पंतप्रधान मोदी यांची स्पष्टोक्ती, संघटन, समर्पण आणि सेवेची त्रिवेणी देशाला पुढे घेऊन जाणार माधव नेत्रालयाच्या प्रीमियम सेंटरचे भूमिपूजनः मुख्यमंत्री फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची उपस्थिती

संघटन, समर्पण आणि सेवेची त्रिवेणी भारत देशाला पुढे घेऊन जाण्यासाठी महत्वाचे सूत्र ठरणार असून विकसित भारताचा संकल्प पूर्ण करण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी याचा अवलंब करावा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. गोरगरिबांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचविण्यासाठी केंद्र शासन कसोशीने कार्य करीत आहे. माधव नेत्रालयानेही या कार्यात योगदान देत गेल्या तीन दशकांपासून लोकांच्या जीवनात प्रकाश आणण्याचे मोलाचे कार्य केल्याचे गौरवोद्गार, मोदी यांनी काढले.

नागपूर येथील हिंगणा रोडवरील माधव नेत्रालयाच्या प्रीमियम सेंटरचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते डिजिटल पद्धतीने भूमिपूजन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, स्वामी अवधेशानंद गिरी, स्वामी गोविंद देव गिरी, माधव नेत्रालय चॅरिटेबल ट्रस्टचे सरचिटणीस डॉ. अविनाशचंद्र अग्निहोत्री यावेळी उपस्थित होते.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, गेल्या दशकात ग्रामीण भागात लाखो आयुष्मान भारत केंद्रे उभारण्यात आली. कोट्यवधी लोकांना आरोग्य सेवा पुरविण्यात आल्या. टेलिमेडिसिनद्वारे उपचार व आरोग्य सेवा सशक्त करण्यात आल्या. एम्ससारख्या संस्थांची संख्या तिपटीने वाढविण्यात आली. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर प्रथमच देशात वैद्यकीय शिक्षण मातृभाषेत उपलब्ध करून दिले. वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या जागा वाढविण्यात आल्या आहेत. योग आणि आयुर्वेदालाही जगात मानाचे स्थान मिळाले आहे. आरोग्य सेवेपासून कुणी वंचित राहू नये असे शासनाचे धोरण असून त्यानुसार सक्षमपणे कार्य सुरू असल्याने सांगितले.

पुढे बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, आरोग्य सेवांचे जाळे निर्माण करण्यात आले. आरोग्य क्षेत्रातील सुधारणांचा हाच वसा माधव नेत्रालय पुढे घेऊन जात आहे. द्वितीय सरसंघचालक माधवराव गोळवलकर गुरुजी यांच्या आदर्शावर मार्गक्रमण करत नेत्रालयाने अंध:कार दूर करीत लोकांच्या जीवनात प्रकाश आणला आहे. प्रीमियम सेंटरमुळे या नेत्रालयाच्या कार्याचा विस्तार होऊन त्यास गती मिळेल. तसेच देशातील आरोग्य क्षेत्राच्या प्रगतीतही या संस्थेचे भरीव योगदान राहील असेही यावेळी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, विदर्भातील थोर संत प्रज्ञाचक्षू गुलाबराव महाराज हे जन्मतः अंध होते. मात्र अंधत्वावर मात करीत त्यांनी ज्ञानाची दृष्टी विकसित केली. दृष्टी बोधातून येते व विवेकातून प्रगट होते याचा आदर्श वस्तुपाठच त्यांनी घालून दिला आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, संत एकनाथ अशा देशातील संतांनी भारताला एकसंध ठेवत उत्तम शिकवण दिली. माधव नेत्रालयानेही त्यांच्या विचारांची कास धरत कार्य केले आहे. समाजसेवेचे हे कार्य अव्याहत पुढे जावे, अशा भावनाही व्यक्त केल्या.

माधव नेत्रालय मध्य भारतातील आरोग्य क्षेत्रात महत्वाची नेत्र संस्था ठरेल– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

दृष्टी ही ईश्वराने मानवाला दिलेला मौल्यवान ठेवा आहे. ज्यांच्याकडे दुर्देवाने ही दृष्टी नाही त्यांच्या जीवनात प्रकाश आणण्याचे कार्य माधव नेत्रालय गत तीन दशकांपासून करीत आहे. देशात व राज्यात नेत्र आरोग्य क्षेत्रात भरीव सेवा देण्याची आवश्यकता आहे. माधव नेत्रालयासारख्या संस्था सातत्यपूर्ण सेवा कार्य करीत या क्षेत्रामध्ये भरीव योगदान देत आहेत. नेत्रालयाचे प्रीमियम सेंटर अस्तित्वात आल्याने मध्य भारतातील नेत्र आरोग्य क्षेत्रात सेवा देणारी माधव नेत्रालय ही महत्वाची संस्था ठरणार असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.

लोककल्याणाच्या प्रेरणेतून माधव नेत्रालयाचे जीवनदृष्टी देण्याचे कार्य -सरसंघचालक डॉ मोहन भागवत

नि:स्वार्थ भावनेतून लोककल्याणाच्या प्रेरणेने माधव नेत्रालय अव्याहतपणे कार्यरत असून दृष्टीबाधितांना जीवनदृष्टी देण्याचे महत्वपूर्ण कार्य करीत असल्याचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यावेळी म्हणाले. चैत्र प्रतिपदेचा दिवस आणि माधव नेत्रालयाच्या प्रीमियम सेंटरचे भूमीपूजन हा एक शुभ योग असल्याचे सांगत शुभ योगासाठी तप:श्चर्येची आवश्यकता असते. तप:श्चर्येतून पुण्य लाभते व पुण्यातून फळ मिळते या मागची प्रेरणा लोककल्याण आहे. चांगल्या कर्मातून प्राप्त फळाचा उपयोग विश्व कल्याणासाठी करण्याची प्रत्येक माणसाची भूमिका असल्यास सर्वांचे जीवन निरामय होईल, असे ते म्हणाले.

‘तमसो मा ज्योतिर्गमय’ या माधव नेत्रालयाचा आतापर्यंतचा प्रवास दर्शविणाऱ्या स्मरणिकेचे पंतप्रधानमोदी यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. माधव नेत्रालयाचे सचिव डॉ. अविनाशचंद्र अग्निहोत्री यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. शांतीमंत्राने कार्यक्रमांची सांगता झाली.

महसूल व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, विधी व न्याय राज्यमंत्री ॲड. आशिष शेलार, गृह राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते.

माधव नेत्रालयाविषयी…

द्वितीय सरसंघचालक माधव सदाशिवराव गोळवलकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ नागपुरात माधव नेत्रालयाची स्थापना १९९५ मध्ये झाली. वासुदेवनगर येथील माधव नेत्रालय सिटी सेंटर २०१८ पासून सेवेत आहे. या नेत्र चिकित्सालयातून आधुनिक तंत्रज्ञानाने गरीब रुग्णांवर कमी खर्चात उपचार होतात.

अशी असेल नवीन वास्तू

माधव नेत्रालयाची नवीन वास्तू हिंगणा रोडजवळील वासुदेवनगर येथे ५.८३ एकर जागेत बांधण्यात येणार आहे. येथे आधुनिक उपकरणांनी सुसज्ज २५० खाटा, १४ बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) आणि १४ अत्याधुनिक शस्त्रक्रिया केंद्र, नेत्रपेढी, संशोधन केंद्र असेल. सर्वत्र हिरवळ, रेन वॉटर हार्वेस्टिंग, सौर ऊर्जा अशी व्यवस्था या परिसरात राहणार आहे

About Editor

Check Also

अमरावतीच्या अंबादेवी संस्थानास चिखलदरा येथील एमटीडीसीची तीन एकर जमीन राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

अमरावती जिल्ह्यातील मौजे चिखलदरा येथील श्री अंबादेवी संस्थान, अमरावती यांना महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची ३ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *