Breaking News

राज ठाकरे यांची टीका, तुमची बहिण खरीच लाडकी असेल तर… मुख्यमंत्र्यांच्या जिल्हातच कायदा धाब्यावर

बदलापूर येथील दोन लहान मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर जन आक्रोश जो काही निर्माण झाला आणि त्यामुळे निर्माण झालेल्या कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नावरून राज ठाकरे यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. तसेच मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातच जर कायदा धाब्यावर बसवला जात असेल तर बाकी ठिकाणची परिस्थिती काय असेल याची कल्पनाही करवत नाही अशी टीका मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी एक्स वर ट्विट करत मुख्यमंत्र्यांवर केली.

राज ठाकरे पुढे बोलताना म्हणाले की, बदलापूरमध्ये जी अत्यंत दुर्दैवी आणि भीषण घटना घडली, त्यावर मी काल पण म्हणलं तसं, यावर कारवाई व्हायला इतका वेळ का लागला? असा सवाल करत या विषयाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माझ्या महिला पदाधिकाऱ्यांनी वाचा फोडली, विषय लावून धरला, आणि त्यातून जनआक्रोशाला तोंड फुटलं असल्याचंही यावेळी सांगितले.

पुढे राज ठाकरे आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की, मुळात हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा जिल्हा या जिल्ह्यातच जर कायदा धाब्यावर बसवला जात असेल तर बाकी ठिकाणची परिस्थिती काय असेल याची कल्पना पण करवत नाही असे सांगत मुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यपध्दतीवरही टीका केली.

मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेवरून राज ठाकरे म्हणाले की, आज सरकार ‘लाडकी बहीण’ योजनेच्याद्वारे स्वतःच कौतुक करून घेण्यात मग्न आहे, पण जर तुमची बहीण खरंच लाडकी असेल तर तिच्यावर अशी वेळ येऊ नये आणि दुर्दैवाने आलीच तर तिला न्याय मिळेल हे पाहणं, हे पहिलं कर्तव्य नाही का ? असा सवालही यावेळी उपस्थित केला.

पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले की, जनतेच्या पैशातून, बहिणींना पैसे देऊन, स्वतःचं ब्रॅण्डिंग करण्यापेक्षा ती सुरक्षित आहे, ही भावना जरी निर्माण केलीत तरी खूप आहे. माझ्या पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्यांमुळे हा विषय आज समोर आलाय याचा मला अभिमान आहे. पण मुळात असे प्रकार घडू नयेत यासाठी कडक कायदे आणि त्याची अंमलबजावणी होणं गरजेचं असल्याचं मतही यावेळी व्यक्त केले.

शेवटी राज ठाकरे म्हणाले की, बदलापूरच्या शाळेत लहान लहान मुलींच्या बाबतीत जो भयानक प्रकार घडला आहे तो धक्कादायक आणि संताप आणणारा आहे. मुळात या घटनेत गुन्हा दाखल करून घेण्यातच पोलिसांनी १२ तास का लावले ? असा उपस्थित करत एका बाजूला कायद्याचं राज्य म्हणायचं, आणि दुसऱ्या बाजूला पोलिसांच्याकडून झालेला हा कुठला हलगर्जीपणा? असा खोचक सवाल करत माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी हा मुद्दा लावून धरला आहे, आणि माझं महाराष्ट्र सैनिकांना सांगणं आहे की या प्रकरणात आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा होईपर्यंत या विषयांत तुमचं लक्ष असू द्या असे आवाहनही यावेळी केलं.

Check Also

अतुल लोंढे यांचा सवाल, ‘हिट अँड रन’ प्रकरणी चंद्रशेखर बावनकुळेंच्या मुलावर कारवाई का नाही? पोलिसांवर दबाव कोणाचा ? कायदा आणि सुव्यवस्था सत्ताधारी भाजपाच्या दावणीला

भारतीय जनता पक्ष युती सरकारच्या काळात सत्ताधारी पक्षातील आमदार, खासदार व त्यांच्या नातेवाईकांना कायद्याचा धाकच …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *