्यात कुठलेही स्थान मिळता कामा नये याची खबरदारी घेऊ. महाराष्ट्रात मोदी शाह यांचा विचार कदापी रुजू देणार नाही. महाराष्ट्रातील चित्र बदलणार असून मविआचे बहुतमाचे सरकार येईल असा विश्वासही यावेळी व्यक्त केला.

पुढे बोलताना नाना पटोले म्हणाले की, राज्यपालांनी आज घाईघाईत ७ जणांना राज्यपाल नियुक्त आमदारपदाची शपथ दिली. महाविकास आघाडीचे सरकार असताना १२ जणांची नावे राज्यपाल नियुक्त आमदारांसाठी राजभवनला दिली होती. पण त्यावेळचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्यावर सही केली नाही. हे प्रकरण न्यायालयात असून त्याचा निकाल अजून लागलेला नसताना राज्यपालांनी ७ जणांची नियुक्ती केली आहे, याप्रकरणी न्यायालयात दाद मागू असेही यावेळी सांगितले.

हिरामण खोसकरांविषयी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना नाना पटोले म्हणाले की, इगतपूरी हा काँग्रेस विचाराचा मतदारसंघ असून ज्यांनी काँग्रेसची साथ सोडली त्यांना जनतेने धडा शिकवला आहे. आमदार हिरामण खोसकर यांनी विधान परिषद निवडणुकीत क्रॉस व्होटिंग केले होते, लोकसभा निवडणुक व त्यानंतरही त्यांनी सतत पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे त्यांना पक्षातून ६ वर्षांसाठी निलंबित केले आहे. इगतपुरीत काँग्रेसकडे इच्छुक उमेदवारांची संख्या भरपूर आहे, स्थानिक उमेदवारालाच संधी दिली जाईल असेही यावेळी सांगितले.

About Editor

Check Also

आशिष शेलार यांची माहिती, गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी नवे प्राधिकरण स्थापन करणार विधानसभेत सांस्कृतिक कार्य विभागाच्या चर्चेला उत्तर देताना दिली माहिती

राज्यातील गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी व्यापक पावले उचलली जात असून युनेस्को मानांकन मिळालेल्या गडकिल्ल्यांच्या व्यवस्थापनासाठी तसेच असंरक्षित …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *